पुणे(प्रतिनिधी)–येत्या ७ ऑगस्ट रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणाऱ्या बहुचर्चित ‘ओह माय डॉग’ या चित्रपटाच्या पुणे येथील विशेष प्री-रिलीज स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा अभूतपूर्व आणि भावनिक प्रतिसाद लाभला. चित्रपटाची संवेदनशील कथा आणि माणूस-प्राण्यांमधील नात्याचे चित्रण पाहून पुणेकर भारावून गेले असून, हा चित्रपट म्हणजे प्रेम, करुणा आणि सहानुभूतीचा संदेश देणारी एक कौटुंबिक पर्वणी ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.
चित्रपटाच्या या विशेष प्रदर्शनासाठी अभिनेते जितेंद्र जोशी आणि विजय मिश्रा यांनी पुण्यात हजेरी लावली होती. स्क्रीनिंग संपल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधी आणि प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटाच्या अनुभवावर चर्चा केली. पुण्यातील प्रेक्षकांनी ‘ओह माय डॉग’वर भरभरून प्रेम वर्षाव केला असून चित्रपटाची भावनिक कथा, प्रभावी अभिनय आणि माणूस व कुत्रा यांच्यातील हृदयस्पर्शी नात्याचे संवेदनशील चित्रण प्रेक्षकांच्या मनाला अक्षरशः भिडले आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनात्मक नसून प्रेम, करुणा आणि सहानुभूतीचा संदेश देणारा आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने व सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी एकत्र येऊन हा चित्रपट आवर्जून पाहावा, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी पुणेकरांनी व्यक्त केल्या.
प्रेक्षकांकडून मिळालेल्या या उदंड प्रतिसाताबद्दल अभिनेते जितेंद्र जोशी आणि विजय मिश्रा यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. चित्रपट अधिकृतपणे प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षक या भावनिक कथेशी जोडले जात असल्याचे पाहणे आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेक्षकांना या चित्रपटासोबत हसताना, आनंद घेताना आणि भावनिकरीत्या एकरूप होताना पाहणे हा एक सुखद अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रेम, करुणा आणि माणूस व प्राण्यांमधील निःशब्द पण अतूट नात्याचा उत्सव आहे. येत्या ७ ऑगस्टपासून देशभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात अनुभवावा, यासाठी संपूर्ण टीम उत्सुक आहे. पुण्यातील या सकारात्मक प्रतिसादानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीचा उत्साह आणखी वाढला असून, देशातील विविध शहरांमध्ये सध्या या चित्रपटाची प्रचारमोहीम वेगाने सुरू आहे.
बाबूलाल बिस्कोप आणि थिंकिंग हॅट्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली अमित राय, राजेश भारद्वाज आणि सना वारसी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘ओह माय डॉग’ मध्ये माही राय, पंकज त्रिपाठी, गीता अग्रवाल शर्मा, राजेश कुमार, पवन मल्होत्रा, सुलाख्याना बरुआ, विजय मिश्रा यांच्यासह कॅनाईन स्टार्स ऑस्कर आणि ब्रुनो तसेच तब्बल २५० हून अधिक कुत्रे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. आगामी ७ ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये भव्य स्वरूपात प्रदर्शित होत आहे.













