राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून ही भाषा योग्य नाही-का म्हणाले असे चंद्रकांत पाटील?


पुणे—मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर जे भाषण केले ते आधीच्या आणि आताच्या दसऱ्याला केलेल्या भाषणासारखे होते. त्यांचा आपण कसे चुकले हे दाखवण्यासाठीचा थयथयाट सगळ्या भाषणांमध्ये सारखा आहे. निराशा व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून ही भाषा योग्य नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. परंतु,  यांची भाषा ही सारखी तोडेन, ठोकेन, दाखवून देईन अशी आहे. त्यामुळे याचा सुद्धा सर्वसामान्य माणसाने विचार करण्याची वेळ आली आहे, असेही पाटील म्हणाले.

भाजपाची आणीबाणी मोडून काढायची तर दिल्लीत शिवसेनेसारखा पक्ष हवा. त्यासाठी इतर राज्यांतही शिवसेना वाढवण्यासह महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्याच्या जिद्दीनेच लढूया, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला आहे. त्यावर  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

हिंदुत्व सोडले की नाही हे कॉँग्रेसला सांगा

पाटील म्हणाले, “४३ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. डोळ्यासमोर आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चालल्याचे दिसते तेव्हा माणूस निराश होतो आणि तेच उद्धव ठाकरे करत आहेत. आदित्य ठाकरेंनी राजभवन हा भाजपाचा अड्डा झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या व्यक्तव्यवरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, अरे, तुझे बाबा भेटायला तयार नसतील, तर राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांना भेटणार ना. मला उद्धव ठाकरेंच्या २७ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोविडच्या सुरुवातीलाच फोन आला होता. आम्ही वेगवेगळ्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला तरीही ते भेटले नाहीत. आजारपणातही ते उपलब्ध नव्हते. २७ महिन्यांत आमची भेट झाली नाही आणि आमच्या पत्रांना उत्तरेही मिळाली नाहीत. वाढदिवसानिमित्त फोन केल्यानंतर मिलिंद नार्वेकर फोनवर येतात आणि लावून देतो म्हणतात पण फोन लावला जात नाही. अजित पवार हे इच्छा व्यक्त केली की भेटतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

अधिक वाचा  अजित पवार म्हणतात...वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक

मुख्यमंत्री एका राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षालाही भेटायला तयार नाहीत. महाराष्ट्रात घटनेनुसार राज्यपाल सर्वोच्च आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो. तुम्ही उपलब्धच नाही आहात. त्यामुळे असाल तर प्रताप सरनाईकांविरोधात कारवाई करा. त्यामुळे सगळेच विषय अंगाशी आल्याने शिवसेना त्रस्त आहे आणि वारंवार हिंदुत्वाचे विषय काढत आहे. हिंदुत्व सोडले आहे की नाही हे काँग्रेसला सांगा, अल्पसंख्याकांना सांगा. आम्हाला का सांगता, असा सवाल त्यांनी केला.

नाना पटोले यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी लागेल

चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी लागेल. नाना पटोले यांचा हेतू काय आहे. देशातील सर्वोच्च पदावरच्या नेत्याला काही बोलले की प्रसिद्धी मिळते, अशी त्यांच्या नेत्याची पॉलिसी आहे. ते तेच फॉलो करतायत. राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अधिक वाचा  विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? - रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचले

नाना पटोलेंना काँग्रेस पक्षाने थोडं निरीक्षणाखाली ठेवायला पाहिजे. पंजाबच्या घटनेनंतर नाना पटोले पंतप्रधान मोदी नाटक करत आहेत आणि गृहमंत्री अमित शाह यांचा हा प्लॅन होता असे म्हणतात. त्यानंतर ते मी मोदींना मारेन असे एका गावगुंडाला म्हटलो असे म्हणाले. या सर्वातून नाना पटोलेंचा हेतू काय आहे. त्यांच्या नेत्यांनी देशाच्या पंतप्रधांविरोधात असे म्हटले तर प्रसिद्धी मिळते असे सांगतिले आहे. या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी नाना पटोलेंचा निषेध नोंदवण्यात येत आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

तुम्ही काहीही करा आणि म्हणा ईडी-सीबीआय बाजूला ठेवा. जर कर नाही त्याला डर कशाला. नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था झाली आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. पडळकर काय कोणत्या एका तालुक्याचे नेते नाहीत. सगळ्या राज्यात त्यांचा वावर आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणूक यशात पडळकर, खोत हे सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाटलांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही औरंगाबादमधील पुतळाप्रकरणावरून टीका केली. जलील हे खासदार आहेत. त्यांना काय करावं हे सांगण्याचा अधिकार नाही. प्रशासन निर्णय घेईल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. शिवाय यावेळी त्यांनी भाजप-मनसे युतीचा कसलाही प्रस्ताव नसल्याचे सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love