खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात ४३ हजार ५७१ क्युसेकचा मोठा विसर्ग सोडण्यात येणार : सतर्कतेचा इशारा


पुणे शहरासह खडकवासला धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिपर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या बिघडत्या हवामानाची आणि वाढत्या पाण्याच्या आवकेची गंभीर दखल घेत, खडकवासला पाटबंधारे विभागाने आज दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ठीक ३:०० वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळेत विसर्ग ३५,५७४ क्युसेकवरून वाढवून थेट ४३,५७१ क्युसेक इतका करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनी दिली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ (येवा) सतत बदलत असल्यामुळे, पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या सर्व नागरिकांनी व संबंधितांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे.

अधिक वाचा  खडकवासला १०० टक्के भरले : धरणाच्या सांडव्यातून ११ हजार ९०० क्युसेक विसर्ग : नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

पाटबंधारे विभातर्फे नदीकाठच्या परिसरासाठी विशेष खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही नागरिक किंवा व्यक्तीने सुरक्षेच्या दृष्टीने मुठा नदीपात्रात उतरू नये. तसेच, नदीपात्रा लगतच्या परिसरात जर काही तत्सम साहित्य, शेतीची उपकरणे, मोटारपंप किंवा जनावरे बांधलेली वा अडकलेली असतील, तर ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावीत. नदीकाठच्या सखल भागातील वस्ती व नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या या सूचना विनाविलंब पोहोचवून योग्य ती प्रशासकीय व नागरिक पातळीवरील कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पूरस्थिती उद्भवू नये व कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून योग्य ती खबरदारी व दक्षता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा  मुंबई-बेंगळुरू महामार्गावर कात्रज-देहूरोड बायपास मार्गावर अवजड वाहतूक निर्बंध घालण्याचा पोलिसांचा निर्णय
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love