पुणे—पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर आता हे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच हे प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई वडिलांना 5 कोटी रुपये मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाच्या चुलत आजीने केल्याने पुन्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शांताबाई राठोड असे पूजाच्या चूलत आजीचे नाव आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर काल पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्या मुलीच्या प्रकरणात संपूर्ण तपास व्हावा व तिला न्याय मिळावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. केवळ संशयावरून कोणाचे नुकसान होऊ नये, अशी भावनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडं व्यक्त केली होती. या भेटीनंतर शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांवर पैसे घेऊन प्रकरण मिटवत असल्याचा आरोप केला आहे. ‘पूजाच्या आई-वडिलांना लेकराची किंमत नाही. मी चुलत आजी आहे. त्यामुळं माझं कोणी ऐकणार नाही. पण त्यांनी समाजाची दिशाभूल केली आहे. आता मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई-वडील खोटं बोलत आहेत. संजयभाऊ राठोड यांनी ५ कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड बंद केलं आहे. आमची मुलगी चांगली होती असं ते कधीच म्हणणार नाहीत,’ असंही शांताबाई म्हणाल्या.
‘संजय राठोड यांच्याकडून मिळालेला पैसा पूजाच्या आई-वडिलांनी जमिनीत पुरून ठेवला आहे. त्यांच्या घरात जावया-जावयांमध्ये भांडणं सुरू आहेत. आज पूजाचे आई-वडील जे बोलताहेत, ते त्यांचे बोल नाहीत. त्यांना मिळालेला पैसा बोलतो आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला अजिबात भुलू नये. योग्य तपास करून पूजाला न्याय मिळवून द्यावा,’ अशी विनंती शांताबाई यांनी केली आहे.
दरम्यान शांताबाई राठोड या काल ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांच्यासह पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी केवळ तक्रार लिहून घेतली. त्यामुळं आज तृप्ती देसाई यांच्या सोबत त्यांनी आज पुणे शहर गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांची भेट घेऊन पूजा चव्हाण प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.