श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ‘शमी-मंदार माळ’ अर्पण:सुमारे १०८ मणी आणि २८५० खडयांची कलाकुसर व ८५ तोळे सोन्याच्या सुवर्णसाज


पुणे : भगवान श्रीगणेशांना दुर्वेसमान प्रिय असणा-या दोन गोष्टी म्हणजे शमी व मंदार. शमीच्या पूजनाचा दिवस विजयादशमी रुपात साजरा केला जातो. गाणपत्य संप्रदायात शमी व मंदार हे केवळ वृक्ष नव्हेत, तर श्री गणेशांचे दृश्य रुप म्हणून पूजिले जातात. त्यामुळे दगडूशेठ गणपतीला शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली. प्रत्येक मण्याला सुवर्णसाज चढविण्यात आला असून एकूण  ८५  तोळे सोने वापरण्यात आले आहे. तर, श्री क्षेत्र मोरगाव येथून शमी व मंदार च्या काष्ठा उपलब्ध झाल्या आहेत. मंदिरामध्ये विश्वस्तांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करुन श्रीगणेश मूर्तीला ही माळ घालण्यात आली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे विजयादशमीच्या दिवशी शमी-मंदाराची सुवर्णसाज असलेली माळ गणपतीला घालण्यात आली आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. पी.एन.जी.ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ व पराग गाडगीळ यांच्याकडून ही माळ तयार करुन घेण्यात आली आहे.

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 9)

शमी-मंदाराच्या झाडाच्या लाकडापासून साकारण्यात आलेले मणी या माळांमध्ये लावण्यात आले आहेत. मुख्य मूर्तीला मोठी व पूजेच्या चांदीच्या मूर्तीला लहान अशा दोन माळा तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक माळेमध्ये १०८ मणी व १ मेरु मणी लावण्यात आला आहे. याशिवाय सुमारे २८५०  पांढ-यां खडयांच्या कलाकुसर देखील करण्यात आली आहे. राजू वाडेकर यांनी सलग १५ दिवस स्वत: च्या हाताने ट्रस्टच्या गणपती सदन या इमारतीमध्ये मणी घडविले आहेत. तसेच त्या माळेला पी.एन.जी.ज्वेलर्सच्या कारागिरांनी सुवर्णसाज चढविला आहे. 

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, गाणपत्य संप्रदायात शमी व मंदार वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. और्व मुनींच्या कन्या शमी आणि धौम्य ॠषींचा पुत्र मंदार यांना पंचेशगुरु भगवान भृशुंडीच्या महर्षींच्या शापामुळे वृक्षत्व प्राप्त झाले. त्यातून त्यांच्या सुटका व्हावी, याकरीता दोघांच्या पिताश्रींनी केलेल्या तपश्चर्येनंतर भगवान म्हणाले, शाप नष्ट होणार नाही, मात्र मी दोन्ही वृक्षांच्या मुळाशी निवास करीन. मंदाराच्या मुळाची मूर्ती तयार करुन जो माझी उपासना करेल, त्याला मी सर्वकाही प्रदान करीन. क्वचित प्रसंगी दुर्वा उपलब्ध नसल्यास शमीच्या पत्रांनीही माझी पूजा संपन्न होईल. भक्तांच्या विघ्नांचे शमन करण्याची क्षमता शमीला प्राप्त असेल. उपासकाची विघ्ने दूर होतील, असे सांगत मोरया या दोन्ही वृक्षांच्या मुळाशी अंतर्धान पावले. त्यामुळे ट्रस्टतर्फे भक्तांच्या देणगीतून आलेल्या सोन्याचा साज असलेली ही शमी-मंदार माळ साकारण्यात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love