पुणे- पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली असून १५ टक्के पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आहे, तर राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्के असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून लवकरच राज्यातील कोरोनाचे नियम शिथिल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले . कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करणार आहे. थिएटरमध्ये ५० टक्के उपस्थिती ठेवून थिएटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. इतर कार्यक्रमाला मात्रं बंधनं आहेत. लग्न समारंभांना बंधन आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची क्षमता असेल तर एक हजार लोकांना परवानगी मिळत नाही. फक्त दोनशे लोकांनाच परवानगी आहे. त्यामुळे या निर्बंधात शिथिलता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. हळूहळू सर्व नियम हटवण्याची गरज आहे, असं सांगतानाच जोपर्यंत कोरोना संपत नाही. तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावेच लागेल,असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवजंयती साजरी करण्यासाठी कोरोना नियमांमध्ये शिथिलता देणार?
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी ७ दिवस शिल्लक आहे. यावर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नियमावली जाहीर झाल्यानंतर ती विविध खात्यांना दिली जाईल, असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे आणि मला शिवनेरी किल्ल्यावरील जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळं त्यांना शिवनेरीवरील कार्यक्रमात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जन्मसोहळ्यातील कार्यक्रमात आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मी शिवेनरीवर उपस्थित राहणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.