सुप्रिया सुळे यांचा अभिनव उपक्रम : जनसामान्यांनी विचारलेले प्रश्न मांडले जाणार थेट लोकसभेत

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे – समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज देखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते. त्यामुळे नागरिकांचे मुद्दे लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रवादी  काँग्रेसच्या नेत्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सक्रिय सहभाग आणि संवाद: लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी’ या देशातील पहिल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या किंवा सुचना सुप्रिया सुळे यांच्यांपर्यंत फक्त एका क्लिकवर पोहोचवता येणार आहेत.

खा. सुळे यांनी लोकसभेत वेळोवेळी आपल्या मतदारसंघासह राज्यातील व देशातील अनेक जनहिताच्या विषयांवर आवाज उठवला आहे. त्यांच्यी लोकसभेतील कामगिरी नेहमीच अव्वल असते.  त्यामुळे त्यांना अनेकवेळा संसदरत्न या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. यापुढेही जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडताना जनतेचा सहभाग आणखी वाढावा यासाठी त्यांनी ‘सक्रिय सहभाग आणि संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत नागरिक आपले प्रश्न, विषय, सुचना ‘आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ ( https://askme.supriyasule.net ) या वेबसाईटवरुन थेट सुळे यांच्यापर्यंत पाठवू शकतात. वेबसाइट ओपन केल्यानंतर नागरिकांना एक फाॅर्म भरावा लागेल. फाॅर्ममध्ये आपली माहिती आणि प्रश्न सविस्तर लिहिल्यानंतर प्रश्न पाठवता येणार आहे. त्यांतर तो प्रश्न खा. सुळे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा एक एसएमएस देखील नागरिकांना मिळणार आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी राजकारण आणि समाजकारण करत आहे. त्यामुळे संवादावर माझा विश्वास आहे. जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठी आपल्याला जनता निवडून देत असते. मला ही संधी दिल्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेची ऋणी आहे. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यात स्वयंसेवी संस्था, नागरिक त्यांचे प्रश्न विचारू शकतात. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, सुचना, विषय मी संसदेत मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न मांडावेत शिवाय या संवादाला आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या अन्य काही सुचना असतील तर त्यांचेही स्वागत आहे”. केंद्र सरकारच्या काही धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे. एका कठीण काळातुन आपण जात आहोत. जनतेची प्रतिनिधी या नात्याने संसदेत या विषयावर देखील आपण नक्की आवाज उठवू, असेही त्या म्हणाल्या.

देशातील पहिलाच सक्रिय लोकसहभागाचा उपक्रम खा. सुप्रिया सुळे यांच्यामार्फत राबवण्यात येत असल्यामुळे लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या व्यापक जनसंवादाला यामुळे चालना मिळणार आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे खा. सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *