पुणे- “नवीन शैक्षणिक धोरणात अनेक नावीन्यपूर्ण तरतुदी आहेत. मातृभाषेतून शिक्षण, सैद्धांतिक मूल्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आज देशात आत्मनिर्भरतेचे वातावरण आहे. या आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांची जोड देण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
बावधन (पुणे) येथील कॅम्पसमध्ये सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या 23 व्या स्थापना दिवसानिमित्ताने ‘सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते देऊन
विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनिजी, भजन गायक अनूप जलोटा, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कोणत्याही कामात समर्पण, कठोर मेहनत हवी. उद्योजकतेची अनेक क्षेत्रे आज खुणावत आहेत. त्या संधींचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या कामात प्रामाणिकता, पारदर्शकता हवी. ग्रामीण भागातील अनेक मुले आयएएस, आयपीएस झाली आहेत. त्यामुळे मातृभाषेचा आग्रह धरावा”, असे त्यांनी सांगितले.
सूर्यदत्ता संस्थेने निवड केलेल्या पुरस्कारार्थींचे कार्य प्रेरणादायी ठरेल, असे सांगून राज्यपाल कोश्यारी म्हणाले, कला, क्रिडा, साहित्य, विज्ञान, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात समर्पक भावनेने काम करून या पुरस्कारार्थींनी आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे. देशाचा सर्वांगीण विकास साधताना विविध क्षेत्रात काम होताना दिसत आहे. देशाला वेगळया उंचीवर घेवून जाण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समर्पक भावनेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कोरोनाने आपल्याला स्वतःबरोबरच सामाजिक भान जपत योगदान देणे आवश्यक आहे, हे शिकवले. मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावेत, त्यांची बौद्धिक, मानसिक तसेच भावनिक वाढ व्हावी, त्यांची सर्वांगीण जडणघडण व्हावी, याकरिता त्यांना विविध क्षेत्रातील लोकांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला हवी. त्याच उद्देशाने सूर्यदत्ता जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातून ही आदर्श व्यक्तिमत्त्व समोर आणत असतो.”
‘सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ स्वर्गीय डॉ. टी. बी. सोलाबक्कणवार (कला आणि संस्कृती), ज्येष्ठ चरित्र अभिनेते किरण कुमार (भारतीय सिनेमा), अभया श्रीश्रीमल जैन (जागतिक उद्योजकता), डॉ. मुकुंद गुर्जर (विज्ञान आणि तंत्रज्ञान), विक्रम राजदान (दिग्दर्शक आणि निर्माता), डॉ. आर. एम. अग्रवाल (वैद्यकीय समाजसेवा), कृष्ण प्रकाश (सार्वजनिक सेवा, आरोग्य आणि तंदुरुस्ती), ज्योत्स्ना चोपडा (पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक फळभाज्या) यांना प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ पंडित विजय घाटे (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अद्याशा दास (पर्यटन आणि भारतीय हेरिटेज), अजिंक्य देव (भारतीय सिनेमा), साजन शाह (प्रेरक वक्ता), लावण्या राजा (जागतिक उद्योजकता), रिया जैन (ललित कला- चित्रकला), राधिका ए जे (सर्जनशील कला) यांना प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शिल्पा भेंडे आणि सिद्धांत चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी आभार मानले.
 















