पुणे–राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीत पुणे जिल्ह्याचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सदर अध्यादेश काढण्यात आला असून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ५+३+३+४ आकृतीबंधातील शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर), शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण आदी घटकांचे अवलोकन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मिळालेल्या मंजुरीनंतर आता राज्यात टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी सुरु असून या अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यांचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश, शिफारशी व मार्गदर्शन तसेच शैक्षणिक कार्याचे संनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी सदर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी शालेय शिक्षण मंत्री असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव हे सह अध्यक्ष असतील.