पुणे– पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. लोकांकडूनही अनेकवेळा निष्काळजीपणा केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग कसा रोखायचा हा प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर येत्या शनिवारपासून जमावबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे.
१४४ कलमांतर्गत दोषींवर थेट कारवाई केली जाणार असून दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे संकेत आज पत्रकारांशी बोलताना दिले आहेत.
अनलॉक नंतर अनेक व्यवसाय, कार्यालये, दुकाने सुरु झाली आहेत. नागरिकही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. तसेच मास्क न वापरले, मोठ्या संख्येने एकत्र येणे, शारीरिक अंतर न पाळणे अशा असे प्रकार सर्रास घडत आहेत. दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रुग्णांवर उपचार होण्यासाठी आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे पुण्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांवर, दुकानांबाहेर, अन्य गर्दीच्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत.
मुंबईच्या धर्तीवरच हे आदेश देण्यात येणार आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता एकत्र येणारे आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
याबाबत बोलताना आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, पुणे पोलिसांशी चर्चा करून कारवाईची रूपरेषा उद्या (शुक्रवारी) ठरविण्यात येईल. त्यानंतर महापालिकेकडून आदेश काढण्यात येईल. कशासाठी सवलत द्यायची, कुठे आदेश लागू करायचे याबाबतचा तपशील शुक्रवारी संध्याकाळी काढला जाईल.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने काढलेल्या आदेशांचे पालन दुकानदारांकडून होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने थेट करविला सुरुवात केली आहे. दुकानांसमोर होणारी गर्दी रोखणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे उल्लंघन होत असल्याने आणि त्यासाठी ज्या दुकानदारांनी खबरदारी घेवून उपाययोजना केली नाही अशा दुकानदारांचे दुकाने ४८ तास सील करण्याची कारवाई पुणे महापालिकेने सुरु केली आहे. आज महापालिका परिसरातील अशा ७ दुकानांना ४८ तासांसाठी सील ठोकण्यात आले. दरम्यान, नियम न पाळणाऱ्या दुकानदारांकडून किती दंड आकारण्यात यावा याबाबत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.