आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन क्रिकेट बुकींना अटक

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : पुणे शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन क्रिकेट बुकींना ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रूपयांवर अधिकची रोकड जप्त केली आहे.

या कारवाई दरम्यान, सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले  असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

गणेश भुतडा हा देशातील एक बडा क्रिकेट बुक्की म्हणून ओळखला जातो अशी माहिती समोर आली आहे तर अशोक देहुरोडकर हा देखील महाराष्ट्रातील खुप मोठा बुक्की आहे. समर्थ आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता पेठेतील त्रिमूर्ती सोसायटीत रविवारी रात्रीच्या सुमारास आयपीएलच्या सामन्यांवर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी छापा टाकला असता ऑनलाईन सट्टा लावण्याचा प्रकार समोर आला. घटनास्थळी डायरी,मोबाईल,रोख रक्कम आढळून आली. आरोपी गणेश भिवराज भुतडा याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अबुधाबी येथे सुरू असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची कबुली दिली. यावेळी ९२ लाख रोख रक्कम आणि ६५ हजार किमतीचे मोबाईल, नोटा मोजण्याची मशीन,बनावट कागद पत्रे, सिमकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेच्या प्रभारी अप्पर आयुक्त भाग्यश्री नवटके, झोन -1 च्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने तसेच इतर वेगवेगळया पथकांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली.

दरम्यान, गणेश भुतडा आणि अशोक देहुरोडकर यांना ताब्यात घेतल्याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लोणावळा आणि मुंबईतील काही मोठे बुकी परागंदा झाल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. भुतडा आणि देहुरोडकर यांचे कोणा-कोणाशी संबंध आहेत याबाबत देखील माहिती काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *