पुणे—पुण्यातील खराडी परिसरात एका तडीपार सराईत गुंडाची दगडाने ठेचून आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. शैलेश दत्तात्रय घाडगे (वय 35) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील युवान आयटी पार्क जवळील एका मोकळ्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर चंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत व्यक्ती हा सराईत गुंड शैलेश घाडगे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. दरम्यान, हा खून कोणी? आणि का? केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शैलेश घाडगे हा चंदनगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून पोलिसांनी त्याला तडीपार ही केले होते. तसेच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. चंदन नगर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.