सोलापूरः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीला याबाबत दोषी धरले आहे. तर महाविकास आघाडीचे नेते मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहेत. दरम्यान, या प्रश्नी भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता आक्रमक झाले असून त्यांनी कोल्हापूर येथे शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका ते या दौऱ्यात जाणून घेणार आहेत. आज(सोमवार) सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “मी राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी लगेच खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे”, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
मराठा आरक्षण विषयासंबंधांत संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती परंतु ती मिळाली नसल्याचे बोलले जात आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याचा काही उपयोग नसल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांचे हे वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे.
या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या 27 मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.