पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवार अॅड. रुपाली पाटील- ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा येथून एका तरुणाने रुपाली पाटील यांना मोबाईलवर ‘पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिली आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी धमकी देणाऱ्याला शोधून त्याला अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून देण्यासाठीच्या मतदानाची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विविध राजकीय पक्षांचे, आघाड्यांचे उमेदवार आपापला प्रचार करता आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड , भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील यांच्यासह ३५ जण रिंगणात आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार पोहचला आहे.
रुपाली पाटील यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला आहे. दरम्यान, त्यांना शनिवारी एका अज्ञात नंबरवरून धमकीचा फोन आला. ‘मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू.’ अशी धमकी दिली. पाटील यांचा फोन त्यांच्या सहकारी महिलेकडे होता. या फोनमुळे ही सहकारी महिला प्रचंड घाबरली. रुपाली पाटील यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अशा धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. त्या रविवारपासून पुन्हा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून त्यांनी सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.