संतूरची तार निखळली : पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन : केवळ 500 रुपये घेऊन आले होते मुंबईत

कला-संस्कृती महाराष्ट्र
Spread the love

मुंबई -भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. पं. शिवकुमार शर्मा यांचे सचिव दिनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पं. शिवकुमार शर्मा यांचे आज सकाळी 8.30 च्या सुमारास निधन झाले.

पंडित शिवकुमार शर्मा यांचे सिनेजगतात महत्त्वाचे योगदान आहे. बॉलिवूडमध्ये ‘शिव-हरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया या जोडीने अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘चांदनी’ चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ नौ चुड़ियाँ’ हे सर्वात प्रसिद्ध होते.

संतूर असे एक वाद्य आहे, ज्याचे नाव वीणा पासून पडले आहे. यामध्ये हिंदुस्थानी आणि पर्शियन शास्त्रीय संगीताचे सुर जोडले गेले आहेत. सुफीची झलकही त्यामध्ये दिसते. पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणार्‍या काश्मीरच्या या वाद्याला कीर्ती मिळवून देणारे पंडित शिवकुमार शर्मा आज ब्रह्मात लीन झाले आहेत. त्यांच्या  संतूरची धून जितकी गोड होती, तितकेच त्यांचे बोलणेही गोड होते.

वयाच्या 5 व्या वर्षी तबला आणि 13 व्या वर्षी संतूर

पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षी तबला आणि गायन शिकले आणि त्यानंतर वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी संतूरचे शिक्षण घेतले. त्यांच्या एका मुलाखतीत पंडित शिवकुमार शर्मा म्हणाले होते की, त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी केवळ जम्मू किंवा श्रीनगरमध्ये आकाशवाणीमध्ये काम करावे आणि सरकारी नोकरीद्वारे भविष्य सुरक्षित करावे.

केवळ 500 रुपये घेऊन आले होते मुंबईत

पंडितजींनी जिद्दीने घर सोडले होते. घरून संतूर आणि खिशात फक्त 500 रुपये घेऊन ते मुंबईत आले. त्यांनी एका  मुलाखतीत असेही म्हटले होते की, “माझ्या खिशात फक्त एक आना होता आणि खायला काहीच नव्हते असे अनेक दिवस मी काढले. मला साथ देण्यासाठी तबला वाजवावा लागला. लोकांनी संतूर स्वीकारला नाही, त्यामुळे मला परफॉर्म करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर काही चित्रपट असाइनमेंट्समुळेच मला मुंबईमध्ये  माझे अस्तित्व टिकवून ठेवण्यात मदत झाली.

अनेक सुपरहिट गाण्यांना दिले संगीत

पंडित शिवकुमार शर्मा यांनी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान दिले. बॉलिवूडमध्ये ‘शिव-हरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया या जोडीने अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘चांदनी’ चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ’ हे यातील सर्वात प्रसिद्ध होते. पंडित शिवकुमार शर्मा यांची मैफल १५ मे रोजी होणार होती. लाखो लोक शिव-हरी (शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया)च्या जुगलबंदी आपल्या डोळ्यात आणि कानात साठवण्यासाठी  आतुर झाले होते. पण, या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी शिवकुमार शर्मा यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

पद्मविभूषणने सन्मानित

पंडित शिवकुमार शर्मा यांना १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी त्यांना 2001 मध्ये पद्मविभूषण मिळाले. 1955 मध्ये त्यांनी मुंबईत पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. 1956 मध्ये, झनक-झनक पायल बाजे चित्रपटातील एका दृश्यासाठी पार्श्वसंगीत तयार करण्यात आले. चार वर्षांनंतर,त्यांनी त्यांचा पहिला एकल अल्बम रेकॉर्ड केला.

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “पंडित शिवकुमार शर्माजी यांच्या निधनाचा आपल्या सांस्कृतिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी संतूरला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत पुढील पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *