सावरकर समजून घेताना : भाग ६ वि. दा.सावरकर : आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते


सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक नव्हते असा उल्लेख मागील एका भागामध्ये आलेला आहे, पण मग सावरकरांचे हिंदुत्व नेमके कसे होते हे आपण या भागातून पाहणार आहोत.

हिंदुत्वाबद्दल सावरकर स्वतः म्हणतात की;

” हिंदुत्व याचा अर्थ, हिंदुधर्म या शब्दर्थ्यांशी पुष्कळ लोक समजतात तसा सामान नाही. धर्म या शब्दाने सामान्यतः कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा धार्मिक पंथाच्या किंवा मताच्या नियमांचा किंवा सिद्धांताचा संग्रह असा अर्थ घेतला जातो. भाषेची पद्धती जर आमच्या वाटेला आली नसती, तर ‘ हिंदूपणा ‘ हाच शब्द ‘ हिंदुधर्म ‘ या शब्दापेक्षा हिंदुत्वाशी अधिक जवळ म्हणून (हिंदुधर्माऐवजी) आम्ही योजला असता. हिंदुत्व या शब्दामध्ये आमच्या ‘ हिंदुजातीच्या अस्तित्वाची प्रत्येक क्रिया, नि प्रत्येक विचार यांच्या सर्व शाखा समाविष्ट होतात. “

सावरकरीय हिंदुत्वामध्ये प्रामुख्याने कोणत्या बाबी येतात हे पाहुयात.

हिंदुजगत संघटित करणे:

कोणतेही राष्ट्र प्रबळ, बलवंत करावयाचे असल्यास, त्याचे स्वत्व टिकवून ठेवणे हे आवश्यक असते, त्याचप्रमाणे हिंदूंचे अस्तित्व टिकून राहावे वाटत असेल तर,

अधिक वाचा  सावरकर समजून घेताना :भाग-३ अस्पृश्योद्धारक : वि. दा. सावरकर

हिंदुजगताचे संघटन उभारणे आवश्यक असते. हिंदूंचे असे प्रबळ संघटन उभारण्यासाठी, आपापसातील गुण, दोष स्वीकारून प्रसंगी आंतरिक संघर्ष संपवून टाकणे हे पोषक आहे. म्हणूनच रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसाय बंदी, सिंधूबंदी, वेदोक्तबंदी, शुद्धीबंदी, स्पर्शबंदी आदी सप्तबंदीच्या बेड्या तोडणे हे प्रमुख कार्य आहे.  ( सद्यस्थितीला कायद्यानेच या बंदी बाद ठरवल्या असल्यातरी, जर समाजामध्ये या बंदी पुन्हा फोफावू लागल्या तर त्यांचा कडवा प्रतिकार करणे, हे सावरकरांना अभिप्रेत आहे.)

राजकारणाचे हिंदूकरण :

आपला देश लोकशाही पद्धतीचा स्वीकार करणारा असल्याने, समाजहिताचे निर्णय अंतिमतः जर राजकीय नेतृत्वच घेणार असेल तर, हिंदूंचे अहित करणारे निर्णय टाळण्यासाठी राजकारणाचे हिंदूकरण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण निवडून दिलेलं लोकप्रतिनिधी जर जाणून बुजून हिंदुहिताच्या विरोधात वागत असतील तर त्यांना जाब विचारणे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे :

हिंदूंनी केवळ भोळसट, बाळबोध, जुन्या अनिष्ट रुढींचे अंधानुयायी, अडाणी न राहता, स्थलकाल परत्वे जगामधील अत्याधुनिक यंत्रांचा, तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यायोगे हिंदुजगताची ऐहिक, समृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

राष्ट्राप्रती प्रामाणिक राहणे :

मागील एका भागामध्ये सावरकरांच्या एका भाषणाचा संदर्भ दिला होता, त्यातील दुसरा भाग हेच सांगतो की; हिंदूंनी स्वतःशी हिंदू म्हणून जितके प्रामाणिक असले पाहिजे तितकेच राष्ट्राशी प्रामाणिक असले पाहिजे.

अधिक वाचा  केशवम स्मरामी सदा परमपूजनीयम !!!

प्रत्याघाताचे धैर्य राखणे :

” …. आपल्या एका लेखामध्ये सावरकर सांगतात, हिंदुधर्म म्हणजे क्लैब्याची गाथा आहे असे समजू नये. ‘ अहिंसा परमो धर्म : ‘ अशी शिकवण असणाऱ्या क्षमाशील आणि सात्विक हिंदुधर्मामध्ये आततायी आणि उन्मत्ताना शासन करण्याची देखील आज्ञा आहे…. “

थोडक्यात जर कोणी आततायीपणे, उन्मत्तपणे हिंदुजगतावर आक्रमण करत असेल तर त्यांस संघर्ष करून योग्य ते शासन करणे हे देखील हिंदुत्वच आहे.

सावरकरांनी हिंदू संघटन आणि राजकारणाचे हिंदूकरण करण्याचे समर्थन, प्रतिपादन जरी केले असले तरी, अल्पसंख्यांच्या विधायक हक्कांचा अव्हेर केलेला नाही. त्यांची लोकशाही संदर्भातील समीकरणे स्पष्ट होती, एक माणूस एक मत हे मांडणारे सावरकर हे त्याकाळातील पहिले नेते होते.

दुसरे असे की; राजकारणामध्ये संख्याबळाला महत्व असते त्यामुळे, हिंदुजगताच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या राजकीय, सामाजिक नेतृत्वाकडे राष्ट्राची धुरा देणे यासाठीदेखील हिंदूसंघटन उभे करण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली आहे.

अधिक वाचा  दुर्दम्य आशावादी - कर्मवीर भाऊराव पाटील

अशाप्रकारचे जात-पात विरहित, राष्ट्राप्रती प्रामाणिक करणारे, अद्यतन समाजाचा स्वीकार करणारे, प्रत्याघाताचे-संघर्षाचे धैर्य राखणारे, हिंदुसमाजाची सामाजिक आर्थिक तसेच राजकीय प्रगती करणारे हिंदुत्व हेच सावराकरीय हिंदुत्व होय.

सावरकरीय हिंदुत्वाचा गाभा एवढाच आहे की; वर्तमान आणि भविष्य यांच्यामध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये टिकून राहणारा, अग्रणी राहणारा हिंदुसमाज निर्माण करणे.

तथापि समाजातील प्रत्येक व्यक्तीने विशेषतः तरुणाईने, सावरकरीय हिंदुत्वाला जातीय, संकुचित, धर्मवेडाकडे किंवा धर्मांधतेकडे नेणारा विचार असे न समजता, त्यातील प्रागतिक विचार लक्षात घ्यावा आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये हिंदू नसेल, त्या त्या क्षेत्रामध्ये मग ते व्यवसाय असोत, नोकरी असो, कला असो, क्रीडा असो, राजकारण असो, समाजकारण असो, प्रशासकीय यंत्रणा असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो तेथे हिंदुत्वाने प्रेरित असणारे हिंदुजगत कसे पोहोचेल, वृद्धिंगत होईल या करता प्रयत्नशील असावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या भागाचा समारोप करतो.

श्रीपाद श्रीकांत रामदासी

प्रवर्तन प्रतिष्ठान पुणे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love