२४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम पुण्याच्या ‘राजपथ इन्फ्राकॉन’च्या नावावर:लिम्का बुक’मध्ये नोंद


पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान ३९.६५ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले. एका दिवसात ३० किमीचा रस्ता तयार करण्याचा संकल्प असताना ‘राजपथ’ टीमने तब्बल ३९.६९ किमीचा रस्ता तयार करत विक्रम स्थापित केला.उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. ३९.६९ किलोमीटरचा हा रस्ता रविवारी (३० मे) सकाळी सात ते सोमवारी (३१ मे) सकाळी ७ या वेळेत म्हणजेच २४ तासात तयार करण्यात आला. साडेतीन मीटर रुंद आणि ३९.६९ किलोमीटर लांबीचा हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, गोपूज, म्हासूर्णे असा होता. जवळपास ४७४ कामगार आणि २५० वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले. कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा उपक्रम झाला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदा साळुंके, श्री. मुंगळीवार, माजी अभियंता एस. पी. दराडे आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  रंगमंचावर आलं की मला इलेक्ट्रीफाइन झाल्यासारखं वाटतं- विक्रम गोखले

जगदीश कदम म्हणाले, “पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन कंपनीला सातारा जिल्हयातील पुसेगाव ते म्हासुर्णे ह्या ४७ किलोमीटर रस्त्याचे काम हॅमअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले होते. यंदा महाराष्ट्र राज्य एकसष्टी साजरी करत असल्याने राज्याला मानवंदना देण्यासाठी, तसेच या कोविडच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मकता पेरण्यासाठी हा विश्वविक्रम करण्याची संकल्पना आली. राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने एका दिवसात ३९.६९ किलोमीटर डांबरीकरणाचा रस्ता तयार करून विश्वविक्रम करण्याचा संकल्प पूर्ण केला. हा विश्वविक्रम राज्यातील जनतेला समर्पित करतो.”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण व सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्दर्शन व सहकार्य लाभले. साताराचे जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, व शासनाच्या सर्व  विभागांनी चांगले सहकार्य  केले. राजपथ इन्फ्राकॉनमधील माझ्या सर्व सेवक सहकार्यांनी हा विश्वविक्रम संकल्प तडीस नेण्यासाठी अहोरात्र झटून मनापासून प्रयत्न  केले. हा विश्वविक्रम करतांना या सर्व मंडळीचे मन:पूर्वक योगदान राहिले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच राजपथ कंपनी हा विश्वविक्रम पुर्णत्वास नेऊ शकली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो,” असे जगदीश कदम यांनी नमूद केले.

अधिक वाचा  #Naval Chief Admiral R. Harikumar: २०४७ पर्यंत संपूर्ण नौदल आत्मनिर्भर होईल- नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार

उल्हास देबडवार म्हणाले, “कोरोनामुळे कामाला अडथळा येत होता. पण या कठीण काळात अशी अनोखी कल्पना जगदीश कदम व राजपथने मांडली. अशा नकारात्मक वातावरणात हा संकल्प पूर्ण करून प्रेरणा देण्याचे काम राजपथने केले आहे. राज्यात पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध असून, अशा कार्यक्षम कंत्राटदारांनी दर्जेदार कामे कमी वेळेत केली तर राज्यातील जनतेला चांगले रस्ते मिळतील. या रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा नियमित स्वरूपात तपासला जात आहे. जगदीश कदम यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”

*असा झाला विक्रम*

या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले. ३९.६९ किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक होते. या कामासाठी एकूण १५,००० मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते. काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी आठ पेव्हर, १६ टँडम रोलर व आठ पीटीआर वापरण्यात आले. या मटेरीअलची ने-आण करण्यासाठी एकूण २१० हायवा टिप्पर वापरण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते. एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते. यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.

अधिक वाचा  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखल केला पिंपरी- चिंचवड महापालिकेवर फौजदारी खटला: का केला खटला दाखल?

*राजपथ इन्फ्राकॉन यशस्वी वाटचाल*

राजपथ कंपनीची स्थापना ३२ वर्षापूर्वी झाली. सुरूवातीपासून कंपनीने पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांमध्ये स्वत:चा ठसा उमटविण्याला. राष्ट्रनिर्मितीच्या कामात कंपनीचा असलेला सहभाग खारीचा वाटा असल्यासारखा आहे. परंतू या गोष्टीचा राजपथ इन्फ्राकॉन कंपनीतील प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. आजपर्यंत राजपथ कंपनीने अनेक प्रशंसनीय व गौरवाला पात्र असलेली कामे पायाभूत सुविधा उभारणीच्या क्षेत्रात केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधा-याचे धरणाचे काम पाच महिन्यात केले. जागतिक बँक व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा उजवा कालव्याच्या १४८ किलोमीटरचे काम वेळेत व उत्तम गुणवत्तेसह पुर्ण केल्यामुळे जागतिक बँकेने कौतुक केले. राज्यातील खारपाण पट्‌टयातील अमरावती जिल्ह्यात पहिल्या क्रॉकीट बॅरेजचे काम पुर्ण केले. तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतीभवन येथे सन्मान केला. राजपथने नागपूर-हैद्राबाद ह्या राष्ट्रीय महार्गावरील १० वर्ष प्रलंबित असलेल्या व दोनदा टर्मिनेट झालेल्या चार पदरी रस्त्याचे काम विक्रमी दोन वर्षात पुर्ण केले. त्यानिमित्त एनएचएआयने सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स देऊन गौरवले आहे. राजपथ कंपनीने गेल्या साडेतीन दशकात चांगले काम करत महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक, एनएचएआय, एअरपोर्ट ऍथॉरीटी आदीकडून अनेक सन्मान प्राप्त केले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love