मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवाराचा प्रचार करत असताना शिवसेनेच्या खासदारांचा मात्र, शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा आग्रह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला असल्याचे समोर येत आहे. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे.
शिवसेनेचे लोकसभा खासदार राहुल शेवाळे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्याने आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचे निर्देश शिवसेनेच्या खासदारांना द्यावेत असे आवाहन या पत्रात केले आहे. शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, मुर्मू या एक शिक्षक होत्या, नंतर ओडिशा सरकारमध्ये मंत्री झाल्या आणि झारखंडचे राज्यपालपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांची (आदिवासी) पार्श्वभूमी आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता, मी तुम्हाला विनंती करतो की मुर्मूला तुमचा पाठिंबा जाहीर कराव आणि शिवसेनेच्या सर्व खासदारांनाही तसे करण्याचे निर्देश द्यावेत.
बाळ ठाकरे यांनी 2007 मध्ये काँग्रेस उमेदवाराला दिला होता पाठिंबा
पत्र लिहिताना शेवाळे यांनी, दिवंगत बाळ ठाकरे यांनी 2007 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला पाठिंबा न देता त्याऐवजी मूळच्या महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता हे उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिलेआहे तसेच शिवसेनेने २०१२ मध्ये यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे आणि नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचीही सत्तेतून हकालपट्टी करण्यात आल्याने त्यांची ही मागणी महत्त्वाची ठरते आहे.
दरम्यांन, भाजपबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मूला यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शिवसेनेचे खासदार पक्षाची पर्वा न करता एनडीएच्या उमेदवाराला मतदान करू शकतात. तसे झाल्यास शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात सामील होण्याची शक्यता बळावली आहे.