मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन?

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे— केरळमध्ये २९ मे रोजी प्रवेश झाल्यानंतर ३१ मे रोजी मोसमी पावसाने (मान्सून) अरबी समुद्राच्या बाजूने जोरदार प्रगती करीत कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्याच्या सीमेपर्यंत धडक मारल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेअगोदर आगमन होणार या बातमीने बळीराजाबरोबरच उष्णतेने हैराण झालेल्या सर्वांनाच हायसे वाटले होते. परंतु, राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पाऊस लवकर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीची कामेही आटोपून घेतली. मात्र आता वेळेआधी दाखल होणारा मान्सून रेंगाळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुन्हा एकदा मान्सूनची तारीख पुढे गेली आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३  जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी केरळ प्रवेशानंतर अवघ्या दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाला यंदा प्रतिकूल वातावरणामुळे विलंब झाला आहे. मोसमी पावसाच्या महाराष्ट्रातील प्रवेशाची सर्वसाधारण तारीख ७ जून आहे. मात्र, हवामानाच्या स्थितीतून सध्या तरी या प्रवेशाबाबत मुहूर्त मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका कायम असून, पूर्वमोसमी पावसाच्या सरींचीही सध्या प्रतीक्षा करण्यात येत आहे.

केरळमध्ये २९ मे रोजी प्रवेश झाल्यानंतर ३१ मे रोजी मोसमी पावसाने अरबी समुद्राच्या बाजूने जोरदार प्रगती करीत कर्नाटकच्या कारवारपर्यंत धडक मारली होती. त्यावेळची समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची स्थिती आणि वेग लक्षात घेता ५ जूनपर्यंत मोसमी पावसाच्या महाराष्ट्र प्रवेशाचे भाकीत हवामान विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, लगेचच वातावरणात बदल होऊन मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला प्रतिकूल स्थिती निर्माण झाली. समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग अद्यापही मंदावलेला असल्याने मोसमी वाऱ्यांच्या प्रवासात खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या बाजूने त्यांची गेल्या सहा दिवसांपासून कोणतीही प्रगती झालेली नाही. बंगालच्या उपसागराच्या बाजूने ३ जूनला मोसमी पावसाने मोठा टप्पा पूर्व करून पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांसह थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मजल मारली असली, तरी तीन दिवसांपासून या भागांतही मोसमी वाऱ्यांचा प्रवास थांबला आहे.

उत्तरेकडील राज्य आणि मध्य भारतात मात्र कमाल तापमानात वाढ होऊन काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *