पिंपरी(प्रतिनिधी)– रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवडच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, महपालिकेतर्फे आयोजित त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष रामा भोरखडे यांच्यासह पदाधिकारी आणि तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने नागरिकांना अन्नवाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे, मार्गदर्शक सागर सूर्यवंशी, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते धम्मराज साळवे, मारुती भापकर, अंकुश कानडी आदींसह तृतीयपंथी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामा सुरेश भोरखडे म्हणाले, की समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. तो समाजाने बदलण्याची गरज आहे. किरण गायकवाड म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तृतीयपंथीयांच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. यापुढेही असे समाजहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सागर सूर्यवंशी यांनी सांगितले, की रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे समाजाच्या दृष्टीने उचललेले पाऊल अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडे समाजाने एक आदर्श म्हणून पाहावे आणि त्याप्रमाणे कृती करावी.
मारुती भापकर म्हणाले, की तृतीयपंथी यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.