पुणे— महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वक्तव्य करणाऱ्या राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ उडाला आहे. पिंपरी -चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटीलांवर शाईफेक करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या. अशा आशयाचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी- चिंचवड मध्ये आले होते. भाजपचे शहर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांच्या निवासस्थानी ते चहासाठी थांबले होते. तेथून बाहेर पडतानाच अचानक एका कार्यकर्त्याने त्यांच्या समोर येऊन काळी शाई चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर फेकली. त्यात पाटील यांचा चेहरा तसेच सफेद शर्टवर डाग पडले. अचानाक घडलेल्या या प्रकारामुळे सगळेच गोंधळून गेले. यावेळी संबंधित व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणाही संबंधित व्यक्तीने दिल्या. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन करत पाटील यांचा निषेध केला.
विशेष म्हणजे अशाप्रकारची घटना घडू शकते, अशी शंका पोलिसांनी आधीच होती. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण तरीही ही अनपेक्षित घटना घडली.
एनएसयुआयने दाखविले काळे झेंडे
चंद्रकांत पाटील हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असताना पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) च्या वतीने त्यांना चिंचवड येथे काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. तसेच, ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या कार्यकर्त्यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हिंमत असेल तर समोर या-चंद्रकांत पाटील
दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने ते प्रचंड संतापले आहेत. “अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशाप्रकारे पराचा कावळा करणं, त्याचं तीन-तीनवेळा स्पष्टीकरण दिल्यानंतरही, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा भ्याडपणा, अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु”, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
“अरे काय चाललंय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला एका अर्थाने त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे जपलं की एखाद्या गोष्टीचा विरोध हा लोकशाही मार्गाने करायचा, पण ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
“या शाईफेकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. पण ही झुंडशाही चालणार नाही. आज समजा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छूट दिली असती तर हे केवढ्यात पडलं असतं? पण आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. मी लगचे पत्रकार परिषद घेऊन माझं असं म्हणण्याचा हेतूच नाही, असं स्पष्ट केलंय. खरंतर गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत जाणं हे सरंजामशाहीवाल्यांना झेपत नाहीय. त्यामुळेच भ्याड हल्ले चालले आहेत. उद्यापासून पोलिसांची सुरक्षा नसेल. हिंमत असेल तर समोर या”, असं आव्हान त्यांनी दिलं.