पुणे- दहावी- बारावीच्या निकालानंतर जुलै- ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा येत्या नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० ते २९ ऑक्टोबरदरम्यान नियमित शुल्कासह आणि ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. पुरवणी परीक्षा आणि श्रेणीसुधारसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे.
दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाते. परंतु, कोरोनाच्या स्न्कातामुळे ही परीक्षा यंदा घेण्यात आली नव्हती. राज्य मंडळाने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
श्रेणीसुधारसाठी विद्यार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर २०२० आणि फेब्रुवारी मार्च २०२१ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध असतील. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना फेब्रुवारी मार्च २०२०च्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेची माहिती आवेदन पत्रात ऑनलाइन पद्धतीने घेता येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर शाळांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पैसे भरून त्याची पोचपावती आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे सादर करावी. अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
दम्यान, दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण, श्रेणीसुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक अंतिम झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल, असे भोसले यांनी म्हटलं आहे.