औरंगाबाद – कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आणि प्रार्थना स्थळे खुली करावीत यासाठी मागणी होत असताना त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम आमने सामने आले आहेत. एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील ट्विटरवरून “आज मंदिर कल मस्जिद” अशा आशयाचं ट्विट केलं होत. त्यावरून शिवसेना नेते व माजी खासदार खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. आमची मंदिरे उघडणारे इम्तियाज जलील कोण? असा सवाल करीत त्यांना मंदिरांना हात लावू देणार नाही, त्यांनी मंदिरांना हात लाऊन दाखवावाच असे आव्हान दिले आहे. दरम्यान, मी लोकांचा खासदार आहे. हिंदू धर्माचे कोणी ठेकेदार नाही. यात राजकारण आणू नये, मी चांगल्या कारणासाठी जात आहे, अशी प्रतिक्रिया खासदार ईम्तीयाज जलील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये शिवसेना- एमआयएम मध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी यासाठी भाजपने राज्यभर घंटा आंदोलन केलं तर प्रकाश आंबेडकरांनी पंढरपूरमध्ये आंदोलन करून धार्मिक स्थळ उघडण्यासाठीची मोहीम सुरु केली आहे. त्यात एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील यांनी उडी घेत त्यांनी ट्विटरवरून मध्यरात्री “आज मंदिर कल मस्जिद” अशा आशयाचं ट्विट केले होते. त्यावरून औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार विरोध केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येतील हे सोष्ट केले आहे. मंदिरे आणि मशिदींच्या बाबतीतही लवकर निर्णय घेण्यात येणार आहे. असे असताना इम्तियाज जलील राजकारण करीत आहेत. आमची मंदिरे आम्ही खुली करू. आमची पवित्र मंदिरे त्यांच्या भ्रष्ट हाताने उघडू देणार नाही असा पवित्रा खैरे यांनी घेतला आहे. मंदिरे उघडण्यासाठी शिवसेना समर्थ आहे. आमची मंदिरे भ्रष्ट करायची का असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि एमआयएममध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
अनेक हिंदू बंधू माझ्याबरोबर येणार आहेत. मंदिरे उघडणार म्हणजे आम्ही आंदोलन करणार नाही. एक-दोन मंदिरात जाणार आहोत. अनेक हिंदू बंधू आमच्याबरोबर आहेत. पोलिसांनी विनंती केली की आज गणपती विसर्जन आहे, आज आंदोलन करू नये. परंतु, हा चांगला पवित्र दिवस म्हणून हा दिवस आम्ही निवडला होता. त्यामागे दुसरे काही कारण नाही असे स्पष्ट करत सर्व हिंदू खैरेंबरोबर नाहीत असे जलील यांनी म्हटले आहे.