इतर अभ्यासक्रम बंद करून ३३ कोटी देवांचे अभ्यासक्रम सुरू करा- छगन भुजबळ

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- ‘तुम्हाला’ पूजनीय असलेल्या सरस्वतीचे आम्हा उपेक्षित, दलित, वंचितांच्या शिक्षणामध्ये काहीही योगदान नसल्याने आम्ही सरस्वतीचे पूजन मान्य करीत नाही. त्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी नेली आणि गावागावापर्यंत नेली त्यामुळे ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज महात्मा फुले यांची १३२ वी पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त यंदाचा ‘समता पुरस्कार’ ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांना ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी भुजबळ बोलत होते.

रुपये एक लाख, महात्मा फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समता भूमी, महात्मा फुले स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाबा आढाव, रूपाली चाकणकर, कमल ढोले-पाटील, मंजिरी धाडगे, पंकज भुजबळ, समीर भुजबळ, प्रा. हरि नरके, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, नगरसेविका मनीषा लडकत, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर वैशाली बनकर, पुणे शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, पुणे शहर अध्यक्षा वैष्णवी सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आपले समाज बांधवच एकत्र येत नाहीत, ही शोकांतिका आहे. सहा डिसेंबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने पोहोचणाऱ्या अनुयायांना मुंबईत या आणि आपल्या महामानवाला वंदन करा, हे सांगावे लागत नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी रायगडावर मोठ्या संख्येने शिवभक्त जमतात, त्यांना देखील सांगावे लागत नाही. मग आपल्याच समाजातील लोकांमध्ये ही उदासीनता का दिसून येते, हे कोडे मला न सुटणारे आहे. सरकार कोणाचेही असो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित कोणताही विषय असला, तरी त्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि अशा अडचणीच्या वेळी ज्या प्रमाणात समाजाने पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्या प्रमाणात आपला समाज पाठीशी उभा राहात नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारतर्फे हजारो कोटी रूपये दिले जातात, मग हाच न्याय आम्हास लावून भिडे वाडा स्मारकासाठी का नसतो? तसेच गंजपेठेतील महात्मा फुले वाडा ते पुणे महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले सभागृह हा रस्ता देखील का जोडून मिळत नाही, हा देखील प्रश्न आहे.  दगडुशेठ हलवाई गणपती समोर अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी हजारो महिला स्वयंस्फूर्तीने जमा होतात, परंतु, त्याच मंदिरासमोरील भिडे वाडा येथे माथा टेकण्यासाठी कोणीही जात नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आलेला अथर्वशिर्षाच्या अभ्यासक्रमावर उपहासात्मक टीका करत अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रम बंद करून ३३  कोटी देवांचे अभ्यासक्रम सुरू करा, असा उपहासात्मक सल्ला भुजबळ यांनी यावेळी दिला. आज राज्य आणि केंद्रात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार नसल्याने महापुरूषांची विटंबना केली जात आहे. आपला लढा अजून संपलेला नसून डॉ. यशवंत मनोहर यांच्यासारख्या विचारवंतांना सोबत घेऊन आपल्याला लढावे लागणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, महात्मा फुले यांची पुण्यतिथी मुळात कधीच नसते, तर त्यांची केवळ जयंती असते. ज्योतिबा फुले हे कोणत्या एका तारखेला जन्मलेले नसून ते तुमच्या-माझ्या रूपाने तसेच त्यांचे विचार आणि कार्याच्या रूपाने आजही आपल्यात आहेत. हा परिवर्तनाचा लढा सुरू आहे आणि या लढ्याला ज्योतिबांचा पूर्ण पाठिंबा आहे.

ज्योतिबा, सावित्रीबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मला लेखनाचे सूत्र दिले. मी काय लिहिले पाहिजे, कशासाठी लिहिले पाहिजे याचे मार्गदर्शन ते मला करतात. मी सत्य आणि माणूस निर्माण करण्यासाठी लेखन करतो. जाती आणि धर्मांमध्ये हा देश विभागण्यापेक्षा हा संपूर्ण देश माणसांचे मंदिर बनायला हवा आणि माणूस हा त्यातील महानायक ठरला पाहिजे. कारण माणसापेक्षा मोठे काहीही नाही. मी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांची तत्वे घेऊन जगणारा मनुष्य असून यांच्या विचारांशी फारकत घेऊन मी कुठलेही पुरस्कार स्वीकारणार नाही. या सगळ्या महापुरूषांच्या विचारांनी मी भारावून गेलो असून ज्या व्यासपीठावर यांच्या प्रतिमा लावल्या जाणार नाहीत, ते व्यासपीठ माझे नव्हे. यासाठी कोट्यावधींचे पुरस्कार, मानसन्मान मला नाकारावे लागले तरी मी ते नाकारेल. धर्मनिरपेक्ष परंपरेचा मी पाईक आहे आणि विषमता, शोषणाचा मी विरोधक आहे.

आपण कोणाचे वारस आहोत, पाईक आहोत याची जाणीव ठेवून आपण स्वतंत्र विचारांचे नेतृत्व करणाऱ्या महामानवांचे अनुयायी आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. राज्यकर्त्यांनी इंग्रजांचे ‘झोडा आणि फोडा’ हे धोरण स्वीकारून आपल्याला मुस्लीम, ओबीसी, ख्रिश्चन अशा भेदाभेदांमध्ये अडकवले आहे. एवढेच नव्हे तर त्या भेदाभेदीच्या चौकटीचा प्रत्येकाने गर्व आणि अभिमान बाळगावा इथपर्यंत आणून ठेवले आहे. आज राज्यात आणि केंद्रात आलेले सरकार हे त्यांच्या बळावर आलेले नसून तुमच्या-आमच्यातील मुर्खपणाच्या बळावर ते सत्तेत आलेले आहेत. सर्व भेदाभेद सारून आपण एकत्र आलो, तर फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांची सत्ता आपण राज्यात आणि केंद्रात प्रस्थापित करू शकतो.

यावेळी ज्येष्ठ नेते बाबा आढाव, रूपाली चाकणकर, मंजिरी धाडगे आणि प्रा. हरि नरके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी केले. विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी यांनी आभार मानले.

तर सहकुटुंब आंदोलन करणार

सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले  यांचं नाव आपण अभिमानानं घेतो. पण त्यांनी जिथं शिक्षणाचं मोठं कार्य उभारलं त्या भिडेवाड्याची आजची अवस्था वाईट आहे. मी आजदेखील मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याची बैठक घ्यायला सांगितलं आहे. त्या दोघांनीही लवकरच पुण्यात यासंदर्भात बैठक घेऊ असं सांगितले आहे. थोडे दिवस वाट बघू, अन्यथा आंदोलन अटळ आहे, असं छगन भुजबळ  म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. त्यामुळे थोडे दिवस थांबू. वाट बघू अन्यथा आंदोलन करु. मी माझ्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी होणार आहे. लवकरात लवकर भिडेवाड्याचं काम पुर्ण होणं गरजेचं आहे, असंही भुजबळ म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *