कोव्हिड बाधित रुग्णांमध्ये का आणि कसा होतो बुरशी संसर्ग (म्युकर माइकोसिस)? : डोळयातील दृष्टिपटल आणि नसांवरही होतो परिणाम

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-करोनाची महामारी हे जगभरात आरोग्यक्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान झाले आहे. या विषाणूचा शरीराबरोबर याचा डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो, याची अनेकांना जाणीव नाही.  कोव्हिडमुळे कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे) होतो असे प्रथम चीनमधील नेत्रविकारतज्ज्ञाच्या लक्षात आले. यात रुग्णाच्या डोळ्यांमध्ये थोडीशी वेदना होते आणि ते लाल होतात आणि आतमध्ये टोचत असल्यासारखे वाटते. डोळ्यांतून पाणी येऊ लागते. ही लक्षणे कंजक्टिव्हायटिससारखीच भासतात. हे कोव्हिड झाल्याचे लक्षण आहे का याची चाचपणी करण्यासाठी रुग्णाच्या कुटुंबात कोरोनाचे रुग्ण आहे का किंवा रुग्ण कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता का, हे डॉक्टरांना समजून घ्यावे लागते

कोव्हिडचा रेटिनावर (डोळ्याचे अंतरपटल) तसेच त्यातील नसांवरही परिणाम होतो, या आजारामुळे रुग्णाच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. परिणामी, रेटिनाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अडथळा निर्माण झालेली रक्तवाहिनी छोटी असेल किंवा त्यात डिऑक्सिजनेटेड रक्त असेल तर रुग्णाला कोणतेही लक्षण कदाचित दिसणार नाही. परंतु, काही प्रकरणांमध्ये डोळ्यांपर्यंत ऑक्सिजनेटेड रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीवर विषाणूचा परिणाम होतो. परिणामी दृष्टी अधू होऊ शकते किंवा अंधत्व येते. वेळेवर निदान आणि उपचार करून ही परिस्थिती टाळता येऊ शकते.

औंध येथील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल मधील वरिष्ठ कन्सल्टंट नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर बाबुर्डीकर म्हणाले. दृष्टी गेल्याच्या ६ तासांमध्ये रुग्ण नेत्रविकारतज्ज्ञांकडे पोहोचला तर डोळ्यांमधील रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठीचे उपचार करून दृष्टी वाचवता येऊ शकते. या प्रकरणांमध्ये रुग्णाची ९५% पर्यंत दृष्टी पुनर्स्थापित करता येऊ शकते. कोव्हिडमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे हा डोळ्यांशी संबंधित एकच विकार नाही. काही रुग्णांना रेटिनायटिस हा डोळ्यांचा दाह होण्याचा विकारही होऊ शकतो. हा आजारही औषधे आणि इंजक्शन देऊन बरा करता येऊ शकतो.

कोव्हिडवरील उपचारांसाठी बहुधा स्टेरॉइड्सचा वापर करण्यात येतो. पण ही दुधारी तलवार असते. स्टेरिॉइड्स योग्य मात्रा मध्ये वापरले तर ते जीव वाचवू शकतात. यात काही हलगर्जीपणा झाला तर स्टेरॉइड्समुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. स्टेरॉइड रिस्पॉंडर्स या वर्गातील रुग्ण जेव्हा स्टेरिॉइड्स घेतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये द्रव दाब (फ्लुइड प्रेशर) वाढतो. या परिस्थितीत डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. स्टेरॉइड्स दीर्घ काळ वापरली तर मोतीबिंदू होऊ शकतो. वेळेवर तपासणी केल्यास ही गुंतागुंत टाळता येऊ शकते, स्टेरॉइड्सचे साइड इफेक्ट्स घालवून रुग्णाची दृष्टी वाचवता येऊ शकते.

स्टेरॉइड्स वापरल्याने रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा प्रकरणांमध्ये आणि विशेषतः मधुमेहींमध्ये फंगल इन्फेक्शन (बुरशीचा संसर्ग) आढळून येतो. यामुळे कपाळाच्या मागे, नाकात, गालाच्या हाडांमध्ये आणि डोळ्यांच्या मध्ये असलेल्या श्लेष्म तयार करणाऱ्या छोट्या छोट्या हवेच्या पोकळीमध्ये म्हणजेच सायनसेसमध्ये काळी बुरशी तयार होते. काही प्रकरणांमध्ये काळी बुरशी सायनसेसपासून डोळ्यांच्या भोवती तर काही प्रकरणांमध्ये डोळ्यांच्या आतही तयार होते. ही अत्यंत गंभीर स्थिती असून त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक असते.सध्याच्या महामारीच्या काळात, ज्या कोव्हिड रुग्णांमध्ये डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवल्या असतील त्यांनी तातडीने नेत्रविकारतज्ज्ञाची भेट घ्यावी.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *