आद्यकवी महर्षी वाल्मिकी

महाराष्ट्र लेख
Spread the love

महर्षी वाल्मिकींची कथा खूपच रोचक आणि अर्थपूर्ण आहे. चांगल्या संगतीत राहिल्याने माणसाचा कसा उद्धार होतो, याचे वाल्मिकी हे एक उत्तम उदाहरण आहे. देवर्षी नारदमुनींच्या सहवासात आल्यानंतर वाल्मिकी एक थोर संत झाले, ब्रम्हर्षी झाले आणि त्यांनी सर्व जगाला अलौकिक असे ‘रामायण’ नावाचे महाकाव्य दिले. हिंदू धर्मात एक पवित्र धार्मिक ग्रंथ म्हणून ‘रामायण’ला अनन्यसाधारण महत्व आहे. ऐतिहासिक संशोधनानुसार रामायणाचा रचना काळ इ.स.पू.५०२२ ते इ.स.प्.५०४० पहिले शतक यादरम्यान निर्धारित केला गेला आहे. रामायणाच्या अभ्यासाने माणसाच्या जीवनात शुभ परिवर्तन घडून येते. जगातील अनेक देशांतले लोक हे महाकाव्य आपल्याला भाषांतून वाचतात. अशा श्रेष्ठ संत वाल्मिकींनी आपल्याला रामायणासारखे महाकाव्य दिले, त्यांना आपण कदापीही विसरू शकत नाही. म्हणूनच महर्षी वाल्मिकींच्या जयंतीनिमित्ताने या महान, आद्यकवींना मनोभावे वंदन करूया.

श्रीरामकथांचा सुंदर गुच्छ म्हणजे रामायण.  खरे तर रामराज्य हेच मुळी समरसतेच्या आधारावर आहे. १० व्या शतकातील ओक्कुत रामायणात  रामाच्या समता आणि समदृष्टीचा उल्लेख आहे, तर तमिळ रामायणात राम  सर्वराजा आहे. तेलगु भाषेतील द्विपद रामायणामध्ये ‘राज्याचा आधार म्हणजे सर्वांचे उत्थान’ असा आहे. रंगनाथ रामायणात भरत-हनुमान संवादामध्ये समरसतेचा भाव दिसतो. उत्तररामायण, मोल्ल रामायण, गोपीनाथ रामायण ही सर्व तेलगु रामायण आहेत. त्यामध्ये श्रीरामाच्या समरसतावादी चरित्राचा उल्लेख आहे. १२ व्या शतकातील कंबनकृत रामायण सांगते की, प्रभूश्रीरामाच्या राज्यात कोणत्याही प्रकारचे भेद नव्हते. सर्व प्रकारची रामायण १० व्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत रचलेली आहेत. मल्याळी भाषेत अध्यात्मरामायण, कानडी भाषेत जेमिनी भारत रामायण, आसामच्या बोडो जातीचे ‘बोडो रामायण’ तिथे खूप प्रसिध्द आहे. संथाल जातीमध्ये ‘संथालारामायण’ प्रचलित आहे. विर्होर जातीमध्ये शबरीच्या  कथेचा सन्मानपूर्वक उल्लेख असलेले ‘विर्होररामायण प्रसिध्द आहे. मुंडा जातीचे जातीमध्ये ‘मुंडा रामायण’ आहे. अशी दि बुलेटिन ऑफ ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आदिवासी, भटके विमुक्त अशा जातींमध्ये विविध अशा २४ प्रकारच्या रामायणाचा उल्लेख आहे. सर्व भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे. त्यातील रामकथांना समरसतेचा आधार आहे. महर्षी वाल्मिकी रामायण तुलसीरामायणाशिवाय जितकेही रामायण देशभरात विद्यमान आहेत त्या सर्व रामायणामध्ये रामाचे चरित्र आणि रामकथांचे वर्णन आहे त्या सगळ्यांचा आधार वाल्मिकी रामायण आहे.  म्हणून ते  आद्य आहे.

       ..२..

हिंदू पंचांगानुसार महर्षी वाल्मिकींचा जन्म महर्षी कश्यप आणि अदितीचे नववे पुत्र असलेल्या वरुण आणि त्यांची पत्नी चर्षिनी यांचे घरी अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेच्या तिथीला झाला. महर्षी भृगु हे वाल्मीकींचे बंधू होत, तेही अत्यंत ज्ञानी होते. वाल्मिकींचा जन्मदिवस ‘वाल्मिकी जयंती’  या नांवानेच देशभर साजरा केला जातो. वैदिक काळातील  महान ऋषी परंपरेतील महर्षी वाल्मिकी हे ‘रामायण’ या महाकाव्याचे विश्वविख्यात निर्माता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते संस्कृत भाषेमध्ये निपुण होते.

महर्षींनी रामकथा लिहिली, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या मनातील प्रेम, आपुलकी, माया आणि संवेदना किती तीव्र होत्या हेच पहायला मिळते. एके दिवशी महर्षी वाल्मिकी तमसा नदीवर स्नानासाठी जात असताना त्यांना सारस पक्षांची जोडी विहार करताना, प्रणयक्रीडा करताना त्यांच्या दृष्टीस पडले. काही वेळाने एका शिकाऱ्याच्या बाणाने नर सारसाचा वेध घेतल्याने, त्या पक्षाला तडफडून आपल्या प्राणास मुकावे लागले.  त्याच्या वियोगाने  मादी सारस सैरभैर होत, तिचा  धीर-गंभीर आवाजातील शोक आसमंतात घुमला.  शिकाऱ्याची क्रूरता पाहून आणि मादी सारसाचा आक्रोश ऐकून महर्षी विव्हल झाले,  त्यांचे हृदय पिळवटून गेले. त्या पक्ष्यांबद्दल त्यांच्या मनात अतीव करुणा दाटून आली. प्रणयक्रीडेमध्ये रममाण झालेल्या पक्षाची हत्या करत, त्यांना दुःखसागरात ढकलून त्यांना एकमेकांपासून अलग करणे हे अत्यंत कठोर तर आहेच, त्यापेक्षा हा मोठा अधर्म आहे.  या प्रसंगाच्या प्रभावाने त्यांच्या मुखातून अतिशय उस्फुर्तपणे आणि उत्कटतेने शब्द प्रकटले :

       मा विषाद प्रतिष्ठांत्वगम: शाश्वतीः सम:| यत् क्रौंचमिथूनादेकमवधीरू काममोहितम् ||

भावार्थ:- हे शिकाऱ्या(निषाद)| ‘तुला कधीही शांती मिळणार नाही कारण तू कोणताही अपराध नसताना, कामक्रीडेमध्ये मग्न असलेल्या सारस(क्रौंच) पक्षाच्या जोडीतील एकाची हत्या केली आहेस.’

अगदी अचानक आणि सत्वरतेने आपल्या मुखातून असे श्लोक कसे बाहेर पडले असा विचार करतच महर्षी आपल्या आश्रमात पोहोचले. पुनः पुन्हा त्यांचे मन त्या श्लोकाभोवती फिरू लागले.

काही वेळाने आश्रमात भगवान ब्रम्हाजींचे आगमन झाले. त्यांनी महर्षींना सांगितले की, ‘आपल्या मुखातून सहज गाता येईल असे तुमचे हे छंदोबद्ध काव्य श्लोकासारखे झाले आहे. माझ्या प्रेरणेतूनच तुमची वाणी अशा प्रकारे श्लोकरूपी झाली आहे. म्हणूनच आपण श्लोक रुपाने श्रीरामाच्या संपूर्ण चरित्राचे वर्णन करायला सुरुवात करा.’ अशा प्रकारे भगवान ब्रम्हाजींच्या सांगण्यावरून महर्षी वाल्मिकींनी रामायण महाकाव्य लिहिण्याचा श्रीगणेशा केला.

..३..

वाल्मिकींना जिज्ञासा झाली, त्यांनी नारद मुनींना विचारले, “ या भूतलावर सर्वश्रेष्ठ गुणसंपन्न असा कोण आहे?” तेव्हा नारदमुनी म्हणाले, “इक्ष्वाकू वंशात उत्पन्न झालेला, अयोध्यापती श्रीराम हा सर्वश्रेष्ठ गुणांनी  युक्त असून सर्वांना प्रिय आहे.” हे सांगून नारदमुनींनी श्रीरामाचे गुणवर्णन करत त्याचे चरित्र थोडक्यात सांगितले. ते ऐकून अत्यंत प्रभावित झालेल्या वाल्मिकी मुनींनी आपल्या अलौकिक प्रतिभेने संपूर्ण श्रीरामचरित्र लिहिले. महर्षी वाल्मिकीरचित ऐतिहासिक रामायण महाकाव्य हे २४ हजार श्लोक आणि उत्तररामायण खंडासहित एकूण ७ खंडांमध्ये असलेली श्रीरामांची गाथा म्हणजे तत्कालीन भारतीय उच्च संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन  होय.

महर्षीं वाल्मिकींबद्दल अशीही पूर्वपीठिका असलेली कथा सांगितली जाते की, वाल्मिकी महर्षी होण्याअगोदर त्यांचे नांव रत्नाकर होते.  लहानपणीच त्यांना जंगलातील भिल्ल समुदायाने त्यांना पळवून नेले.  मोठा झाल्यानंतर जंगलातून जाण्या-येणाऱ्यांकडून त्यांच्या सामानाची लुटमार करत त्यातून रत्नाकर आपल्या परिवाराचे  पालनपोषण करत असत.  त्याने सप्तर्षींनाही लुटण्याचा प्रयत्न केला, त्यांनीही चोरीचा मार्ग सोडून देण्यासाठी विविध प्रकारे बोध देत मंत्रजपाचा सल्ला दिला. अशीच एकदा त्यांची भेट नारद मुनींची भेट झाली. रत्नाकराने त्यांनाही लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नारदांनी त्याला विचारले की, असे काम तू का करतो आहेस? तेव्हा त्याने उत्तर दिले की माझ्या कुटुंबाच्या उदरभरणासाठी मला हे करावे लागते.

नारदांनी त्यांना प्रश्न विचारला की, ज्या परिवारासाठी तू हा अपराध करतो आहेस,  ते तुझ्या या पापकर्माचे भागीदार होण्यास तयार आहेत, हे जरा त्यांना विचारशील का? या प्रश्नाने अतिशय गोंधळलेल्या  रत्नाकराने नारद मुनींना जवळच्याच एका झाडाला घट्ट बांधून ठेवले आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तो घरी गेला.  दुर्दैवाने घरातील पत्नीसह सर्वांनी त्याला तुमच्या पापाचे आम्ही भागीदार होणार नाही असे सांगितल्यावर रत्नाकर खूप निराश होऊन ते पुन्हा नारद मुनींकडे गेले. बांधून ठेवलेल्या नारद मुनींना त्याने मुक्त केले. त्यांचे चरणस्पर्श करत माझ्या दुष्कृत्यामध्ये कुणीही मला साथ देणारे नाहीत, असे सांगत ते गंभीर झाले. नारद मुनींनी त्याला सत्यासत्यतेची जाणीव करून देत  तू सत्याचा मार्ग स्वीकारून राम नामाचा जप करत रहा, असे सुचविले.  रत्नाकराने  कठोर तपश्चर्या करत  राममंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्याने इतकी आराधना केली की त्याच्या आजूबाजूला मुंग्यांनी वारुळे बांधलेलीही त्याला कळली नाहीत.  जेव्हा सप्तर्षी  परत आले, त्यांनी ते  दृश्य पाहिले,  तेव्हा त्यांनी वाल्मिकी म्हणजे मुंग्यांच्या वारुळामध्ये सिद्ध झालेला मनुष्य  म्हणून वाल्मिकी अशी पदवी दिली. अशा रितीने रत्नाकर  वाल्मिकी  झाले.

..४..

       वाल्मिक ऋषी बोलीला नसता| तरी आम्हांस कैची रामकथा|

       म्हणोनी या समर्था| काय म्हणोनी वर्णावे||

समर्थ  रामदास स्वामी म्हणतात, वाल्मिकी ऋषींनी जर रामायण लिहिले नसते तर आम्हाला श्रीरामाचे चरित्र अज्ञात राहिले असते म्हणून य थोर ऋषींची स्तुती कोणत्या शब्दांत करायची?

शाश्वत सत्य आहे की,  महर्षी वाल्मिकींनी आपल्या कठोर तपश्चर्येने आणि अलौकिक साधनेने रामायणासारखे सृजनशील महाकाव्य लिहिले. ऋषी कुळात जन्मलेल्या महर्षी वाल्मिकींनी स्वयंप्रेरित तपसाधनेने अत्युच्च ज्ञान प्राप्त करून असामान्य असे महाकाव्य निर्मिले, त्यांच्या जिव्हेवर देवी सरस्वती विराजमान होती. म्हणूनच अतिशय करुणामय आणि समरस हृदय भावनेने त्यांना संस्कृत कविता स्फुरली. त्याच ‘अनुष्टुप’ छंदातील कवितेला सर्वात पहिला संस्कृत भाषेतील ग्रंथ म्हणून  ‘रामायण’ या महाकाव्याकडे पाहिले जाते. त्यानंतर संस्कृतमधून निर्माण झालेले अधिकांश ग्रंथ हे अनुष्टुप छंदामधील आहेत.

महर्षी वाल्मिकींनी प्रभू श्रीरामाचे एक धर्मप्रधान, लोकोत्तर पुरुष आणि लोककल्याणकारी राजाचे दर्शन घडवले. प्रभू श्रीरामाच्या नामाचा महिमा आपल्या संपूर्ण भरतभूमीवर आहे. आपला भारत देश वैविध्यपूर्ण भाषा व संस्कृतीचा देश आहे. अनेकतेत एकता ही देशाची मुख्य ओळख आहे. सामाजिक समरसता भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. धर्म साक्षेपीकरण, सर्वधर्मसमभाव, मानवतावाद, बहुजनहिताय-बहुजनसुखाय, आत्मवत-सर्वभूतेषु, वसुधैव कुटुंबकम्‌  अशा विविध संकल्पना या सामाजिक समरसतेच्या भूमिकेतूनच निर्माण झाल्या आहेत. विविधतेत एकतेची भावना सामाजिक समरसतेचे प्रतिनिधित्व करते. संत, साहित्यकार, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, समाज संघटनांचे कार्य करणारे समाजशिल्पी असे सर्वचजण समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक समरसतेची आवश्यकता आहे असे म्हणतात आणि ते खरेही आहे.  संपूर्ण समाज संघटित व्हावा, राग-द्वैष-वैर अशा भावनांचा त्याग करून एकमेकांना सहयोगी बनून रहावा. प्रत्येकाने आपापले निर्धारित कर्तव्य चोख पार पाडून समाजाला समरसता, समानता आणि समृद्धीच्या दिशेने न्यावे, याचा आदर्श वस्तुपाठ प्रभू श्रीरामाच्या जीवनात आपल्याला पहायला मिळतो.  “सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुख:भागभवेत्‌” अशा प्रकारच्या वेदोक्त प्रार्थना सामाजिक समरसतेच्या आधारस्तंभ आहेत.

प्रभूश्रीराम देवता आहेत त्यापेक्षा पहिले ते सफल, गुणवान आणि दिव्य मनुष्य आहेत. ते मर्यादापुरूषोत्तम तर आहेतच. पण जो मनुष्य कोणत्याही प्रकारची मर्यादा बनू शकतो, मर्यादेचे रक्षण करू शकतो, ते स्वतः उत्तम आहेतच आणि त्यांच्या मर्यादाही.

..५..

म्हणूनच प्रभूश्रीरामाचे समस्त लौकिक-अलौकिक गुणांनी युक्त असे चरित्र हे आपल्याला सदैव पूजनीय-वंदनीय आहेच. ते खऱ्या अर्थाने सामाजिक समरसतेचे अग्रदूत आहेत. आपल्याला त्यांचे पावन पवित्र चरित्र आणि आदर्श जीवन सतत प्रेरणा देत त्यांनी घालून दिलेल्या मर्यादांचे पालन आणि सन्मान करतच आपण आपला परिवार, समाज आणि राष्ट्र सुखी-समृद्ध आणि शांतीप्रिय करण्यासाठी आपण मार्गस्थ होऊयात.

प्रभूश्रीराम सफल शासक म्हणून प्रसिध्द होते. आजही आपण रामराज्याची चर्चा करतो, त्याचे कारण म्हणजे संयत, संतुलित आणि वैयक्तिक सुखाचा त्याग करून सत्य आणि न्यायाची सदैव साथ देणाऱ्या मर्यादापुरूषोत्तमांची सहनशीलता आणि धैर्य अनुकरणीय आहेच. त्यांनी दिलेला संघर्ष पाहिला तर त्यांनी राजसी सुखाचा त्याग करून संन्यासी जीवन अनुसरले, हे आज कुणालाही शक्य नाही. आपल्या असामान्य प्रतिभेने महर्षी वाल्मिकींनी आदर्श, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाचा जीवनपट अत्यंत कुशलतेने उलगडलाच, परंतू ते त्या महाकाव्याचे महत्त्वपूर्ण भागीदारही  बनले.  महाराणी सीतेची स्वतःच्या कन्येसमान देखभाल करत, सेवा करत तिच्या कुश आणि लव जे सर्वात पहिले त्यांचे शिष्य बनले. अशा या दोन सुपुत्रांना त्यांनी सत्शील आणि सन्मार्गाचे धडे देत  त्यांच्याकडून रामकथेचे गायन  करवून घेतले.

सत्वगुण प्रवृतीच्या महर्षी वाल्मिकींनी  रामायण लिहून समस्त भारतीय समाजजीवनामध्ये ‘रामराज्य’ या महत्वपूर्ण शब्दाला आदर्श बनवले आहे. खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम आणि त्यांची रामकथा समग्र भारतीयांच्या हृदयामध्ये अखंड ज्योत बनून ती प्रज्वलित राहिली आहे. आपल्या सर्वांना प्रभू श्रीराम हृदयस्थ  आणि प्रात:स्मरणीय केले ते महर्षी वाल्मिकींच्या विशाल आणि करुणामय ओतप्रोत भरलेल्या समरस भावनेने. खरंतर देशभरातील प्रत्येक प्रभूश्रीराम मंदिरांमध्ये महर्षी वाल्मिकींची प्रतिमा-फोटो विराजमान झाला पाहिजे, त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. अशा महान आद्यकवी महर्षी वाल्मिकींना जयंतीदिनी शत शत वंदन!

मध्ययुगीन काळातील महान अशा भक्ती संप्रदायाला कुटनीती इतिहासकारांनी हिंदूंमधील असलेल्या अनिष्ट रुढी-परंपरा आणि जातीभेद दूर करणारे आंदोलन म्हणत अतिशय खोटा प्रचार केला. खरंतर संत तुलसीदासांपासून ते संत रोहिदासांपर्यंत तत्कालीन सर्व आक्रमक आणि आततायी शासकांपासून मुक्त होण्यासाठी समाजातील नवचैतन्य जागृत केले. अकबर काळातील परकीय आक्रमणांना त्रासून निराश झालेल्या, चेतना हरवलेल्या समाजामध्ये  जागरूकता आणण्यासाठी दिल्लीमध्ये ‘रामलीला’ची सुरुवात संत तुलसीदासांनी केली होती. मुघल शासकांनी तर तत्कालीन समाजाचे जिणे हैराण केले होते. त्यांच्या महालांमध्ये शौचालयेही नव्हती, परंतू इंग्रज आणि डाव्या इतिहासकारांना मुघल सम्राट शाहजहान हा वास्तुकलेचा असामान्य जाणकार असल्याचा साक्षात्कार झाला होता. परंतू दिल्लीच्या सल्तनतपासून मुघल बादशहालाही शौचालय निर्माण करण्याचे ज्ञान नव्हते. त्यांनी आपल्या गरीब, अज्ञानी जनतेला एकतर मुसलमान व्हावा, नाहीतर आमची शौचालये स्वच्छ करा, मैला स्वच्छ करा, असा आदेश दिला. हिंदुस्थानात परकीय आक्रमण केलेल्या शासकांचा मैला धुणाऱ्या तत्कालीन अस्पृश्य समाजाला त्यांच्या या ‘महत्तर’  म्हणजेच महान कार्य करणाऱ्या ‘मेहतर’ समाजाला, त्यांच्यातील धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी जो समाज रामाला श्रद्धास्थानी मानून रामकथेचे पाठ म्हणत होता, त्यांना महर्षी वाल्मीकींचे नांव दिले. ज्यांनी स्वाभिमान गमावून, घाबरलेले मुसलमान झाले.  परंतू  ज्यांनी इस्लाम धर्म स्विकारला नाही, त्याऐवजी श्रीमंत आणि शासक असलेल्या मुस्लिमांचा मैला धुण्याचे काम स्विकारले, त्यांना ‘भंगी’  नांवाने ओळखले जावू लागले. ते खरोखरच श्रेष्ठ आणि प्रखर धर्माभिमानी होते, त्यांनी अतिशय घृणास्पद काम स्विकारले, पण धर्मांतर केले नाही. ते खऱ्या अर्थाने धर्मरक्षकच म्हणावे लागतील. त्यांना धर्मदूत या भूमिकेतून मेहतर किंवा वाल्मिकी या नावांने ओळखले जावू लागले. कालांतराने ‘वाल्मिकी हा महान शब्दही अस्पृश्य गणला जाऊ लागला. धर्मरक्षणासाठी तत्पर असलेला समाज मेहतर-वाल्मिकी समाज बहिष्कृत केला गेला. हिंदू धर्म अनिष्ट रुढीग्रस्त आणि भयानक जातीप्रथेमध्ये अडकला.

डॉ. सुनिल दादोजी भंडगे

अध्यासन प्रमुख,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *