पुणे— नोकरी मिळत नसल्याने मनोधैर्य खचल्यामुळे फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे प्राण फेसबुक पोस्ट वेळीच पोलिसांपर्यंत पोहचल्यामुळे वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले. या 30 वर्षीय तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
“मी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य करु शकले नाही, नोकरीही नाही. त्यामुळे आई-पप्पा मला माफ करा, मी आत्महत्या करण्यास जातेय’ असं फेसबुक पोस्टमध्ये लिहून पुण्यात राहणारी संबंधित तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी घराबाहेर पडली होती. फेसबुकवर हा मजकूर वाचून पोलिस यंत्रणा सतर्क झाली.
पोलिसांनी धावाधाव करुन तांत्रिक माहितीच्या आधारे तिच्या आई-वडिलांचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर तरुणीच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन तिच्याबाबत विचारणा करण्यात आली. परंतु पोलिसांकडूनच आई-वडिलांना मुलीबाबत माहिती मिळाल्याने त्यांनाच मोठ्ठा धक्का बसला.
तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद आढळला. त्यानंतर तिच्या मित्र-मैत्रिणींच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. एका मित्राकडे तिच्याविषयीची थोडी माहिती मिळाली. त्या माहितीच्या पोलीस आयुक्त कार्यालयातील दामिनी पथकाने काही वेळातच तिला शोधून काढले.
महिला पोलिसांनी चौकशी केली असता नैराश्येत येऊन आत्महत्या करत असल्याचं तिने सांगितलं. पुण्यातील दामिनी पथकाच्या सुजाता दानमे यांनी तरुणीचे समुपदेशन केले. तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. एका फेसबुक पोस्टमुळे आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला वाचवण्यात पोलिसांना यश आलं.