शिवाजी महाराजांची राष्ट्र-स्वराज्य निर्मितीची भावना मोलाची:लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो – बाबासाहेब पुरंदरे

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : शिवाजी महाराजांची गोडी वडीलांमुळे लागली. अनेक मित्रांच्या साथीने ती वाढली आणि ती जोपासली. वेड लागल्याशिवाय इतिहास कळत नाही. मलाही शिवाजी महाराजांचे वेड लागले. सहजगत्या हे सगळे झाले. मी पुजारी किंवा गुरव नाही. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम, कार्य मला भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. हे राज्य आमचे आहे येथे तुम्हाला भलतेसलते काही करू देणार नाही, असे त्यांनी बजावले, असे उद्गार काढतानाच लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा इथेच जन्म घ्यावा, असे वाटते, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे काढले.

जगप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकमहोत्सवी वर्षाची सुरुवात मोठ्या थाटामाटात झाली असून जीवनगाणी, जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वरगंधार या संस्थांनी संयुक्त विद्यमाने मा पुरंदरे यांचा भव्य सत्कार पुणे येथे शनिवारी १४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी आयोजित करण्यात आला. प्रख्यात पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सत्कार सोहोळ्याला उत्तर देताना बाबासाहेब पुरंदरे बोलत होते.

ते पुढे म्हणाले, “जगात केवळ पाच किंवा सहाच लोकांना मी ‘अरेतुरे’ करतो, त्यात आशा भोसले आहेत. मंगेशकर कुटुंबातील सगळी भावंडे मला प्रिय आहेत. लतादीदीनी एकदा विचारले, तुम्हाला कोणाचा आवाज आवडतो तेव्हा पंचाईत झाली मग सांगितले कपबश्यांचा आवाज आवडतो. त्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे नाते होते. मनाचे औदार्य असणारे मंगेशकर कुटुंब आहे. ते कुटुंब म्हणजे एक संस्कृती, विचार आहे. दीनानाथ मंगेशकर यांच्यापासून आमची ओळख आहे. ७५ वर्षांचा त्यांचा माझा स्नेह आहे.”

बाबासाहेब पुरंदरे यांनी आशा भोसले यांच्यावर आपण एक लेख लिहिणार असल्याचे म्हटले. “आयुष्यात प्रेम करायला शिका. माणसाने आयुष्य  हसत खेळत आणि विनोदबुद्धी जागृती ठेवत जगले पाहिजे. मात्र ही विनोदबुद्धी उपजत असावी लागते. कोणाचा विद्वेष किंवा मत्सर आपण करता कामा नये. प्रेमाने राहायला, प्रेमाने जगायला शिकले पाहिजे. जीवनात मला मंगेशकर, ठाकरे कुटुंबियांचा स्नेह लाभला, गजाननराव मेहेंदळे यांची मदत झाली. जीवनात मी आनंदी, संतुष्ट, तृप्त, सुखी आहे. लोकांकडून मिळणारे हे प्रेम पहिले की पुन्हा एकदा इथे जन्माला यावे, असे वाटते,” असेही ते पुढे म्हणाले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कारानंतर बोलताना, आशाताई भोसले म्हणाल्या, “सर्वार्थाने महान असलेली आणि पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती इथे आहे, ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. मी भाषण देणारी नाही, फार शिकलेली नाही, अनेक लेखकांच्या लेखनामुळे मला बोलता येते. पुस्तक वाचन केले. वाचनवेड होते. लेखकांची आवड होती. कोल्हापुरात बाबासाहेबांची माझी भेट झाली. त्यांचा पुढे पाहुणचार करण्याची संधी मिळाली. गोनी दांडेकर, बाबासाहेब, दत्ता ढवळे यांच्यासारखी माणसे माझ्या घरी यायची, हे माझे नशीब होते. बाबासाहेबांनी अनेक गडकिल्ले सर केले त्याचे वर्णन त्यांनी मला ऐकवले. मनाची ताकद असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य पेलले गेले.”

आशाताई पुढे म्हणाल्या, “आम्ही दोघे आपापल्या व्यवसायात व्यग्र असलो तरीही स्नेह कायम राहिला. बाबासाहेबांनी दिलेली महादेवाची पिंडी आणि नंदी आजही माझ्या घरात आहे. आयुष्यात आलेल्या चांगल्या गोष्टी धरून ठेवते, वाईट सोडून देते. मोगऱ्याच्या फुलासारखी टवटवीत राहण्याची शिकवण दिली. स्वच्छ मन राहायचे. बाबासाहेबांनी खूप दिले. मी खरे बोलणारी बाई आहे. सगळ्या लेखकांची पुस्तके वाचली. यांनी माझे आयुष्य समृद्ध केले. मला दुःख वाटलं तर मी पुस्तके वाचते. मला देवाने अजून पन्नास वर्षे आयुष्य दिले तर त्यातील पंचवीस वर्षे मी बाबासाहेबांना देईन. एक लाख एक रुपये आज आपल्या चरणावर ठेवते.”

राज ठाकरे म्हणाले, “शिवतीर्थावर शिवसृष्टी उभारली तेव्हा उत्सुकता म्हणून रोज जायचो. तेव्हाच मी सर्वप्रथम त्यांना भवानी तलवार घेऊन आले असताना भेटलो. तेव्हापासून त्यांचा सहवास लाभला. महाराजांच्या भूमिकेत स्वतः बाबासाहेबांनी कार्य केले. बाबासाहेबांची इतिहास वर्तमानाशी जोडून सांगण्याची हातोटी भावणारी आहे. इतिहास आणि वर्तमानाशी संबंध जोडणारा हा धागा आहे. त्यांच्या वाणीतील शिवचरित्र सहज समजणारे आहे. शिवचरित्र इतिहास म्हणून नाही, तर जीवनशिक्षण आपण शिकले पाहिजे.”

“इतिहास समजेल, रुचेल आणि आवडेल अशा पद्धतीने त्यांनी इतिहास सांगितला. व्याख्यानात, भाषणात इतिहास कधीच सोडला नाही. दंतकथांना वाव नाही. इतिहास सांगताना अलंकारिक, सोप्या भाषेचा वापर केल्याने त्याला लोकप्रियता मिळाली. शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात, मनामनात पोहोचवले. महाराष्ट्रात देशात आणि जगभरातही त्यांचे शिवचरित्र गेले आहे. त्यांनी पोवाडा म्हटला नसला तरी ते शिवशाहीर आहेत. इतिहास संशोधक आहेत. इतिहास सहज समजावा यासाठी त्यांनी कार्य केले. यापुढेही हे कार्य पुढे चालू राहील,” असेही राज ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले.

अॅड. आशिष शेलार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनीच बाबासाहेबांना शिवकार्याची प्रेरणा दिली. सर्वांगवधानी अशी ही व्यक्ती आहे. ते सहनशील, दयावान आणि क्षमाशील आहेत. इतिहास लिखाणावर अनेकांनी वार केले; पण आपण संयम आणि क्षमाशीलतेने त्याचा सामना केला. अनेकांसाठी प्रेरणादायी असे बाबासाहेबांचे जीवन आहे. लिहून, बोलून शिवजागर केल्यानंतर आता शिवसृष्टी उभारून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण सगळ्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला हातभार लावयला हवा.”

ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे म्हणाले कि, भारत इतिहास संशोधक मंडळाचा वारसा बाबसाहेबांना आहे आणि बाबासाहेबांमुळे शिवचरित्र घराघरात पोहोचले. “त्यांनी लिहिलेले साहित्य साधार आहे. मला शंभरावे वर्ष लागेल तेव्हा बाबासाहेबांनी मला आशीर्वाद द्यावा,” ते म्हणाले.

सकाळी ११ वाजता सरकार वाडा, शिवसृष्टी, आंबेगाव, पुणे येथे निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी आणि पाहुण्यांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब पुरंदरेलिखित यांच्या ‘ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. बळवंत मोरेश्वर अर्थात माननीय बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. त्यांनी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून २९ जुलै रोजी वयाच्या शंभरीत प्रवेश केला आहे.

“माननीय बाबासाहेबांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. त्यांच्या ‘जाणता राजा’सह अनेक क्रयाक्रमांचे आयोजन ‘जीवनगाणी’ आणि ‘स्वरगंधार’च्या माध्यमातून मुंबई आणि इतर शहरांमध्ये आम्ही गेली कित्येक वर्षे करत आहोत. त्यांच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी मा बाबासाहेबांचा सत्कार करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आणि आमच्यासाठी हा प्रतिष्ठेचा प्रसंग आहे,” असे उद्गार प्रसाद महाडकर आणि मंदार कर्णिक यांनी काढले.या कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये शिरीष गानू, मंदार कर्णिक, प्रसाद महाडकर, श्रीनिवास वीरकर, राजेंद्र टिपरे, अॅड आनंद  देशपांडे यांचा समावेश होता.

यावेळी ‘शिवकल्याण राजा’ हा सांगीतिक कार्यक्रम सुद्धा पार पडला. सोनाली कर्णिक, अजित परब, नचिकेत देसाई या गायकांनी प्रशांत लळीत यांच्या संगीत संयोजनाखाली गीते सादर केली. संजय उपाध्ये आणि श्रीराम केळकर यांनी यावेळी सूत्रसंचालन केले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *