पुणे (प्रतिनिधी)-पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कॉंग्रेस पक्षांतर्गत कुरघोड्यांनी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोरील समस्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. आता कॉंग्रेसच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) शहाराध्यक्षपदाच्या नियुक्तीचा नव्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. या पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असं म्हणण्याची वेळ धंगेकरांवर आली आहे.
पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. सर्वांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीचे मोहोळ यांच्या प्रचाराने गती घेतली आहे. महाविकास आघाडीतील आणि कॉंग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने धंगेकरांना ग्रासले आहे. नुकत्याच कॉंग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्वांनी एकदिलाने काम करून रवींद्र धंगेकर यांना निवडून आणण्याच्या आणाभाका घेतल्या. परंतु त्यानंतर दोनच दिवसांत पक्षांतर्गत या कुरघोड्यांची कॉंग्रेस आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
झाले असे की, गेल्या तीन वर्षांपासून कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीचे पुणे शहराध्यक्ष असलेले प्रशांत सुरसे यांची बुधवारी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर व प्रदेश पातळीच्या शिफारसीवरून हकालपट्टी केली गेली आणि त्यांच्या जागेवर प्रदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, सुरसे यांच्या गटाने थेट दिल्लीतील कॉंग्रेसच्या अखिल भारतीय ओबीसी विभागाचे सरचिटणीस राहुल यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने आदेश काढून सुरसे यांची या पदावर पुनर्नियुक्ति केली.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या आलेल्या बैठकीत कसबा विधानसभा शिवसेनेला सोडणार, असा शब्द द्या, तरच धंगेकरांचा प्रचार करू अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली होती. मध्यंतरी केसरीवाडा येथे झालेल्या बैठकीमध्ये ‘ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार दिला, तेच आता मोदीविरोधक म्हणून आमच्याशेजारी बसणार असतील, तर आम्हाला हे मान्य नाही,’ असे सांगून काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने काढता पाय घेतला होता. तर त्यानंतर झालेल्या बैठकीसाठी लावलेल्या बॅनरवर ‘नेत्याचा’ फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं होतं. दोन दिवसांपूर्वी धंगेकरांचा प्रचार करू नका, अशा सूचना शिवसेना ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिल्या होत्या. त्यानंतर पुणे लोकसभा महाविकास आघाडीचे काम जोमाने सुरू आहे. शिवसेना प्रचारामध्ये सहभागी आहे, असे जाहीर करण्याची नामुष्की शिवसेना ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांवर ओढवली होती.
एकीकडे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने करत असलेले काम, मोहोळ यांचा नियोजनबद्ध प्रचार तर दुसरीकडे प्रचारापेक्षा अंतर्गत कुरघोड्यांनी ग्रासलेले धंगेकर असे चित्र सध्या दिसते आहे.