#अबब..पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

क्राईम
Spread the love

पुणे–सराफी दुकाने फोडून सोने-चांदीवर डल्ला मारणाऱ्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विकीसिंह जालिंदरसिंह कल्याणी (31), विजयसिंह अंधासिंह जुन्नी उर्फ शिकलकर (19) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.

 दि. 20 सप्टेंबर रोजी वाकड रोड येथे या दोघांनी पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरले.  त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी निगडी येथील नवकार ज्वेलर्समधून 20 किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर 26 सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे सराफाचे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने गेल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली.

या परिसरात सातत्याने सराफाची दुकाने फोडली जात असल्याने पोलिसांनी कसून तपास सुरु केला. वाकड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांची दोन पथके तयार करुन या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही चोरीच्या ठिकाणी आणि आसपास असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. त्यादरम्यान निगडी येथील चोरी झालेल्या सराफाच्या दुकानापासून काही अंतरावर एक चारचाकी वाहन संशयास्पद आढळले. त्यावरून पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलिसांना चारचाकीच्या चोरीबाबत माहिती मिळाली. लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन चारचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या कारचा सराफाची दुकाने फोडून चोरी करण्याच्या प्रकरणात वापर झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी चारचाकी चोरीचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात शोधामोहीम हाती घेतली. तब्बल दहा दिवसात हाती लागलेले धागेदोरे, वेगवेगळ्या माहितीच्या आधारे, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास केला. या सर्व चोरींच्या गुन्ह्यांमागे सराईत गुन्हेगार विकीसिंह जालिंदरसिंह कल्याणी याची टोळी असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले.

पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून चारचाकी वाहनासह आरोपी कल्याणी आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले. त्याच्या कारमध्ये पोलिसांना दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन मिळाला. तर कल्याणी याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली. कल्याणीने वाकड रोडवरील पीआर ज्वेलर्स हे दुकान फोडल्याचे कबुल केले. त्यावरून दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *