आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे – महिलांचा प्रवास प्रगतीकडे..

महाराष्ट्र लेख
Spread the love

“जागतिक महिला दिन”  एक दिवसासाठी कशाला साजरा  करायचा, रोजच महिलादिन असला पाहिजे”, अशी काही वाक्ये  महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या कानावर पडतील. पण अशी गौरवात्मक स्थिती रोज यावी, असं प्रत्यक्षात काही नसतं, हे आपल्याला चांगलंच माहित आहे. उलट खरं तर तशी स्थिती रोज नसते म्हणूनच हा एक ‘दिन’ मुद्दाम साजरा करून एखाद्या घटकाकडे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न म्हणून असे दिन साजरे करावे लागतात.

 सध्या सगळं जग आधुनिक झालंय. पाश्चात्य देश कधीचेच आपली प्रगती करून  पुढारलेले देश म्हणून मिरवतात.  या देशांमध्ये सुखसमृध्दी तर आहेच, पण महिलांकडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टकोण मोकळा आणि प्रगतिक आहे. तरीही ८ मार्च हा “जागतिक महिला दिन” आजही जगभरात साजरा होतो,   कारण अजुनही त्याची गरज अनेक प्रकारे आहे.

मार्च १९११ मध्ये कोपनहेगन येथे जर्मनी व स्वित्झर्लंड तसेच ऑस्ट्रिया व डेन्मार्क या देशातील महिलांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांच्या जाणिवेतून पहिला ‘महिला दिन’ साजरा केला. हजारो स्त्रियांनी एकत्र येवून मोर्चा काढला. त्यावेळी एकूण उत्साही प्रतिसाद बघून त्या महिलांनी ठरवले, की ८ मार्च हा दिवस नियमितपणे ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा झाला आणि तो आजतागायत सुरू आहे.

ही चळवळ सुरू झाली त्यालाही काही पार्श्वभूमी आहे. कुठलीही घटना एकदम घडत नाही. त्यासाठी आधी घडलेल्या ब-याच गोष्टी कारणीभूत असतात. कोपनहेगन येथे मार्चमध्ये निघालेल्या महिला मोर्चापूर्वीही अशीच स्थिती होती. तिकडे झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर महिलाही कारखान्यात काम करू लागल्या. गृहिणीची म्हणजेच घरची सगळी जबाबदारी सांभाळून युरोप, अमेरिकेतल्या स्त्रिया नोकरी करायला लागल्या. त्या वेळी महिलांनी नोकरी करणे ही कुटुंबाचीही आर्थिक गरज होऊन बसली होती. तशीच कारखान्यांमध्येही मनुष्यबळाची गरज होती. म्हणून स्त्रियांचा आपोआपच बाहेरच्या जगात प्रवेश झाला. घरातली कामं उरकून त्यांना १२-१२ तास कारखान्यात काम करावे लागे.

महिलांना वेतन मात्र पुरुषांपेक्षा कमी मिळायचे. कामाच्या ठिकाणी पुरेशा सोयी-सुविधा नसत. एका जागी बसून तासन तास काम करावे लागे. स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय, बाळंतपणाची सुट्टी असे तर विषय कुणाच्या डोक्यातही नव्हते. हळूहळू एक एक प्रश्न निर्माण होवू लागले, तशी या महिलांमध्ये जागृती निर्माण झाली. म्हणूनच या महिलांनी एकत्र येवून या विषयात आपली होणारी पिळवणूक थांबावी, आणि त्रास कमी व्हावा, कामाचा समान मोबदला मिळावा, या हेतूने एकत्र यायचे ठरवले. पहिल्या महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला तेव्हा हजारोंच्या संख्येने जमून, मोर्चा काढून आपली स्त्रीशक्ती त्यांनी सा-या जगाला दाखवून दिली. अशी या जागतिक महिलादिनाला पार्श्वभूमी आहे, ती स्त्रियांच्या अगदी मुलभूत अशा न्याय्य हक्कांच्या मागणीची…

खरे तर भारतातसुध्दा स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम १५ नुसार कुणालाही लिंग, धर्म, जात-पात, भाषा या गोष्टींवरून भेदभाव करता येत नाही. म्हणजे या आधारे सर्व क्षेत्रात महिलांना पुरूषांच्या बरोबरीने समान संधी उपलब्ध व्हाव्या अशी घटनात्मक तरतूद आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. अजुनही स्त्री-पुरूषांना समान वेतन किंवा मोलमजुरी समान दराने मिळत नाही. अजुनही कित्येक क्षेत्र स्रियांना खुली नव्हती. त्यासाठीचा झगडा अद्यापपर्यंत सुरूच होता. त्यामुळे अजुनही ‘महिला दिन’ साजरा करण्याचे महत्त्वं आधोरेखित होत गेलं

अर्थात एवढी वर्ष महिलांमध्ये होत आलेली आपल्या हक्कांविषयीची जागृती आणि वैचारिक परिवर्तन यामुळे बरेच चांगले बदल देश-विदेशात घडून आले आहेत. स्त्रियांनी स्वतःचे सार्वजनिक स्थान उंचावण्यात यश मिळवले आहे. आजवर खुली नसलेली सैन्य इ. क्षेत्रं होती, पण आता स्त्रियांना तिथेही प्रवेश दिला जात आहेत. अर्थात त्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. भोवतीची सामाजिक आणि कौटुंबिक बंधनं पार करून शिक्षण घेण्याचा निश्चय केला. शिक्षणामुळे आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे जाण्याचा मार्ग तयार झाला. विविध कला, तंत्र आणि ज्ञान आत्मसात करून त्याला प्रामाणिक तळमळ, धाडसीवृत्ती, मनाचे धैर्य व चिकाटी या गुणांची जोड देऊन आजच्या स्त्रीने आपल्या प्रगतीचा मार्ग स्वतःच शोधला.

वास्तविक भारतात वेदकालीन स्त्री प्रगतच होती. गार्गी-मैत्रेयी या दोन ऋषीकन्यांचे उदाहरण तर प्रसिध्दच आहे. त्यांनी विद्वतसभेत खंडन-मंडन करून तात्त्विक वाद जिंकला होता. पण त्यांच्याशिवायही अनेक ऋषीपत्नी आणि कन्या यांनी गहन अशा तत्वज्ञानाचा अभ्यास करून ग्रंथही लिहीले आहेत. परंतु त्यानंतर धार्मिक कर्मकांडाचा अतिरेक, परकीय आक्रमणांचा सततचा धोका यामुळे मध्ययुगीन कालखंडात स्रियांची स्थिती अनेक कारणांनी दयनीय झाली. सामाजिक अवास्तव मर्यादांनी तिचं जीवन जखडून गेलं, तरी संत जनाबाई,मुक्ताबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा या स्त्रियांनी अभंगवाणीतून महिलांची दुःखं मांडली. याबाबत संत जनाबाईचा एक अभंग प्रातिनिधिक स्वरूपात स्त्री सामर्थ्याची जाणीव देणारा आहे, ती म्हणते, ” स्त्रीजन्म म्हणुनि न व्हावे उदास …” हिच स्त्रीसामर्थ्याची पेटती मशाल पुन्हा ऐतिहासिक काळात स्त्रियांनी तेजाळत ठेवून आपले तेज दाखवून दिले.

 राजमाता जिजाऊसाहेब, येसूबाई, ताराराणी, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मोगल साम्राज्ञी रझिया सुलतान असेल, राणी रूपमती किंवा जोधाबाई असेल,  या स्रिया लेखनवाचनाचे धडे घेऊन सुशिक्षित तर झाल्या होत्याच पण त्यांनी युध्दकलेचं विशेष प्रशिक्षण घेतलेलं होतं. तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात या सर्व स्त्रिया इतक्या  प्रवीण होत्या की, त्यांनी शत्रूला नामोहरम केल्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला आहे. या स्त्रिया आजही प्रेरणेचा स्त्रोत आहेत. 

 आजच्या आधुनिक काळात विज्ञानात पारंगत होवून तंत्रज्ञान आत्मसात करून कॉर्पोरेट असो की शेती, सैन्यदल, पोलीसदल असो की प्रशासकीय सेवा, राजकारण असो की साहित्य, पत्रकारिता असो किंवा उद्योग-व्यवसाय, तसेच क्रीडा आणि  कलाविश्व  अशा प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रात्रंदिवस स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या कथा डोळ्यासमोर दिसत आहेत… तरीही काही प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहेत, अजुनही उर्वरीत आहेत… ते आहेत स्त्रीचा सन्मानाबद्दल..

 स्त्रिया आपली भूमिका सर्व परींनी योग्यत-हेने पार पाडत असताना खरंच तिच्या कौशल्याचं कौतुक होतं का,  तिला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते का, तिचं  शील  आणि पावित्र्यं जपलं जातं का… या प्रश्नांची उत्तरं दुर्दैवाने अजुनही नकरार्थी आहेत. कामाच्या ठिकाणी महिला वरीष्ठ अधिकारी असेल, तर अजुनही पुरूषवर्गालाच नव्हे तर स्त्रियांनाही सहन होत नाही. तिचा अपमान करण्याच्या आणि तिचा अधिकार नाकारण्याच्या संधी शोधल्या जातात. स्वाभिमानाने, बुध्दीच्या जोरावर एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचणा-या स्त्रियांबद्दल शंका घेतल्या जातात.

 आता तर , कोरोना काळानंतर येणा-या या महिलादिनाला खूपच व्यापक अर्थ आहे. कारण या महासाथीच्या काळात खरी परीक्षा दिली ती स्त्रियांनी! मनाचे धैर्य राखून कुटूंबाचे आरोग्य जपणे, घरकाम करून ‘वर्क फ्रॉम होम’ करीत नोकरी सांभाळणे, अनेक कुटुंब प्रमुखांचे नोकरी व्यवसाय गेलेले असताना घर चालवणे ही सर्व असामान्य परिस्थिती स्त्रियांनी असीम धैर्याने सावरली. कोरोना परिस्थिती पूर्ववत होताना पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासाने…आत्मनिर्भरतेकडे …महिलांचा प्रवास प्रगतीची भरारी घेऊन  झेपावतो आहे..

प्रगतीच्या मार्गातले अनेक अवघड घाट चढून दमछाक झाली तरी..पुन्हा एकदा पायात बळ आणून, कंबर कसून  रस्त्यातल्या विविध अडथळ्यांना पार करून स्त्री आपले स्थान या समाजात मानाने मिळविण्यासाठी झटते आहे. प्रत्येक स्त्रिच्या मनात या दिवशी एक तरी आशेचा किरण चमकून जावा आणि त्या प्रकाशात तिला आपली वाट शोधता यावी, याच  महिला दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

 © अमृता खाकुर्डीकर, पुणे.

[email protected].

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *