पुणे :पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही भागात पहिली लाट आली त्यावेळी भिती होती ती आता राहिलेली नाही. त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा येत्या 5-6 दिवसात परिस्थितीत बदल झाला नाही तर नाईलाजास्तव पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही परंतु, कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा वेगअसाच राहिला तर लॉकडाऊनबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल. याबाबत 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येईल, याला कोणी एप्रिल फूल समजू नये असेही पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील विधान भवनात झालेल्या बैठकीत शहर आणि जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, सध्या कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि वाढणारी रुग्णसंख्या याला आला घालायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांसह सर्वांनीच मांडले आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा अन्यथा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.
शाळा व महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद
या बैठकीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, दहावी-बारावीच्या आणि एमपीएससीच्या परीक्षा या ठरल्या प्रमाणे होतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या अगोदर लावण्यात आलेली संचारबंदी कायम ठेवण्यात आली असून शहरातील उद्याने फक्त सकाळी उघडी राहतील. तसेच लग्न समारंभ लॉनच्या आत असू किंवा बाहेर असू 50 जणांच्या उपस्थितीतच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे तर अंत्यविधी जास्तीत जास्त 30 जणांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पवार म्हणाले, राज्यातील जनतेला सांगायचे आहे की परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नाईलाजाने कटू निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे नागरिकांना सर्व गोष्टींचे पालन करावेच लागेल. जनतेच्या मनात भीती राहिली नाही. देशात पुण्यात आकडेवारी वाढत आहे. खासगी रुग्णालयांमधील 50 टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या 300 वरून 600 करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, लसीकरण केंद्र दुप्पट केली तरी लस तेवढया प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याबाबतीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क झाल्याचे तसेच मुख्य सचिवांशी बोलणे झाल्याचे पवार यांनी सांगितले. 1 एप्रिल पासून लोक प्रतिनिधींनी राजकीय कार्यक्रम घेतले असतील त्यांनी ते खासगी कार्यक्रम रद्द करावेत. लग्न 50 जणांच्या उपस्थितीत तर अंत्यविधि 30 जणांच्या उपस्थितीत करावा असा नियम करण्यात आल्याचे पवार म्हणाले.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबधित रुग्णांची संख्या जास्त आहे. पुण्यात 25 टक्के रुग्ण सापडताहेत. त्यामुळे नियमांचे पालन केले नाही तर एक एप्रिल पासून कडक कारवाई करण्यात येइल असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक उद्याने फक्त सकाळीच व्यायामासाठी सुरू राहतील. मॉल, चित्रपट गृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील असे सांगून पवार म्हणाले, पिंपरी येथील जंबो टप्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने सुरू करणार, ससून रुग्णालयातील बेडची संख्या 300 वरून 500 बेडस करणार, ससूनमधील चाचण्यांची क्षमता 2 हजार पर्यन्त वाढवणार, अँबुलन्स कायम क्षमतेने सुरू राहतील असे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
दुसऱ्या लाटेत कमी वयातील लोकांना बाधा होत आहे. त्यामुळे 25 वर्ष वयातील सर्वांना लस द्यावी अशी मागणी पंतप्रधानांकडे करावी, अशी विनंती मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे ते म्हणाले.