पुणे-दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ३१ मार्च २०२२ अखेर आजवरची १११ वर्षातील उच्चांकी उलाढाल करीत सर्वच आघाड्यांवर यश मिळविले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये ३ हजार ४२६ कोटींची वाढ होऊन ते ४७ हजार २८ कोटींपर्यंत पोहोचले आहेत तर बँकेच्या निव्वळ नफ्यात २३८ कोटींची वाढ होऊन तो ६०२ कोटींवर पोहोचला असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेंच्या आकडेवारीमध्ये नक्त मुल्यांमध्ये गतवर्षापेक्षा पाचशे कोटींनी वाढ होऊन तो ३ हजार २०३ कोटींपर्यंत, तर बँकेचा स्वनिधी ६००९ कोटींपर्यंत पोहोचला आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यामध्ये ५७६ कोटींची भरीव वाढ होऊन तो १ हजार ४०२ कोटींवर पोहोचला आहे. सर्व तरतुदी करुन बँकेचा निव्वळ नफा ३०२ कोटींवर पोहोचल्याचे नमूद करुन ते म्हणाले, बँकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार बँकेच्या सेवकांची संख्या कमी केल्याने सन २०१८ मध्ये असलेला प्रति सेवक व्यवसाय २६ कोटींवरुन आज ६५ कोटींपर्यंत पोहोचला आहे.
सर्वच आघाड्यांवर बँकेने प्रगती केलेली आहे. गेली ९ वर्षे लेखापरिक्षणामध्ये बँकेस सतत ऑडिट वर्ग अ प्राप्त होत आहे. मागील आठ वर्षे बँक सभासदांना १० टक्क्यांइतका लाभांश देत असून, दरवर्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटीइतकी रक्कम देत आहे.
२०११ मध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य बँकेस शासनाकडून मिळालेले शंभर कोटी रुपयांचे भागभांडवल परत दिलेले आहे. अशा प्रकारे रक्कम परत करणारी सहकार क्षेत्रातील ही एकमेव बँक ठरलेली आहे. बँकेत स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केल्याने सेवकांची संख्या १८०० वरुन आता ७५० झाली आहे. त्यामुळे वार्षिक १९२ कोटींनी पगार खर्च कमी झालेला असून, व्यवसायात दुप्पट वाढ झाली आहे. बँकेने आपले व्यवहार जिल्हा बँका, साखर कारखान्यांपुरते मर्यादित न ठेवता नागरी सहकारी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्र, राज्य वखार महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल तारणावर थेट कर्जपुरवठा आदींमुळे बँकेच्या व्यवसायात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.