भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवरमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त जपली मराठी संस्कृती

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पिंपरी(प्रतिनिधी)-जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मराठी राजभाषा दिन आपली मराठी संस्कृती जपत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कथा, कविता, कादंबरी वाचन; संतांचा पेहराव करीत गवळण, भारुड, अंताक्षरी, वासुदेवाचे सादरीकरण करीत मराठी भाषेचे महत्त्व सांगितले.

संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, तसेच ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हर्षा बांठिया, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिया मेनन, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, सुषमा शिरावले, नीलम मेमाने, मनिषा पुराणिक, संजीवनी बडे, शारदा पोफळे, प्रीती पाटील, हेमाली जगदाळे, कशिश कणसे, भटू शिंदे आदींसह सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा सादर करीत महाराष्ट्रीयन संस्कृती जपली पाहिजे, हे सादरीकरणातून स्पष्ट केले. यामध्ये देवराज मोरे या विद्यार्थ्याने वासुदेवाची भूमिका, प्रसाद पाटील या विद्यार्थ्याने संत तुकाराम महाराजांची भूमिका, तर पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी नृत्य अविष्कारातून गवळण सादर केली. पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितांचे वाचन करीत मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांची मराठी गाण्यांवर अंताक्षरीही घेण्यात आली.

लिटल फ्लॉवरच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत ग्रंथांचे पूजन केले व संतांचा पेहराव करून संतांची ओळख करून दिली. समूह नृत्य, कविता, चारोळ्या यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच रंग साहित्याचे नाटकाद्वारे कथा, कविता, नाटक, कादंबरी अशा साहित्य प्रकारांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांचा उत्साह अद्वितीय असा होता.

संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी विद्यार्थ्यांना मराठी संस्कृतीची जपणूक केली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. आशा घोरपडे यांनी आज स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषा देखील आपल्या जीवनात महत्त्वाची आहे हे सांगितले. हर्षा बांठिया यांनी मराठी साहित्याचा इतिहास सांगितला, तर प्रिया मेनन यांनी मराठी भाषेचे संवर्धनासाठी प्रयत्नशील राहण्यावर भर दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *