पुणे -महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण आज येथे शानदार सोहळ्यात करण्यात आले. या समारंभात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले,” कै. खाशाबा जाधव हे सर्वांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिन दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. क्रीडा पुरस्काराच्या रकमांमध्ये वाढ करावी ही गेली काही वर्षे मागणी होती त्यानुसार आम्ही जीवनगौरव पुरस्कारासाठी तीन लाख रुपये ऐवजी पाच लाख रुपये तर अन्य क्रीडा पुरस्कारांसाठी एक लाख रुपयाला आयोजित तीन लाख रुपये देण्याचे जाहीर करीत आहोत”. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवावा या दृष्टीने महाराष्ट्राच्या खेळाडूंना आम्ही काही कमी पडून देणार नाही आमचे शासन सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे.
भारतामध्ये प्रतिष्ठेचा क्रीडा स्पर्धांचे संयोजन करावे ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदैव इच्छा आहे. सन 2036 मध्ये या स्पर्धेचे संयोजन पद महाराष्ट्राला मिळावे या दृष्टीने महाराष्ट्राने आतापासून तयारी संयोजन पदांबरोबरच पथकांमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अधिकाधिक पदके मिळावी या दृष्टीनेही आत्तापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता आहे असे रमेश बैस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, लहान मुले मुली स्मार्टफोनच्या आहारी गेली आहेत तर अनेक युवक युवती वेगवेगळ्या अनिष्ट सवयींनी ग्रासली आहेत हे चित्र बदलण्यासाठी खेळांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्याची आवश्यकता पालकांनी आपल्या मुलांना त्यासाठी प्रोत्साहित करावे आणि सहकार्य करावे.
अजित पवार यांनी सांगितले की पुरस्कार वेळेवर दिले गेले तर त्याचे महत्त्व अधिक राहते, हे लक्षात घेऊनच यापुढे आम्ही क्रीडा पुरस्कार वेळेवर दिले जातील असा आमचा प्रयत्न राहणार आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर ऑलिंपिक व आशियाई क्रीडा स्पर्धां सारख्या प्रतिष्ठानच्या स्पर्धांमध्ये तिरंगा फडकवावा हीच आमची इच्छा आहे त्यासाठी आमचे शासन सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आहे.
यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही आपले विचार व्यक्त केले. राज्याचे क्रीडायुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी प्रास्ताविक केले.