शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण १ सप्टेंबरला होत आहे. शुक्र 28 सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील. कर्क म्हणजे चंद्र ग्रहाची राशि आहे आणि शुक्र ग्रह चंद्र ग्रहला आपला शत्रू मानतो, त्यामुळे कर्क राशीतील शुक्राचे परिणाम फार शुभ असणार नाहीत असे ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. अन्य राशींवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. कर्क राशीतील शुक्राच्या आपल्या राशीवर काय परिणाम होणार आहे याबाबत ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक काय म्हणतायेत बघू या..
मेष रास
शुक्राचे कर्कराशीतील संक्रमण आपल्यासाठी फारसे अनुकूल नाही. तो आपल्याला मानसिक त्रास देऊ शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या सुखी जीवन आणि आनंदावर होईल. या दरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवहाराच्या बाबतीतही काळजी घ्या अन्यथा पैशाची हानी होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत मात्र त्याचे संक्रमण तुलनेने चांगले असेल. वाहन, घराच्या खरेदीचा योग जुळून येईल. विवाहाशी संबंधित वाटाघाटी काही व्यत्ययानंतर निष्कर्षाप्रत येतील. कर्मावर शुभ दृष्टीचा प्रभाव असेल त्यामुळे आपले कार्यक्षेत्र विस्तृत होईल. नवीन लोकांच्या भेटी देखील वाढतील.
वृषभ
तुमचे धैर्य वाढेल. आपण घेतलेल्या निर्णयांचे कौतुक होईल. परंतु, कुटुंबातील सदस्यांशी आपले वादविवाद होऊ शकतात. या संक्रमनाचा परिणाम म्हणून धर्म-कर्म कार्यात रुची वाढेल. तुम्हाला ग्रामीण भागात प्रवास करण्याचा फायदा मिळेल. परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करणे किंवा परदेशी नागरिकत्वासाठी व्हिसासाठी अर्ज केल्यास त्यात यश मिळेल.
मिथुन
आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या काळात तुमचा खर्च वाढेल. घर, वाहन खरेदीसाठी केलेला संकल्प देखील पूर्ण होऊ शकतो. त्याच वेळी, आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विरोधकांचा प्रभाव वाढू शकतो त्यामुळे भांडणे, वादविवाद यापासून दूर राहा. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत प्रकरणे असतील तर ती बाहेरच्या बाहेर मिटवल्यास ते आपल्यासाठी चांगले असेल. या काळात आपल्याकडून असे कार्य घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कर्क
तुमचे मन अस्वस्थ राहील. आपल्या मनातील एखाद्या गोष्टीबद्दल मनामध्ये चिंता असेल. परंतु, आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपण समजून उमजून केलेले सर्व नियोजित धोरणे प्रभावी असल्याचे सिद्ध होतील आणि आपण कोणतेही नवीन काम सुरू करू इच्छित असल्यास किंवा करारावर स्वाक्षरी करायची असल्यास हा काळ त्यासाठी अनुकूल राहील. वैवाहिक जीवनाशी संबंधित चर्चा यशस्वी होतील. सासरच्या लोकांकडूनही सहकार्य मिळेल. उच्च अधिकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा.
सिंह
शुक्राचा संक्रमण आपल्या खर्चात वाढ करेल. याळ कालावधीत आपण महागड्या वस्तू खरेदी कराल. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः आपल्या उजव्या डोळ्याची काळजी घ्या. जास्त प्रवासामुळे तुम्हाला थकवा येईल. आपल्या शत्रूंच्या मनोवृत्तीचा परिणाम म्हणून आपले गुप्त शत्रू वाढतील, परंतु कोर्टाचे निर्णय आपल्या बाजूने लागण्याचे चिन्हे आहेत. बँक किंवा कोणत्याही सावकाराकडून कर्ज घेऊ नका.
कन्या
तुमचा आर्थिक फायदा होईल पण कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याचीही शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल. आर्थिक बाजू बळकट होईल. कोणाकडून बराच काळ पैसे येणे बाकी असेल तर या काळात ते मिळण्याची अपेक्षा आहे. मुलांशी संबंधित चिंतांपासून आराम मिळेल. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना संतान प्राप्तीचा योग आहे. नवीन प्रेम प्रकरणे तयार होऊ शकतात. तथापि, काळजी घेणे देखील आवश्यक असेल.
तूळ
कर्क राशितील शुक्र संक्रमण आपल्याला यशस्वी होण्यास मदत करेल. नोकरीत पदोन्नती आणि आपला प्रभाव वाढेल, इतरत्र स्थान बदलण्याची शक्यता देखील असेल. केंद्र किंवा राज्य सरकारशी संबंधित कामांचा निपटारा होईल. आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा पुरेपूर उपयोग करा. निवडणुकांशी संबंधित कोणताही निर्णय घेवू इच्छित असाल तर त्यासाठी या काळात संधी चांगली आहे. चौथ्या स्थानावर शुभ दृष्टी पडल्यामुळे मित्र किंवा नातेवाईकांचे सहकार्य आणि भौतिक आनंद वाढण्याचेही या काळात योग आहेत.
वृश्चिक
या काळात आपणास परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित कामांचा निपटारा होईल. विदेशी कंपन्यांबरोबर सेवाकरारनामा होईल किंवा परदेशी नागरिकत्वासाठी व्हिसासाठी अर्ज करणे इत्यादि कामेही यशस्वी होतील. धर्म-कर्म कार्यात पुढाकार घेऊन भाग घ्याल. या गोचराच्या पराक्रम भावाच्या दृष्टीचा परिणाम म्हणून घेतलेले निर्णय आणि केलेल्या कार्याचे कौतुक होईल. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल.
धनु
हे संक्रमण आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकते . विशेषतः हृदय आणि पोटाच्या यंत्रणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो तर हेच संक्रमण मानसन्मान आणि आदर मिळवून देईल. आपले विरोधक आपला अपमान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, म्हणून कामाच्या ठिकाणी भांडण, वाद टाळा. काम संपले की सरळ घरी निघून येणे अधिक चांगले. आकस्मिक धनलाभाची शक्यता आणि उसने दिलेले अडकलेले पैसे परत मिळण्याची अपेक्षा. एखादी महागडी वस्तूची खरेदी करू शकता
मकर
हे संक्रमण आपल्या विवाहित जीवनात थोडी कटुता आणू शकेल, परंतु विवाह संबंधित वार्ता यशस्वी होईल.व्यापाऱ्यांसाठी हा योग चांगला असेल. केंद्र किंवा राज्य सरकारशी संलग्न आस्थापनांमध्ये नोकरीसाठी अर्ज करणे किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करणे यामध्येही आपल्याला यश प्राप्त होईल. प्रवासाचा फायदा तुम्हाला मिळेल.विदेशी व्हिसासाठी अर्ज करणेही यशस्वी होईल. लग्न भावावरील शुभ दृष्टीमुळे, सन्मान वाढेल, तुमच्या निर्णयांचेही कौतुक होईल.
कुंभ
तुमच्या शत्रूंची संख्या वाढेल. आपलीच माणसे आपल्याविरूद्ध टीका करण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याविरूद्ध काही कट रचण्याचा प्रयत्न करतील, त्यापासून सावध रहा. स्वतःचे आणि आपल्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. कोर्ट-कचरीचे वाद शक्यतो बाहेरच्या बाहेर मिटवावेत. व्यय भावाच्या दृष्टीमुळे आपला लक्झरी वस्तूंवर अधिक खर्च होईल, वेदनादायक प्रवासाचा योग असेल. परदेशी कंपन्या आणि परदेशात राहणाऱ्या मित्रांकडून लाभाची शक्यता आहे.
मीन
शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधित प्रकरणांमध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. नव दाम्पत्याला संतती योग आणि प्रादुर्भावाचा योग. परंतु, संतती संबंधी सर्व चिंतेपासून मुक्ती मिळेल. शुक्राच्या लाभ भावावरील दृष्टीच्या फलस्वरूप उत्पन्नाची साधने वाढतील. अधिक मेहनत केल्यास अधिक लाभाची अपेक्षा करू शकता.