साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून साखरप्रश्नी सर्वपक्षीयांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे उचित होईल, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली.

वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे आयोजित साखर परिषद-2022 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱया समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी एकत्र यावे. साखर उद्योग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्वीकारून भविष्याचा वेध घेतला, तर चांगली प्रगती साधता येईल. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेल्या उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱयांना संघटीत करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आपला शेतकरी कष्टात मागे पडत नाही. आपला कृषिप्रधान देश आहे. साखर, इथेनॉलच्या मागणीबाबत बाजाराचा अभ्यास करून कोणते उत्पादन करून बाजारपेठ काबीज करावी याचे मार्गदर्शन करावे लागेल. त्याच्या कष्टाला योग्य किंमत मिळावी, यासाठी योग्य दिशा द्यावी लागेल. राज्य शासन साखर उद्योगाच्या उत्कर्षासोबत या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

 इथेनॉलचे महत्त्व लक्षात घेता त्याच्या निर्मितीवरही विशेष लक्ष द्यावे लागेल. ऊसतोड कामगार, शेतकरी, साखर कारखानदार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतील, तर त्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. साखरप्रश्नी सर्वपक्षीयांनी पुढे यावे. सर्व मिळून दिल्लीत जाऊ. पंतप्रधानांची भेट घेऊ. गडकरी यांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *