भोर नसरापूर केस: आरोपी भीमराव कांबळे मानसिकदृष्ट्या सक्षम, विशेष न्यायालयात दोषारोप निश्चित


पुणे(प्रतिनिधी)–पुणे येथील विशेष न्यायालयाने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षीय बालिकेवरील पाशवी लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे हा मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे स्पष्ट करत त्याच्यावर दोषारोप निश्चित केले आहेत. या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या खटल्याची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ (बंद खोलीत) आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश गुरुवारी दिले.

आरोपीचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असून, त्यात तो गुन्हा करण्याच्या वेळी आणि सध्या सुनावणीसाठी मानसिक व लैंगिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दिनांक १ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान आरोपीने नसरापूर येथील राम मंदिरासमोरून एका साडेतीन वर्षीय चिमुरडीला गाईचे वासरू आणि गाठीशेव दाखवण्याचे आमिष दाखवून  फुस लावून पळवून नेले होते. त्यानंतर तिला एका गाईच्या गोठ्याजवळील शेडमध्ये नेऊन तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केला. बालिकेने आरडाओरडा करू नये म्हणून तिचे तोंड दाबले आणि तिच्या छातीवर जोरात प्रहार करून तिचा निर्घृण खून केला. एवढेच नव्हे तर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्नही आरोपीने केला असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.

अधिक वाचा  चिनाब पूल : भारताच्या सामर्थ्याचं आणि अदम्य इच्छाशक्तीचं एक जिवंत प्रतीक

विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडताना ‘ओपनिंग ॲड्रेस’मध्ये भक्कम पुराव्यांची साखळी सादर केली. आरोपी बालिकेला घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज, दोघांना शेवटचे एकत्र पाहिलेल्या ग्रामस्थांचे जबाब, ओळख परेड, फॉरेन्सिक व डीएनए रिपोर्ट, वैद्यकीय अहवाल आणि आरोपीच्या कबुलीजबाबावरून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हे सर्व पुरावे आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पुरेसे असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकार पक्षातर्फे एकूण ८२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली असून, ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी या कामी सहकार्य केले.

दरम्यान, बचाव पक्षाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, दोषारोपपत्रात अपहरण आणि खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसा ठोस पुरावा नाही आणि ‘लास्ट सीन टुगेदर’ ही बाब ग्राह्य धरता येणार नाही. मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोषारोपपत्रातील पुरावे प्रथमदर्शनी भक्कम मानत आरोपी भीमराव कांबळे याच्यावर दोषारोप निश्चित केले. जेव्हा आरोपीला हे दोषारोप वाचून दाखवण्यात आले, तेव्हा त्याने सर्व आरोप फेटाळून लावले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love