आमचा दिवस कोणता?

महाराष्ट्र लेख
Spread the love

भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व घटकांना संविधानानुसार न्याय मिळतोय का? या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना टाकलेला हा प्रकाशझोत …

अजूनही समाजातील एक वंचित घटक म्हणजे तृतीयपंथी. आज महिला दिनाच्या निमित्ताने पडलेला एक प्रश्न ..यांचा दिन कोणता ? कोणत्या दिवशी यांचा सन्मान केला जातो? कोणत्या दिवशी यांना समानतेने वागवले जाते?का यांची अशी फरफट?समाजाने अजूनही यांना स्वीकारलेले नाही. कधी मिळणार यांचा हक्क? मग हक्कासाठी यांना स्वत:लाच लढावे लागेल का? हो यांच्या हक्कासाठी ,सन्मानासाठी यांना स्वत:लाच लढावे लागेल. स्वतः घेतलेला कमीपणा सोडून दयावा लागेल.स्वत:चे हक्क स्वतःला मिळवावे लागतील.किती दिवस हे लाचारीचे जीवन जगणार? किती दिवस रस्त्यावर पैसे गोळा करत फिरणार ?गरज आहे जीवनाचा मार्ग बदलण्याची, स्वकष्टाने जीवन फुलविण्याची, समाजात मान मिळवण्याची..

कारण हे जीवन पुन्हा नाही. आपली नेमकी ओळख कोणती? या विचारचक्रात अजूनही तृतीयपंथी अडकलेले आहेत. कुटुंबातून जबरदस्ती हाकलून  देणं ,कुटुंब आणि शाळेत होणारा भेदभाव, शारीरिक व मानसिक अत्याचार,आरोग्याच्या समस्या, शिक्षणाच्या संधीचा अभाव ,मानवी तस्करीचे बळी, सामाजिक सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि रोजगाराच्या संधीचा अभाव,पदोपदी होणाऱ्या अन्यायाची न  घेतली जाणारी दखल या सर्व समस्यांना तृतीयपंथीयांना तोंड दयावे लागते. आई वडिलांना उतारवयात मुले सांभाळतात व नाही सांभाळले तर वृद्धाश्रमाचा पर्याय असतो परंतु तृतीयपंथीयांना कोण सांभाळणार ?याची तजवीज ना समाजाने केली ना सरकारने. मरणानंतरही त्यांच्या धार्मिक विधीचा प्रश्न भेडसावतो.

बाराव्या पंचवार्षिक योजनेत (२०१२-२०१७)तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने पावले उचलली आहेत. तृतीयपंथियांना  राहण्यासाठी घर, शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार आणि कौशल्य विकास यासाठी आर्थिक तरतूद करावी असे म्हटले गेले आहे. तसेच नुकतेच लोकसभेत तृतीयपंथी । बहुलिंग (संरक्षण) विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. यामध्ये एकूण नऊ प्रकरणे दिली आहेत.शासनाने जर यांना समान संधी दिली तर यांना शिक्षण  घेता येईल. पर्यायाने स्वतःचे पोट भरण्यासाठी नोकरी करता येईल .काही राखीव जागा यांच्यासाठी ठेवल्या तर यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. यांच्या शक्तीचा चांगल्या कामांसाठी उपयोग केला तर त्यांनाही मानाचे जिणे प्राप्त होईल. स्वतःच्या देहाचे प्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. व वर्षानुवर्ष वंचित राहिलेल्या पिढीला जगण्याचा एक मार्ग मिळेल.

सखी चार चौघीच्या कार्यकर्ता गौरी सावंत या म्हणतात ‘आम्ही वाजवलेली टाळी ही टाळी नसून आमचा आक्रोश आहे. कधी समाजाला हा आक्रोश ऐकू येणार?

बालपणीच यांच्यासाठी शाळेत सुरक्षिततेचे वातावरण तयार करुन त्यांच्या शारीरिक अवस्थेची जाणीव करून दिली तर त्यांच्यातील न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल . निसर्गतः घडून आलेला हा बदल त्यांच्या कुटुंबियांनी व समाजाने स्विकारला तर त्यांच्या जीवनाची नवी सुरूवात होईल . गौरी सावंत यांनी बदललेला मार्ग व नवीन जीवनाची केलेली सुरूवात सर्व तृतीयपंथीयांसाठी एक आदर्श ठरेल यात शंका नाही. आज महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना व त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

          लढण्या तुज बळ मिळो

          व्हावी तू रणरागिणी

          सज्ज हो युद्धासाठी

जीवन जग स्वाभिमानी.….

पौर्णिमा रणपिसे-सावंत ,प्राथमिक शिक्षिका , पुणे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *