संगीत शिक्षणातील ललित कला केंद्राची देदीप्यमान वाटचाल

पुणे-मुंबई लेख
Spread the love

1 ऑक्टोबर हा दिवस ‘युनेस्को’च्या ‘इंटरनशनल म्युझिक कौन्सिल’तर्फे ‘आंतरराष्ट्रीय संगीत दिन’ म्हणून साजरा केला जातो. ह्या निमित्ताने संगीताचे सादरीकरण, शिक्षण, प्रसार इ. अनेक बाबींवर विचारपूर्वक कृती केली जाते. हेच उद्दिष्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘ललित कला केंद्र गुरुकुल’ अक्षरश: साकार करत आहे. संगीतशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ‘ललित कला केंद्रा’तील संगीत शिक्षणाचा व केंद्राच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा इथे घेत आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या प्रेरणेतून १९८७ साली तेव्हाच्या पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राची स्थापना झाली. जून १९८८ पासून बी.ए. व १९९१ पासून एम.ए.चे वर्ग सुरु झाले. म्हणजेच गेल्या ३३ वर्षांत बी.ए.च्या ३० व एम.ए.च्या २९ बॅचेसमधील विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आज संगीतक्षेत्रात कार्यरत आहे. हिंदुस्थानी संगीतासाठी परंपरेने गुरुकुल पद्धती चालत आली आहे. मुळात शास्त्रोक्त संगीत हे ‘गुरुमुखी विद्या’ असल्याने गुरु-शिष्यांच्या प्रत्यक्ष आदानप्रदानातून ही कला फुलत जाते. विद्यापीठीय स्तरावर संगीताचे असे गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे ‘ललित कला केंद्र’ हा भारतातील पहिला  विद्यापीठीय विभाग आहे. तत्पूर्वी अनेक विद्यापीठांमध्ये संगीत विभाग होते व त्यांत संगीताची पदवी दिली जात होती, मात्र गुरुकुल पद्धतीचा अंतर्भाव तिथे नव्हता. गुरुकुल पद्धती आणि विद्यापीठीय शैक्षणिक चौकट यांचा समन्वय ‘ललित कला केंद्रा’ने घातला. त्याद्वारे पारंपरिक संगीतशिक्षण आणि आधुनिक विद्यापीठीय दृष्टिकोण यांचा समतोल साधला आहे.

कलाशिक्षणात प्रत्यक्ष सादरीकरणातील कौशल्यविकास आणि सैद्धांतिक अभ्यास असे दोन भाग असतात. संगीतासारख्या प्रयोगकलेच्या बाबतीत अर्थातच सादरीकरणातील कौशल्य विकसित करणे यावर सर्वाधिक भर असतो. म्हणूनच ‘ललित कला केंद्र’मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यास नियुक्तगुरुकडेप्रात्यक्षिक शिक्षण, म्हणजे‘तालीम’ घ्यावी लागते. त्यागुरूच्या शिकवणीतून आणि सहवासातूनही विद्यार्थी अनेक बारकावे शिकत जातो. इथे गायनाखेरीज हार्मोनियम, बासरी, व्हायोलीन, सतार अशी स्वरवाद्ये आणि तबला, पखवाज ह्या तालवाद्यांचे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय दर आठवड्यातील ‘सेतुतासिके’त विद्यार्थांचा रियाज व पूरक शिकवणी होते. ‘मंथन’ उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी कलाप्रस्तुती करून मैफलीचा अनुभव घेतो. विभागात होणाऱ्या अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या कार्यशाळा, रियाज शिबिरे, सादरीकरणे यांतून संगीताचे सर्वांगीण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत जाते. त्यातून एक कलाकार म्हणून विद्यार्थ्याचे अनेक पैलू उजळले जातात. ‘प्रयोगकलांची देवाणघेवाण’ ह्या उपक्रमात संगीताचा विद्यार्थी नाट्य वा नृत्यकलेचाही प्राथमिक अभ्यास करतो. त्यामुळे इतर प्रयोगकलांचा संगीताशी असलेला संबंध लक्षात घेऊन विद्यार्थी बहुआयामी होण्यास मदत होते.

‘ललित’मधल्या अनेक कार्यशाळा त्यातील वेगळेपणामुळे संस्मरणीयहोत्या. उदा.आवाज जोपासना (डॉ. अशोक दा. रानडे, विद्याधर पंडित), विविध घराण्यांची गायकी (माणिक भिडे, श्रुति सडोलीकर, पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, शैला दातार, रघुनंदन पणशीकर, इ.) वाद्यवादन (उ. अल्लारखा, सुरेश तळवलकर, सुधीर माईणकर, विनायक थोरात, वसंतराव घोरपडकर, डी. के. दातार, तुलसीदास बोरकर, इ.) वाद्यदुरुस्ती व देखभाल (हेमकांत नावडीकर), कलाकारांसाठी आर्थिक नियोजन (संजय पंडित), ध्वनियंत्रणा (चिन्मय कोल्हटकर), इ.

डॉ. अशोक दा रानडे, भास्कर चंदावरकर, इ. तज्ज्ञांच्या मूलगामी दृष्टिकोणातून ‘ललित’मधीलसंगीताच्यासैद्धांतिक पाठ्यक्रमाचीआखणीकरण्यात आली.त्यात वेळोवेळी, कालानुरूप बदलही करण्यात आल्याने हा पाठ्यक्रम अत्यंत सुनियोजित आहे. सैद्धांतिक अध्यापनाचे वर्ग विभागात तज्ज्ञ अध्यापक घेतात. संगीताची मूलतत्त्वे, रागताल विचार, संगीतप्रकार, घराणी, संगीताचा इतिहास, संगीतशास्त्र, वाद्यशास्त्र हे संगीताच्या अभ्यासातील गाभ्याचे विषय इथे विद्यार्थी शिकतो. त्याशिवाय प्रयोगकलांसाठी शरीरसाधना, प्रयोगकलांतील भौतिकशास्त्र, प्रयोगकलांचे समाजशास्त्र व मानसशास्त्र, भाषा, सौंदर्यशास्त्र, संपर्कमाध्यमे व तंत्रज्ञान अशा अनेक विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यास मिळते. यातून विद्यार्थ्याच्या एकंदर कलाविषयक आकलनाचे, विचारांचे क्षितीज व्यापक करण्यावर विभागाचा भर असतो. सैद्धांतिक विषयांच्या अभ्यासात केवळ तज्ज्ञांची व्याख्याने ऐकणे एवढेच नसून तत्संबंधी वाचन, चिंतन, लेखन, पूरक असे दृक्श्राव्य साहित्य ऐकणे-पाहणे या सर्वांतून विद्यार्थ्याची चौरस घडण केली जाते.

एम.ए.च्या पातळीवर संगीतअध्यापन, लोकसंगीत, चित्रपटसंगीत, नाट्यसंगीत, जाहिरातसंगीत व नृत्यसंगीतासारखे उपयोजित संगीत, विश्वसंगीत, संस्कृती-संगीतशास्त्र, प्रयोगकलांची संशोधनप्रणाली अशा प्रगत विषयांचे शिक्षण दिले जाते. अखेरच्या वर्षी विद्यार्थी एक संशोधन प्रकल्प वा सर्जनात्मक प्रकल्प करतो. यातून ‘कलाकार’ ह्या आयामाखेरीज अध्यापक, संशोधक, लेखक, इ. पैलूही उलगडत जातात आणि अंतिमत: संगीतक्षेत्रात विविध प्रकारे उपजीविका करण्यासाठी सक्षम असे व्यक्तित्त्व घडवण्याचा प्रयत्न केला जातो.सैद्धांतिक मार्गदर्शनासाठी ‘ललित’ने काही उत्तम पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली आहे. विभागात झालेल्या चर्चासत्रांतील ज्ञानसामग्रीचे प्रकाशन ‘पुण्यस्वर’ अंकांतून करण्यात आले आहे. ‘ललित’चे सुसज्ज ग्रंथालय असून त्यात पुस्तकांशिवाय दृकश्राव्य सामग्रीही आहे.

‘ललित’मध्ये निसर्गत: कलेतील कौशल्य, कलाकार बनण्याची क्षमता असलेले विद्यार्थी शिकले, मात्र याहूनही महत्त्वाची नोंदवण्यासारखी बाब अशी की नैसर्गिक कौशल्य नसूनही काहीविद्यार्थी‘ललित’चे वातावरण, प्रोत्साहन आणि मेहनत यांच्यामुळेउत्तमप्रकारे उत्तीर्ण होऊन आज संगीतक्षेत्रात उपजीविका करत आहेत.इथेआजवर अनेक दिव्यांग वा शारीरिक-मानसिक दृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेतले आहे. ‘ललित’च्या दर्जाचा लौकिक मोठा असल्याने महाराष्ट्राबाहेरचेच नव्हे तर विदेशी विद्यार्थीही संगीतशिक्षणासाठी इथे येतात. शिवाय ‘क्रेडीट एक्स्चेंज’मधून अन्य अभ्यासशाखांचे काही विद्यार्थी संगीताच्या अभ्यासक्रमाला निवडतात.

संगीत विभागातून प्रथम पीएचडी मिळवण्याचा मान ‘ललित’च्या प्राध्यापिका, नंतर विभागप्रमुख झालेल्या डॉ. शुभांगी बहुलीकर यांना जातो. पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा अभ्यासकांनी संगीतात पीएचडी केले. प्रसिद्ध शहनाई वादक प्रमोद गायकवाड यांनी तर इथेपीएचडीपर्यंतचे शिक्षण घेतले.बासरीचे गुरु असलेल्या पं. केशव गिंडे यांनीही येथून पीएचडी केले.

ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरचमैफलीची संधीही दिली जाते. मुंबईचे यशवंतराव चव्हाण सेंटर, पुण्यातील गानवर्धन वसाधना कला मंच, कोल्हापूरचा देवल क्लब, औंधचा शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान महोत्सव येथे ‘ललित’मधून उत्तीर्ण झालेल्या कलाकारांच्या मैफली झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ ह्या पुण्यातील महत्त्वाच्या संगीत समारोहात आजवर ‘ललित’च्या आठ विद्यार्थांची प्रस्तुती झाली आहे. ही बाब ‘ललित’मधल्या कलाशिक्षणाच्या दर्जाची साक्ष देते. ‘ललित’चे अनेक विद्यार्थी आज कलाकार म्हणून शास्त्रोक्त व सुगम संगीताचे रंगमंच देशाविदेशात गाजवत आहेत, कित्येक जण टीव्हीवरच्या रियालिटी शोजमध्येही झळकले आहेत.‘ललित’चे विद्यार्थी असलेले आजचे कलाकार छोटेमोठे संगीत महोत्सव आयोजित करणे, गुरुजनांचे सन्मान व स्मृतिमैफली आयोजित करणे, संगीताचा प्रचार-प्रसार करणे असे कार्य सतत उमेदीने करतात.

मैफलीचे कलाकार होण्याखेरीज ‘ललित’चे अनेक विद्यार्थी हे संगीतशिक्षक, प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी संगीतविद्यालयांतून, शाळा-महाविद्यालयांतून संगीताचे अध्यापन करतात. गेल्या वीस वर्षांत २५ विद्यार्थी संगीतात ‘नेट’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विश्वभारती, बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, भारती विद्यापीठ, फ्लेम, चिन्मय विद्यापीठ अशा विद्यापीठांत ‘ललित’मधून शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी आताप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

‘ललित’च्या काही विद्यार्थ्यांनी अगदी वेगळी क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. उदा. समीर दुबळे व नितीन अमीन ‘स्पेक्ट्रम’ संस्था स्थापून ‘संगीत आस्वाद कार्यशाळा’ घेतल्या. प्राची दुबळे हिने आदिवासी संगीतावर मोठे संशोधन केले. दत्तप्रसाद रानडे हा उत्तम गझलगायक रचनाकार आहे. संपदा थिटे हिने संगीतरंगभूमीवर गायिका-अभिनेत्री म्हणून काम केले. रंजनी रामचंद्रन् ही उत्तम गायिका शांतिनिकेतन येथे प्राध्यापिका आहे. पुष्कर लेले याने पं. कुमारगंधर्वांच्या गायकीचा सर्वांगीण अभ्यास केला असून तोही संगीतपरिचय कार्यशाळा घेतो.सारंगी आंबेकर, कस्तुरी पायगुडे, सायली पानसे यांनी संगीतविषयक लेखन केले. श्रुति कुंटे ही ‘डॉ. अशोक दा रानडे अर्काईव्ह्ज’ची क्युरेटर म्हणून कार्यरत आहे. दीपा कुलकर्णी ही कलोपचार व कलाशिक्षण क्षेत्रात काम करतेय. रोहित नागभिडे, प्रणव बडवे, आशिष चक्रवर्ती, इ. संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत संयोजन, म्युझिक अरेंजमेंट, एडिटिंग, इ. क्षेत्रांत आहेत. अनिरुद्ध जोशी, मेघना सहस्रबुद्धे, कार्तिकी गायकवाड, इ.नी सुगम संगीताच्या क्षेत्रात ठसा उमटवला. पार्श्वगायानाचे क्षेत्रही अनेकांना खुणावत असते. ‘ललित’च्या ४-५ विद्यार्थ्यांनी  ‘सारेगमप’सारख्या रियालिटी शोजच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे.

‘ललित’च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अनेक ज्येष्ठ कलाकार गुरु ललित कला केंद्राची उंची वाढवणारे आहेत. पं. जितेंद्र अभिषेकी, गंगाधरबुवा पिंपळखरे, अलका देव मारुलकर, सुहासिनी कोरटकर, वीणा सहस्रबुद्धे, आरती अंकलीकर, पद्मा तळवलकर, सुधा पटवर्धन,शशिकला शिरगोपीकर, शोभा अभ्यंकर, अनुराधा गरुड, माधुरी जोशी, जयश्री रानडे, विकास कशाळकर, राजेंद्र कंदलगावकर, मोहन दरेकर, हेमंत पेंडसे, विजय बक्षी, पद्माकर थत्ते, विजय सरदेशमुख, विजय कोपरकर, डॉ. प्रभा अत्रे इ. ज्येष्ठ गुरूंनी ‘ललित’चे अनेक उत्तम विद्यार्थी ‘कलाकार’ म्हणून घडविले. तबल्याचे गुरु भाई गायतोंडे, सुधीर माईणकर, अरविंद मुळगावकर, सुरेश तळवलकर यांनी अभ्यासक्रम तयार करण्याबरोबरच अनेकदा कार्याशालांतून मार्गदर्शन केले. रामदास पळसुले, अरविंदकुमार आझाद, उमेश मोघे, (तबला), वसंतराव घोरपडकर, माणिक मुंडे, गोविंद भिलारे (पखवाज), प्रमोद मराठे, डॉ. अरविंद थत्ते, चैतन्य कुंटे (हार्मोनियम), केशव गिंडे, राजेंद्र कुलकर्णी (बासरी), अतुलकुमार उपाध्ये, रत्नाकर गोखले, विद्या डेंगळे, (व्हायोलीन) या ज्येष्ठ गुरूंपासून आजच्या नव्या पिढीतील अनेक कलाकार ललित कला केंद्राशी गुरु म्हणून जोडलेले आहेत. ‘ललित’मधून शिक्षण घेतलेलेही अनेक कलाकार आज इथे गुरु म्हणून उत्तम कार्य करत आहेत. ग. ह. तारळेकर, मा. कृ. पारधी, शांता निसळ, श्रीरंग संगोराम,आनंद मोडक, सुधीर मोघे,अजित सोमण,प्रसन्नकुमार अकलूजकर,दिग्विजय वैद्य, सुचेता बिडकर,लता गोडसे, रविंद्र घांगुर्डे, रसिका एकबोटे, चैतन्य कुंटे, रमा चोभे, इत्यादींनीअनेक वर्षे सैद्धांतिकविषयांचे अध्यापन केले.

डॉ. सतीश आळेकर, डॉ. शुभांगी बहुलीकर व डॉ. प्रवीण भोळे ह्या सर्वचविभागप्रमुखांनी संगीताच्या विद्यार्थांच्या प्रगतीत आस्थेने लक्ष घातले. त्यांनी अनेक उपक्रम नेटानेचालू ठेवले आणि विभागाचा विस्तार ते करत गेले.हेमा देशपांडे यांनी अनेक वर्षे अध्यापन सहायक म्हणून मोलाची कामगिरी बजावली आहे. संगीतात बी.ए., एम.ए. व पीएचडीचा अभ्यास आतापर्यंतहोत होता. आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ताबारावीनंतर एकूण पाच वर्षांचा ‘एम.ए. एकात्मिक अभ्यासक्रम’ सुरु होत आहे.

नुकत्याच झालेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विभागानेऑनलाइन माध्यमाच्या वापरातून आता अध्यापनाचेकाम सुरु ठेवले आहे.नव्या काळातील बदलांना सन्मुख राहून ‘ललित कला केंद्र’ हे भारतीय संगीताचे शिक्षण उत्तम प्रकारे देत राहिले आहे आणि ही वाटचाल अशीच उत्तरोत्तर होत राहील.

– डॉ. चैतन्य कुंटे, प्राध्यापक, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *