भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ?- राजू शेट्टी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–केंद्र सरकारने २०१३ साली आणलेल्या भुमिअधिग्रहण कायद्यातील दुरुस्तीला विरोध असतानाही महाविकास आघाडीच्या सरकारने दोन अध्यादेशांद्वारे कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसानभरपाई मिळत नसून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या तसेच किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा याची सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ? राज्य सरकारने दोन कायदे केलेत त्याला आमचा विरोध आहे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. शरद पवारांना भेटून मी जाब विचारणार असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शेट्टी म्हणाले, केंद्रात सरकारच्या घटकपक्षात असूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भुमिअधिग्रहण कायद्यातील दुरुस्तीला कायम विरोध केला. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी देखील विरोध दर्शविला होता. त्यामुळे बहुमतात असलेल्या भाजपला या कायद्यात दुरुस्ती करता आली नाही. तसेच मोदी सरकारने दुरुस्तीचा निर्णय राज्य सरकारला सोपविला. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या सांगण्यावरून दोन अध्यादेश काढले. या दोन अध्यादेशामुळे शेतकऱ्यांच्या भरपाईत ७० टक्के कपात झाली. जवळपास दोन तृतीयांश रक्कम कपात झाली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

जमिनी ताब्यात घेऊन विकासकामे होत असतील तर त्याला विरोध नाही. परंतू विकासाच्या नावाखाली होत असलेला भ्रष्टाचार थांबायला हवा. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन घेण्यास आमचा विरोध राहील. शेतकऱ्यांचे योग्यप्रकारे पुर्नवसन करणे आवश्यक आहे. सरकारच्या कामाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी श्वेतपत्रिका काढणे आणि दोन्ही अध्यादेश रद्द करणे ही आमची प्रमुख मागणी असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

शेतकरी पावसात विरघळून गेला

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भर पावसात भिजत भिजत राज्यातील जनतेला मत देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे जनतेने देखील भरभरून मत दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. परंतू पावसात ढेकळे जसे विरघळून जातात तसाच महाराष्ट्रातील शेतकरी देखील पावसात विरघळून गेल्यासारखी परिस्थिती झाल्याचा टोला शेट्टी यांनी शरद पवारांना लगावला. तसेच पवार साहेबांनी सरकारच्या बाबतीत धोरण काय हे स्पष्ट करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

चालू असलेले प्रकल्प बंद पाडू

काटकसरीच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांचा खर्च वाढतो म्हणून शेतकऱ्यांचा मोबदला कमी करत असताना आज जलसंपदा विभाग असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, किंवा ग्रामीण विकास खाते असो यात इतका भ्रष्टाचार बोकाळला आहे की खालपासून वरपर्यंत जवळपास 20 टक्के रक्कम ही वाटण्यात जाती. त्यात लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचा देखील समावेश आहे. हजारो कोटी रुपये इथं मुरतात याबाबत सरकार काहीच गांभीर्याने विचार करत नाही. पण काटकसरीच्या नावावर फक्त शेतकऱ्यांचा गळा घोटला जात असेल तर भविष्यात आम्ही गप्प बसणार नाही. तसेच चालू असलेले प्रकल्प बंद पाडू, असा इशारा देखील यावेळी शेट्टी यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीने हुरळून जायचे कारण नाही

स्थानिक स्वराज्य संस्थेत राज्यात ज्यांचं सरकार असतं त्यांचे लोक विजयी होतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहे म्हणून हे लोक त्यांच्याकडे गेलेत, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. यावरुन राज्याचं सार्वमत सांगता येणार नाही, महाविकास आघाडीने त्यांचा कारभार सुधारला नाही तर त्यांना धोक्याची घंटा निश्चित आहे, असे सूचक विधान राजू शेट्टी यांनी केले आहे.

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी भाजपसह इतर राजकीय पक्षांना धोबीपछाड देत मोठा विजय प्राप्त केला आहे, यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, रोहितचे अभिनंदन, सगळे विरोधात असताना रोहित लढला. इतर भागातील तरुणांनी पण रोहितचा आदर्श घ्यावा, प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो, ती ताकद , क्षमता आपल्यात आहे हे लक्षात घ्यावं, अशी प्रतिक्रिया रोहित पाटलांच्या विजयावर त्यांनी दिली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *