पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत?

राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक राज्यांनी आपापल्या पातळीवर लॉकडाऊन लावला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. मात्र, लसीची पाहिजे त्या प्रमाणात उपलब्धता नाही. त्यातच देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे बोलले जात आहे. ऑक्सीजनचा, व्हेंटीलेटरचा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा यामुळे परिस्थिति हाताबाहेर जात आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनी तसेच देशातील वैद्यकीय तज्ञ आणि अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार अँथनी फाउची यांनीही देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकार देशव्यापी लॉकडाऊन लावणार का याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशव्यापी लॉकडाऊन विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, कोरोना टास्क फोर्सनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला यापूर्वी दिला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झाल्याने देशातही हाच फॉर्म्युला लावला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान लॉकडाउनच्या पर्यायावर चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. व्ही के पॉल हे टास्क फोर्सचे प्रमुखदेखील आहेत.

कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिपोर्ट करतात. या टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएमआरचे तज्ज्ञ आहेत. या टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे. या तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोनाची साखळी तात्काळ तोडण्याची गरज आहे. आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. कोरोनाच्या संसर्गाची रोजची स्थिती अशीच राहिली तर आरोग्य व्यवस्थेची पूर्णत: वाट लागेल. संसाधने वाढवण्याचीही मर्यादा असते. त्यामुळे संक्रमणाची संख्या आधी कमी केली पाहिजे. त्यासाठी कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोविड फैलावतो. देशव्यापी लॉकडाऊन लागू केल्यास एकमेकांचा संपर्क होणार नाही. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. तसेच कोरोना रुग्णांची संख्याही घटेल, असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन टाळण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यांना केलं होतं. लॉकडाऊन हा पहिला पर्याय असू नये असंही त्यांनी म्हटलं होतं. काहीच पर्याय नसेल तरच लॉकडाऊनचा विचार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *