ज्योतिषाकडे मुहूर्त काढून टाकला १ कोटीचा दरोडा : बालाजी, शिर्डी येथे जाऊन देवदर्शन घेत दरोडेखोरांनी केला दानधर्म


पुणे(प्रतिनिधि)—ज्योतिषाकडून चोरी करण्यासाठी मुहूर्त काढून घरावर दरोडा टाकून सोने चांदीच्या दागिन्यांसह तब्बल १ कोटी ७ लाख २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेल्या ५ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीला  पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले आहे. ही घटना बारामती शहरातील देवकातेनगरमध्ये चार महिन्यांपूर्वी घडली होती. दरम्यान, मुहूर्तावर चोरी यशस्वी झाल्याने खुश झालेल्या या दरोडेखोरांनी बालाजी, शिर्डी येथे जाऊन देवदर्शन घेत दानधर्मही केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.(Robbery of 1 Crore by looking at Jyotish Muhurat)

दुर्योधन ऊर्फ दीपक ऊर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, व्यवसाय-खासगी नोकरी, रा. जिंती, हायस्कुलचे जवळ ता. फलटण, जि. सातारा), सचिन अशोक जगधने (३०, व्यवसाय – नोकरी, रा. गुणवडी, २९ फाटा, जि. प. शाळेजवळ, ता. बारामती) रायबा तानाजी चव्हाण (३२, व्यवसाय – चालक, रा. शेटफळ हवेली, जाधववस्ती, कॅनॉलजवळ, ता. इंदापूर), नितीन अर्जुन मोरे (३६, व्यवसाय खासगी नोकरी, रा. धर्मपुरी, ता. माळशीरस, जि सोलापूर), रविंद्र शिवाजी भोसले (२७, व्यवसाय-नोकरी, रा. निरा वागज, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रामचंद्र वामन चव्हाण (४३, व्यवसाय – शेती, ज्योतीष, मूळ रा. आंदरूड ता. फलटण जि. सातारा) असे ज्योतिषाचे नाव आहे.  याबाबत सागर शिवाजी गोफणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

अधिक वाचा  पुणे जिल्ह्यात घरफोड्या करणारे दोन सराईत अट्टल चोरटे जेरबंद : पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीत २१ एप्रिलला भरवस्तीत ही घटना घडली होती. सागर गोफणे यांच्याकडे जमिनीच्या व्यवहारातून मोठी आर्थिक रक्कम आलेली होती. दरम्यान, गोफणे हे तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांची पत्नी ही घरी एकटी होती. वरील पाच दरोडेखोरांनी रामचंद्र चव्हाण या ज्योतिषाच्या सांगण्यावरुन गोफणे यांच्या घरी  दरोडा टाकला. गोफणे यांची पत्नी ही घरी एकटीच होती. चोरटय़ांनी त्यांचे हात पाय बांधून ९५ लाख ३० हजार रूपये रोख रक्कम व सुमारे २० तोळे वजनाचे ११ लाख ५९ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा  असा एकूण १ कोटी ७  लाख २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

अधिक वाचा  कोरोना काळात वीज कंपनी कडून कामगारांची काळजी

चोरीच्या या घटनेमुळे खळबळ उडाल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने पोलीस पथकाची स्थापना करत आरोपींचा शोध घेतला. सीसीटीव्ही, गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत चार महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची चौकशी केली असता सागर गोफणे यांच्याकडे जमिनीच्या व्यवहारातून भरपूर पैसे असलेची माहिती आरोपी सचिन जगधने यास मिळाली होती, त्याने गुन्हयाचा कट रचला. यासाठी ज्योतिषी  रामचंद्र चव्हाण यांच्याकडून मुहूर्त देखील काढला होता. आरोपींकडून ७६ लाख ३२  हजार ४९० रूपये किंमतीचाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  त्यामध्ये ६० लाख ९७ हजार रुपये रोख रक्कम व १५ लाख ३५ हजार ४१० रुपये किंमतीचे २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणारी टोळी जेरबंद

आरोपींनी मुहूर्त काढत चोरी केली. ही चोरी यशस्वी झाल्याने त्यांनी तिरूपती बालाजी आणि शिर्डी येथे जाऊन दर्शन घेतले. तसेच तेथे दानधर्म देखील केले होते. आरोपींनी चोरीच्या पैशातून दागिने बनवले होते. हे दागिने चोरी केल्याच्या एक वर्षानंतर विकून ते पैसे घेणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love