शिवछत्रपतींचे चरित्र आपल्या रसाळ वाणी लेखणीने प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचा प्रयत्न शिवशाहिरांनी केला – नरेंद्र मोदी

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य होते. त्यात सुशासन होते. दलित, मागासवर्गांच्या वेदनांचा हुंकार त्यात होता. शिवछत्रपतींनी सर्वच क्षेत्रांत केलेले कार्य आजही अनुकरणीय आहे. महाराजांची शिकवण आत्मसात करण्याची शक्ती मिळावी, ही माझी प्रार्थना आहे. या शिवछत्रपतींचे चरित्र आपल्या रसाळ वाणी लेखणीने प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचा प्रयत्न शिवशाहिरांनी गेल्या साडेसहा दशकांत केला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शतकवीर पद्मविभुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव केला

शिवछत्रपतींच्या चरित्राचा गेली सुमारे नऊ दशके सखोल अभ्यास करणारे आणि राज्यासह देश-विदेशातील साडेसहा दशकांतील पिढ्यांना शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान चरित्राची सखोल ओळख करून देणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज शताब्दीत पदार्पण केले. त्याबद्दल या शिवसाधकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवर आणि समस्त पुणेकरांतर्फे हृद्य सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीने हा कार्यक्रम आयोजिला होता. आंबेगावमधील शिवसृष्टीतील सरकार वाड्यात झालेल्या या समारंभास समितीच्या अध्यक्षा आणि लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि  विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आभासी पद्धतीने या कार्यक्रत सहभागी झाले होते. जगदीश कदम यांनी प्रास्ताविक करून शिवसृष्टीविषयक माहिती दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, इतिहासाकडे तटस्थ भूमिकेतून पाहून तो मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न पुरंदरे यांनी आयुष्यभर केला आहे, आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. सध्याच्या युवा इतिहासकारांनी, अभ्यासकांनी स्वातंत्र्याचा इतिहास लिहिताना पुरंदरे यांचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

शिवछत्रपती हा पुरंदरे यांचा ध्यास आहे. त्या ध्यासात, प्रेरणेत राष्ट्रभक्ती आहे. घरोघरी शिवाजी महाराजांचा सविस्तर परिचय करून देतानाच पुरंदरे यांनी गेल्या सहा दशकांतील पिढ्यांना जीवनाचे पाथेय दिले आहे, अशा शब्दांत डॉ. मोहन भागवत यांनी पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव केला.

शाळेत इतिहासाच्या तासाला शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगत. घरीही वडील त्या गोष्टी सांगत. त्यावेळी बाबासाहेबांकडून ही गोष्ट ऐकल्याचे ते सांगत. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मला क्रिकेटमध्येही प्रेरणा मिळाली आहे. लढण्याचे बळ, स्फूर्ती या चरित्रातून मिळाली. एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन सलग नव्वद वर्षे त्याचा सखोल अभ्यास करणे, ही कठीण गोष्ट आहे. परंतु, बाबासाहेबांनी हा आदर्शही आपल्या कार्यातून उभा केला आहे, अशा भावना सचिन तेंडूलकर याने  व्यक्त केल्या. क्रिकेटमुळे मला जाणता राजा हे महानाट्य पाहता आले नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

आमच्या सरकारच्या काळात आंबेगावमध्ये शिवसृष्टीचा प्रकल्प मंजूर केला गेला. मेगा टुरिझमचा दर्जा मिळालेल्या या शिवसृष्टीत बाबासाहेबांचा शताब्दीनिमित्त गौरव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीचे काम लवकरच पूर्णत्वास जावो, अशा सदिच्छा फडणवीस यांनी दिल्या.

शिवसृष्टीचे काम होत नाही, तोपर्यंत विश्रांती नाही, हा बाबासाहेबांचा ध्यास आहे. त्यांची ही ध्यासपूर्ती हाच आपला संकल्प असला पाहिजे. या संकल्पपूर्तीसाठी पुढील काळात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन सुमित्रा महाजन यांनी केले. समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्या कमाईतील एक लाखांची रक्कम दिली, तर शिवसृष्टीचे काम वेगाने मार्गी लागेल, अशी सूचना डॉ. सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमादरम्यान मांडली होती. महाजन यांनी ही सूचना उचलून धरत, आपल्या निवृत्तीवेतनातून एक लाखांची रक्कम या कामासाठी देण्याची घोषणा केली.

मी शताब्दीत पदार्पण केले आहे. माझ्या वाढदिवसाने काय साधणार, याचा हिशेब मांडलेला नाही, असे सांगत पुरंदरे यांनी या सत्काराच्या उत्तरात आपले मनोगत व्यक्त केले. माझे परमदैवत असलेल्या शिवछत्रपतींचे स्मारक शिवसृष्टीच्या निमित्ताने उभे राहताना मी पाहतो आहे, ही आनंदाची बाब आहे. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेली. सर्व समाज एक आहे, अभेद्य आहे, हे त्यांनी त्यातून ठसवले. महाराजांचे चरित्र हेच मूर्तिमंत स्वातंत्र्य, स्वराज्य आहे. अशा या महापुरूषाचे, योग्याचे हे स्मारक सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असे पुरंदरे म्हणाले.

देशाच्या प्रत्येक प्रांतात असे महापुरूष आहेत. आजच्या युवकांना त्यांची ओळख करून देतानाच त्यांना ऊर्जा, प्रेरणा देणारी अशी या सर्व महापुरुषांची अशीच स्मारके देशभरात उभी राहावीत, अशी आशाही पुरंदरे यांनी व्यक्त केली. संत ज्ञानदेवांनी तुऴजाभवानीवर लिहिलेल्या गोंधळाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. विनित कुबेर यांनी आभार मानले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

शिवचरित्राच्या अभ्यासासाठी पुरंदरे यांच्या नावाने शिष्यवृत्ती   

शिवछत्रपतींच्या कार्याचा, चरित्राचा परदेशातही प्रसार करण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने आयसीसीआरतर्फे शिष्यवृत्ती देण्याची घोषणा डॉ. सहस्रबुद्धे यांनी केली. परदेशी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. दरवर्षी एका विद्यार्थ्याची त्यासाठी निवड केली जाईल आणि त्याला शिवचरित्राचा अभ्यास व संशोधनासाठी वार्षिक १८ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल, असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *