स्वराज्यजननी जिजामाता!


छत्रपती  शिवाजी महाराज जन्माला यावे असे वाटत असेल तर त्याआधी तसे संस्कार घडवणाऱ्या राजमाता जिजाबाई जन्माला येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वत्र परकीय सत्तेचा काळोख पसरला होता. सर्वत्र अन्याय – अत्याचारांचे सत्र सुरु होते. त्यावेळी

दे अंबिके, दे शारदे मला वरदान दे !

या शूर मराठ्यांना एकत्र करुन जुलमी परकीय सुलतानाविरुद्ध उठणारा कोणी तरी प्रतापी पुरुष जन्माला येईल का? हे साकडे घालणारी ही वीरांगना म्हणजे राजमाता जिजामाता होय.

छत्रपती  शिवाजी महाराजांसारखे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व घडविण्यात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा महत्त्वाचा  वाटा होता. कारण  पातशाहीच्या विरोधात बंड करुन स्वतःचे राज्य निर्माण करणे हे सोपे काम नव्हते. ते धाडस शिवरायांनी केले कारण अगदी बालपणापासून शिवरायांना राजमाता जिजाबाईंनी त्यांना तसे घडविले होते. जिजाऊ माँसाहेबांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये  शिंदखेडा येथे लखुजी जाधव यांच्या घरी झाला. जाधवांचे मूळ घराणे देवगिरीच्या यादव यांचे!

अधिक वाचा  #Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास संपला: भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

पिढ्यांनपिढ्या शूर-वीरांसाठी जाधव घराणे प्रसिद्ध  होते. जिजाऊमाँसाहेबांचा विवाह महापराक्रमी शहाजीराजांशी झाला. त्यावेळी महाराष्ट्रात विजापुरचा आदिलशाह व अहमदनगरचा निजामशहा यांची सत्ता होती. तर उत्तरेचा मुघल बादशाह शाहजहाँन हा देखील महाराष्ट्रातील घडामोडीवर लक्ष ठेवून होता. या सर्व सत्तांच्या आपआपसातील युद्धात शूर मराठे सरदार मारले जात होते. या गोष्टीचे जिजाऊंना खूप वाईट वाटत असे. महाराष्ट्रात शौर्याची कमतरता नाही. मात्र गरज होती, सर्व मराठ्यांना एकत्र करुन न्यायाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची! हा निर्धार जिजाऊंच्या मनी धरला. अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला, १९ फेब्रुवारी १६३० ला शिवरायांचा जन्म झाला. माँसाहेबांनी मनी धरलेल्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली होती. शूर-वीरांची वीरवृत्ती व साधूसंतांचे परोपकारी जीवन या संस्कारांचे बाळकडू राजमाता जिजाबाईंनी शिवरायांना दिले. सज्जनांना राखावे! दुर्जनांना ठेचावे! हा बाणा शिवरायांमध्ये तयार झाला.

अधिक वाचा  कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स - मेधा पाटकर

राजमाता जिजाबाईंच्या कल्पनेतील हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. स्वराज्यावरील प्रत्येक संकटांच्या वेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब खंबीरपणे उभ्या राहिल्या. पन्हाळगडावरील वेढा हटत नव्हता त्यावेळी वेढा मोडण्यासाठी स्वतः माँसाहेबांनी हाती शस्त्र घेतले होते. शिवराय आग्रा येथे बादशाहच्या कैदेत असताना सहा महिने  स्वराज्य माँसाहेबांनी सांभाळले होते. पुरंदरच्या तहातील किल्ले शिवरायांनी पुन्हा  ताब्यात घ्यावेत म्हणून राजमाता जिजाबाई सतत प्रेरणा देत असत. शिवरायांनी राजमाता जिजामाता यांची सुवर्णतुला केली. ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक झाला. जे मनी धरले ते स्वप्न पूर्णत्वाला जातांना राजमाता जिजाबाईंनी पाहिले.  शिवराज्याभिषेकानंतर अल्पावधीतच रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई अनंताच्या प्रवासाला गेल्या.

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात  हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे शिवराय जसे तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान आहे, त्याप्रमाणेच राजमाता जिजाऊ माँसाहेब या शिवरायांचे प्रेरणास्थान होत्या. मध्ययुगीन महाराष्ट्रात काळ्याकुट्ट अंधारात स्वातंत्र्यांची ज्योत पेटावी म्हणून निरंतर प्रयत्न करणाऱ्या राजमाता जिजामाता तमाम महाराष्ट्रासाठी चिरंतन प्रेरणास्थान आहे.

अधिक वाचा  #Sharad Mohol Murder Case : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

 — प्रशांत नारायण कुलकर्णी

       मनमाड (नाशिक )

संदर्भ —

१. शिवभारत – परमानंद

२. सभासद बखर – कृष्णाजी अनंत सभासद

३ राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love