भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातींचे योगदान


आपण सर्व भारतीय, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन 74 वर्षे पूर्ण होऊन अमृतासम अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. याचा सर्वांना आनंद होत आहे. कारण गुलामगिरी कोणालाच आवडत नाही. देशावर अनेक वेळा स्वार्‍या झाल्या. अतोनात लुबाडणूक झाली. तरीही ताठ मानेने येथील लोक उभे आहेत. ते येथे रुजलेल्या संस्कृतीमुळे, आपलेपणामुळे. पण देशाला स्वातंत्र्य हे आपलेपणा किंवा दान म्हणून मिळाले नाही किंवा ‘देदी हमे आजादी बिना खडग्, बिना ढाल.’असेही झाले नाही.

या देशाला स्वातंत्र्य हे क्रांतीच्या जोरावर रक्त सांडूनच मिळाले यात तिळमात्र शंका नाही. या स्वातंत्र्याची ओढ, तळमळ ही गरजवंतांना लागली. ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’ त्या नुसार सर्वात प्रथम झळ ही या देशातील जनजाती समजल्या जाणार्‍या समाजाला बसली. इंग्रजांनी त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडून व अनेक कर लादून त्यांचे जगणे मुश्कील करून सोडले. या मूळ इंग्रजांच्या विरोधात सर्वात प्रथम बंड करणारे हे या देशातील, अदिवासी व दलित आहेत.

इंग्रजांनी पुण्याला गिळंकृत करून आपले राज्य या ठिकाणी सुरू केले तेव्हा छत्रपती शिवरायांच्या शनिवारवाड्यावरचा भगवा झेंडा उतरून त्या ठिकाणी इंग्रजांचा युनियन जॅक फडकू लागला. तेव्हा अनेकांना वेदना झाल्या. पुढे पेशवे व इंग्रज यांच्यात युद्ध झाले. पण आपल्या भारतीयांना परके व आपले यातील भेद समजलाच नाही. तेव्हा इंग्रजांच्या बाजूने लढणारे पण आपलेच हे दुर्दैव. 1817 साली झालेल्या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. या युद्धात लहुजी साळवे या लढवय्याने इंग्रजांबरोबर युद्ध केले. पण पराभव झाल्यावर गप्प न बसता, या देशाला स्वतंत्र्य करण्याची प्रतिज्ञा करून ब्रह्मचार्याचे व्रत अंगिकारून देशात सशस्त्र क्रांतीसाठी, सशस्त्रक्रांतिकारक उभे करण्यासाठी पुणे येथे 1822 मध्ये गंजपेठेत क्रांती शाळा सुरू केली आणि अनेक क्रांतिकारक निर्माण केले.

अधिक वाचा  संतूरची तार निखळली : पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन : केवळ 500 रुपये घेऊन आले होते मुंबईत

यामध्ये महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, परांजपे, वासुदेव बळवंत फडके यासारखे ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक घडवून सशस्त्र क्रांतीचे पाऊल उचलले. याच वेळी देशाच्या अनेक भागात इंग्रजांच्या विरुद्ध बंड उभे राहिले. अशाच प्रकारे सांगली जिल्ह्यातील ‘फकिरा साठे’ सावळा, यांनी सशस्त्र बंड केले हे सर्व मांग समाजातील होते.

साधारणपणे 1826 ते 1832 या काळात ‘राजे उमाजी नाईक’ यांनीही सशस्त्र बंड करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. राजे उमाजी नाईक यांच्याप्रमाणे अनेक ठिकाणी त्यांच्या जमातीने प्रचंड मोठे बंड उभे करून इंग्रजांना हादरून सोडले. यामध्ये सिंदूर लक्ष्मण, यांनी जत तालुक्यात 1922 मध्ये मोठा लढा दिला. रामोशी समाजाचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान आहे.

नगर जिल्ह्यात राघोजी भांगरे, भागोजी नाईक यासारखे अदिवासी जमातीतील क्रांतीकारक लढले आहेत. भिल्ल व कोळी समाजाने इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून अनेक ठिकाणी रक्तरंजित क्रांती घडवली आहे. 1840 ते 1848 या काळात यांनी क्रांती केली आणि  हसत हसत फासावर गेले.

अनेक मांग, रामोशी, अदिवासी, पारधी नागरीक  देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून फासावर गेले. राजे उमाजी नाईक यांना झाडाला लटकवून फाशी दिली व त्यांचा देह तीन दिवस झाडाला लटकवत ठेवला होता. असे अनेक जणांच्या बाबतीत केले आहे. या क्रांती लढ्यात अनेकांची शीर कापण्यात आली. काहींना बंदुकीच्या गोळीने, तोफेच्या तोंडी देऊन मारण्यात आले. लढ्यात अनेक जण मारले गेले. मग त्यांचे रक्त हे रक्त नव्हते का?

अधिक वाचा  MLA disqualification case Result : एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला  उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा निर्णय

आज आपण अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. या वर्षात खर्‍या क्रांतिकारकांचे स्मरण करणे. त्यांच्याविषयी  आदर व्यक्त करणे ही आपली संस्कृती आपण जोपासत आहोत. या देशाला स्वातंत्र्य हे अशा अनेक क्रांतिकारकाच्या लढ्याने मिळाले आहे यात दुमत नसावे.

या क्रांतिलढ्यात फक्त पुरुषच होते का? तर यांच्या बरोबर अनेक स्त्रियांनीही बलिदान केले आहे. पण इतिहासात त्यांचा कोणी उल्लेख केला नाही. राणी लक्ष्मीबाई अशी काही नावेच लोकांना माहित आहेत. पूर्वीच्या सातारा व सध्याच्या सांगली जिल्ह्यातील ‘बिळाशी’ या गावात इंग्रजांच्या विरुद्ध जंगल सत्याग्रह झाला होता. देशाचा तिरंगा येथून कोणास हलवू द्यायचा नाही. यासाठी इंग्रजांच्या लाठीमारात बेशुद्ध पडेपर्यंत मार खाणार्‍या महिला त्या सत्याग्रहात सामिल होत्या. प्रामुख्याने बिळाशी मधील ‘मुक्ता साठे’ ही स्त्री क्रांतिकारी आहे.

1857 च्या क्रांतीमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रामधून अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातीचे हजारो क्रांतिकारक स्वयंप्रेरणेने लढ्यात सहभागी झाले होते. त्यातील बहुतेक सर्वांना वीरमरण आले. जे परत आले त्यांची माहिती कोणाला नाही. याच काळात सातार्‍याच्या झेंडा मैदानावर अनेक मांग व रामोशी यांना इंग्रजांच्या विरुद्द कट करणे, बंड करणे यासाठी फाशी देण्यात आली आहे. क्रांतीवीर समशेर सिंग भोसले हा पारधी जमातीतील योद्धा 1818 च्या लढाईनंतर अनेक संस्थानं निर्माण झाली होती. 4 ते 5 हजार पारधी समाजाचे नेतृत्त्व ते करीत होते. त्यांनी या एकीचा फायदा घेऊन इंग्रजांच्या विरोधात बंड उभे केले होते. पहिली लढाई  त्यांनी तलवार व गोफणीच्या दगडाने केली होती. त्यांची वाणी ही त्यांच्या बांधवांना प्रेरणा देणारी होती. लढाईच्या वेळी ते म्हणाले, माझ्या पारधी बांधवाने आजपर्यंत आपण, हिंदवी राजा शाहू महाराज यांच्या अधिकारात होतो. आता गोर्‍या इंग्रजांनी आपले सर्व लुटले आहे. त्यांना येथून हाकलून देण्यासाठी आपण जमलो आहोत. आपण त्यासाठी रक्त सांडणार आहोत. लढाईमधे गोर्‍यांना कापून काढा, जेवढे पारधी जमा करता येतील तेवढे करा. तरुणांना एकत्र करा. लढा द्या व आपले स्वातंत्र्य मिळवा. या लढ्यात आपल्या पत्नी व मुलासहीत ते सामील झाले होते. या लढाईत त्यांची पत्नी व चार मुले हुतात्मा  झाली. त्याचबरोबर दोन भाऊ आणि  अस्था ह्या पारधी समाजातील क्रांतिकारकास एप्रिल 1858 ला फाशी देण्यात आली.तसेच  याच दिवशी अनेक पारधी क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली.

अधिक वाचा  #Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती

जनजातींमधील अनेक क्रांतिकारकांचे या स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे. त्यातील काहींचीच आपल्याला माहिती आहे. पण हजारो क्रांतिकारक समाजाला माहित नाहीत. त्यांची माहिती गोळा करून ती संकलीत करावी. हा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हा लेखन प्रपंच आहे. आपल्या पूर्वजांचा इतिहास त्यांची कर्तबगारी समाजासमोर आली पाहिजे. त्यांच्या कार्याने अनेकजण प्रेरीत झाले पाहिजेत. त्यांचा इतिहास प्रकाशात यावा हीच अमृतमहोत्सवी वर्षात अपेक्षा आहे.

जालिंदर कांबळे

( लेखक सामाजिक समरसता मंचा चे कार्यकर्ते आहेत )

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love