पुणे—एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही असा सवाल करत राज्यातले सरकार हे दिशाहीन सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.सरकारमध्ये कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात असा टोलाही पाटील यांनी लगावला.
भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजाला न्याय कधी मिळणार? सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्थगिती कधी उठवणार,? एक महिना झाला पण हे सरकार काही ही करत नाही, हे सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही, शेतकरी प्रश्नाबाबत, महिला वरील अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर नाही विद्यार्थ्याबाबत गंभीर नाही अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली..
मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकणे हे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांसाठी चुकीचे ठरेल, मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा असे वडेट्टीवार बोलले असतील तर त्यांनी आधी ओबीसी समाजाला त्यांना चालणार आहे का हे विचारावे. अन्यथा असे झाले तर गावो गाव संघर्ष होतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्यात लवकरच भाजपच सरकार येईल या भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचे पाटील म्हणाले.