राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या अहिल्यादेवी

Ahilya Devi who nurtures national unity
Ahilya Devi who nurtures national unity

धर्म स्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । 

झाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥ 

सत्ताधारी असूनही सिंहासनावर नसणार्या् आणि कर्मयोगासोबतच भक्तियोग साध्य केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निस्सीम शिवभक्त होत्या. शिवाच्या अध्यात्मिक अधिष्ठानाला कुठेही धक्का न लावता त्यांनी परंपरांचे जतन केले. धर्मकारणासोबतच राजकारण आणि समाजकारणही अत्यंत कुशलतेने केले. समाजातील अनिष्ट प्रथांचे कधी समर्थन केले नाही. भारताच्या चारी दिशांना मंदिरे, धर्मशाळा बांधल्या, घाट बांधले. विहिरी-तळे खोदली, अन्नछत्रे चालविली. अर्थातच धर्माचा गाभा असलेली राष्ट्रीय एकात्मता जपली.समर्थ रामदासांची ‘धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार॥’ही ओवी अहिल्यादेवींच्या जीवनप्रवासासाठी अगदी सार्थ अशीच आहे. एक प्रकारे होळकर घराण्याला त्यांच्या रुपाने ईश्वराचं देणंच लाभले होते. 

हे कर्मयोगिनी राजयोगिनी जयतु अहिल्यामाता ।

युगों युगों तक अमर रहेगी यशकीर्ति की गाथा ।

जय जयतु अहिल्यामाता । जय जयतु अहिल्यामाता ॥

महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिरी होती. कित्येक कोटींच्या धनाची मालकीण असलेल्या अहिल्यादेवींच्या स्वतंत्र कारभाराचा आरंभ महेश्वरातून झाला. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना होळकरशाहीच्या राज्यकारभारासाठी अधिकृतपणे नियुक्त केले गेले.नित्यनेमाने देवदेवतार्चन करणार्याह, पोथ्यापुराणे वाचणार्यात अहिल्यादेवी उत्तम प्रशासकही होत्या. अहिल्यादेवींनी कारभार हाती घेतला त्यावेळी केलेली प्रतिज्ञा आजही महेश्वरच्या वाड्यात हिंदीमधून लिहिलेली आहे. 

ईश्वर ने मुझ पर जो उत्तरदायित्व रखा है, उसे मुझे निभाना है । मेरा काम प्रजा को सुखी रखना है, मैं अपने प्रत्येक काम के लिए जिम्मेदार हूं । सामर्थ्य व सत्ता के बल पर मैं यहॉं जो कुछ भी कर रही हूं , उसका ईश्वर के यहॉं मुझे जवाब देना होगा । मेरा यह सब कुछ नही है, जिसका है, उसी के पास भेजती हूं । जो कुछ लेती हूं, वह मेरे उपर ऋण (कर्ज) है । न जाने उसे कैसे चुका पाऊंगी । – देवी अहिल्याबाई 

अहिल्यादेवींचा कारभार सुरु झाल्यावर सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार, देवधर्माची व्यवस्था, शेतीमालाची वाहतूकआणि न्यायव्यवस्थेसह राज्यातील अन्य व्यवस्थांची काटेकोरपणे चौकशी होऊ लागली आणि अंतीम निर्णय अहिल्यादेवी देऊ लागल्या. महेश्वर येथे अहिल्यादेवींच्या कृपेने विणकरांच्या उद्योगाने चांगले मूळ धरले, त्यामुळे भरतखंडाच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणार्याय माळवा प्रदेशातले महेश्वर हे मुख्य केंद्र बनले. अहिल्यादेवींच्या उत्तम प्रशासकीय धोरणांमुळे त्यांच्या होळकरशाहीच्या कारभाराची घडी व्यवस्थित बसली होती. राजकारणासोबतच त्यांच्या जनहितकार्य आणि देवाधर्माच्या कार्याला कोणतीही सीमा नव्हती, त्यांचे मंदिर जीर्णोद्धाराचे कार्य भरतखंडात चारी दिशांना पसरत होते. चित्रकूटच्या मंदिरातील रामपंचायतन मूर्तीची स्थापना त्यांचेकडून झाली होती. अशी अनेक मंदिरे आणि मूर्तींची अहिल्यादेवींकडून स्थापना झाली होती. चित्रकूटला स्थापन करावयाच्या मूर्ती सरकारी माणसाकडून पाठवल्या होता, त्या मूर्ती सुखरुप जागी पोहोचल्या पोहोचल्या की खरी कार्यसिद्धी होणार होती. त्यावेळी त्या रामाची करूणा भाकत होत्या, ‘रामराया, प्रवास दूरचा आहे. आपल्या जागी सुखरुप विराजमान व्हावे. आम्ही कृतकृत्य होऊ.’अखंड परमेश्वर चिंतन आणि जनहितरक्षण या दोन तत्वांना अनुसरुन त्यांचा जीवनप्रवास चालू होता. जणू काही त्यांनी समर्थ रामदासस्वामींच्या समर्थ चतु:सूत्रीलाच आपल्या जीवनाचे अधिष्ठान बनविले होते.

अधिक वाचा  पुण्यातील भन्नाट नावांच्या मंदिरांनी उत्सुकता चाळवत,आपलेपणा जपला - गाडगीळ

मुख्य हरिकथा निरुपण । दुसरे ते राजकारण ।

तिसरे ते सावधपण । चवथा अत्यंत साक्षप ॥

समर्थ विचारांनीच जणू काही त्यांना घडविले होते, कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचविले होते. समर्थांनी वर्णन केलेल्या अर्चनभक्तीला‘आर्चन म्हणिजे देवतार्चन । शास्त्रोक्त पूजाविधान ।’या ओवीला साजेसे महेश्वरच्या वाड्यात आजही त्यांचे सुंदर देवघर आहे.  

धातुपाषाणमृत्तिकापूजन । चित्रलेपसत्पात्रपूजन ।

आपले गृहीचे देवतार्चन । या नाव पांचवी भक्ती ॥

परमार्थाची आवड असली की, परोपकाराची तत्परता आपोआप निर्माण होतेच. अशा वृत्ती अंत:करण निर्मळ असलेल्या सात्विक लोकांमध्येच निर्माण होतात. अशी माणसे नाना प्रकारची दाने देतात, व्रते करतात, मंदिरांना मदत करतात. याचे वर्णन समर्थांनी दासबोधात केले आहे.

तीर्थी अर्पी जो अग्रारे । बांधे वापी सरोवरे ।

अधिक वाचा  कोणत्या देवाने सांगितल की मुलं आर्ध्या चड्डीत आल्यावर त्यांना दर्शन घेऊ देऊ नका- अजित पवार

बांधे देवालये सिखरे । तो सत्वगुण ॥

देवद्वारी पडशाळा । पाईरीया दीपमाळा ।

वृंदावने पार पिंपळा । बांधे तो सत्वगुण ॥

संध्यामठ आणि भुयेरी । पाईरिया नदीतीरी ।

भांडारगृहे देवद्वारी । बांधे तो सत्वगुण ॥

नाना देवांची जे स्थाने । तेथे नंदादीप घालणे ।

वाहे अलंकार भूषणे । तो सत्वगुण ॥

महेश्वरात अहिल्यादेवींनी कितीतरी सुंदर घाट बांधले आहेत. त्यापैकी एक घाट खास अहिल्यादेवींसाठी होता. दुसरा घाट पेशव्यांच्या सन्मानार्थ बांधला होता. मंडाल खो घाट किंवा कालेश्वर घाट, तीळबाणेश्वर घाट आणि सिद्धेश्वर घाट हे अहिल्यादेवींच्या कारकीर्दीत महेश्वरात बांधले गेलेले घाट आहेत. काशीमध्ये मनकर्णिका घाट आणि माहेरी चौंधे गावच्या नदीवर आणि मंडलेश्वर येथे, हरिद्वारमध्ये कुशावर्त आणि हरि की पौडी या ठिकाणीही अहिल्यादेवींनी घाट बांधले.  भारतात अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, शंकराची मंदिरे स्थापन केली. अयोध्या, पंढरपूरयेथे श्रीराम मंदीर बांधले. जांबगावी रामदासस्वामींच्या मठाला मदत दिली. गंगोत्रीला विश्वनाथ, केदारनाथ, भैरव आणि अन्नपूर्णा अशी चार मंदिरे आणि सहा धर्मशाळा बांधल्या. केदारनाथला धर्मशाळा आणि पाण्याची कुंडे बांधली. भारतात अनेक ठिकाणी विहिरी खोदल्या, तलाव बांधले, अन्नछत्रे सुरु केली. चिंचवड येथे गरीबांना दान मिळण्याची व्यवस्था केली. चिखलदा येथे नर्मदेची परिक्रमा करणार्यांकसाठी एक अन्नछत्र चालू केले. कोल्हापूर, द्वारका येथे मंदिराच्या पूजेची व्यवस्था केली. उज्जैन येथे चिंतामणी गणपतीचे मंदिर बांधले आणि महाकालेश्वराच्या पूजेची व्यवस्था केली. 

अधिक वाचा  राज्यात लॉकडाऊन लागलाच तर? असा असेल लॉकडाऊन

भंगली देवालये करावी । मोडली सरोवरे बांधावी ।

सोफे धर्मशाळा चालवावी । नूतन चि कार्ये ॥

नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार ।

पडिले कार्य ते सत्वर । चालवित जावे ॥

अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वराच्या, परळीच्या वैजनाथ मंदिराचा आणि वेरुळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. गौतमेश्वर आणि अहिल्योद्वारकेश्वर नावांची मंदिरे बांधली. गजनीच्या मोहम्मदाने तोडफोड केलेले सोमनाथ मंदिर पुन्हा उत्तम प्रकारे बांधले आणि त्यात मूर्तीची स्थापना केली. 

अहिल्यादेवींनी स्वत:चे मोठे ग्रंथागार उभे केले होते. त्यामध्ये शेकडो ग्रंथ होते. प्रसंगपरत्वे निरनिराळ्या ग्रंथाचे ब्राह्मण वाचन करीत असत. अहिल्यादेवी श्रवण करीत असत. त्या जेव्हा ऐकायला बसत त्यावेळी भोवताली महेश्वरची रयतही असे. महेश्वरमधील या ग्रंथागारामध्ये  विद्वान ब्राह्मणांची अध्ययनासाठी नेहमीच ये जा असे. अहिल्यादेवींना माणसांची उत्तम पारख असल्यामुळे आणि त्या नेहमीच त्यांची नेहमीच कदर करीत असल्यामुळे राज्यकर्त्या म्हणूनही त्या यशस्वी होत्या. राज्यकारभारासंदर्भात कोणी कितीही दबाव आणला तरी अहिल्यादेवी नमत नव्हत्या. 

अहिल्यादेवींच्या एकूणच सर्व जनहितकारक, कल्याणकारी कार्यासाठी भगवंताचे अधिष्ठान होते, त्यामुळे त्यांनी योजिलेली सर्व कार्ये, सर्व संकल्प यशस्वीच होत होते. अगदी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे 

सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।

परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥

डॉ.सौ. शिल्पा जितेंद्र शिवभक्त, नाशिक

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love