कोरोना काळ संपला की राज्य व केंद्र शासनाशी मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणार—आ. तानाजी सावंत

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने दिनांक 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत दशरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी जिजाऊरत्न सन्मान व जिजाऊ स्मृती सन्मान यांचे वितरण तंजावर तामिळनाडू येथील व्यंकोजीराजे यांचे थेट वंशज आदरणीय विजय राजे भोसले यांच्या हस्ते लाल महाल येथे मराठा सेवा संघाच्या वतीने  पार पडला.

यावेळी जयवंत शिक्षण  प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ,माजी मंत्री व विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना जिजाऊरत्न पुरस्कार ,सन्मानचिन्ह, शिंदेशाही पगडी, जिजाऊंची प्रतिमा व पुस्तक देऊन शिवश्री विजयराजे भोसले यांचे हस्ते गौरवण्यात आले .तसेच योगाचार्य शिवमती सुमन कुसळे यांना जिजाऊ स्मृती सन्मानाने जिजाऊंची प्रतिमा, साडी, गौरवपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी बोलताना आमदार तानाजी सावंत म्हणाले ” मराठा सेवा संघाचे कार्य हे कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून केवळ खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचे आहे. ज्या पद्धतीने जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले व संपूर्ण विखुरलेला मराठा समाज एकत्र करण्याचे कार्य जिजाऊंच्या विचारांनी झाले तोच विचार मनात ठेवून कोरोना काळ संपला की , सर्व मराठा संघटनांना एकत्र करून मराठा आरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारशी संघर्ष करण्याची घोषणा केली.मराठा समाजाच्या अडचणी सोडविण्याकरिता रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहील. भविष्यामध्ये मराठा समाजाने एकत्र येण्या वाचून पर्याय नाही सर्वांनी आपापसातले मतभेद विसरून समाजासाठी कार्य करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात 35 ते 40 टक्के असलेला हा मराठा समाज सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची क्षमता ठेवतो .मराठा समाजाकडे असणारी जमीन ही वारसाहक्काने तुकडे होऊन गुंठ्यावर आली. आज सर्व झोपडपट्टी मधे राहणारेंपैकी मोठ्या प्रमाणात लोक राहतात. सर्वसाधारण कामगार वर्ग व अत्यल्प उत्पन्न झालेल्या समाजास मोठे राजकारणी लोकांकडे पाहून आरक्षण डावलले जात आहे.आज या ठिकाणी जिजाऊंच्या लाल महालामध्ये माझा मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने केलेला सन्मान मी मोठ्या आदरपूर्वक स्वीकारतो आणि भविष्यामध्ये जिजाऊंच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काम करण्याचा प्रयत्न करत राहील असे आश्वासन मी देतो. “

यावेळी तंजावर राजघराण्यातील आदरणीय विजय राजे भोसले यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले व भविष्यामध्ये मराठा सेवा संघ  यांचे विचार समाजाला व लोकशाहीला मार्गदर्शक असतील असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे पुणे शहराध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर व मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर यांनी केले होते.

 नगरसेवक योगेश समेळ, एकता योगा ट्रस्टचे नाना निवंगुणे , नीता रजपूत , सीमा महाडिक , हर्षवर्धन मगदुम, राजेंद्र बलकवडे,अनुसया ताई गायकवाड , वंदना इंदापूरकर, आरती घुले,नंदा कवळे ,प्रफुल्लता वडके स्वाती अंदुरे डॉ. चंद्रकांत कुंजीर  ,अण्णा तळेकर, शिवाजीराव कुसळे , राकेश भिलारे ,  साईनाथ भांडगे ,  राकेश नामेकर ,  गुरु कट्टी , कैलास अवताडे इत्यादी यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *