अलकाताई मला प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे वाटतात- सुमती पवार

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – अलकाताई मला प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे वाटतात. त्यांच्या पर्यटनावरील लेखांच्या उत्कृष्ट अंतर्बाह्य मांडणी केलेल्या पुस्तकाने मला खिळवून ठेवले. दोन्ही पुस्तकातील ज्ञान, माहिती व विषयातील विविधता लक्षणीय आहे, असे गौरोदगार ज्येष्ठ साहित्यिका सुमती पवार यांनी काढले.

सौ.अलका दराडे लिखित जीवनातील साखरपेरणी व पर्यटनाच्या अनोख्या जगात या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका सौ. सुमती पवार व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील विशाखा हॉल मध्ये नाशिककरांच्या साक्षीने पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय संस्कृती देशातील नैसर्गिक सौदर्य, कला, भाषा, इतिहास याचा सुरेख संगम पर्यटनाच्या अनोख्या जगात या पुस्तकात वर्णन केले आहे.या पुस्तकात पर्यटन करणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटनाच्या अनोख्या जगात या पुस्तकातील अनुभव संपन्न लेख खास मार्गदर्शक व वाचनीय आहेत.या पुस्तकाचे प्रकाशन वैशाली पब्लिकेशन यांनी केले आहे. या दोन्ही पुस्तकांसाठी रवींद्र मालुंजकर व वेदश्री थिगळे यांची प्रस्तावना आहे.

सुमती पवार म्हणाल्या, मोनालिसा पासून पुण्यनगरी नाशिक पर्यंत माहिती देऊन अलकाताईंनी आश्चर्यचकित केले आहे. निरीक्षणाच्या ताकदीने या पुस्तकांनी साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. कोणत्याही गोष्टीचा हव्यास नसला कि जीवन सार्थकी लागते. हे त्यांचे जीवनसूत्र त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेत बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली आहे.प्रत्येक विषयाचं त्यांनी सोनं केलं आहे. त्यांच्या विचार व आचरणावरून त्यांनच्यासाठी ‘ऋषितुल्य’ हा शब्द वापरावा लागतो. त्यांच्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने लाख मोलाची पुस्तकं त्यांनी आपल्यासमोर आदराने ठेवली आहेत. 

सौ. अलकाताई आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की ‘वसुधैव कुटुंबकम’ या विशाल दृष्टीकोनातून मी दोन्ही पुस्तके लिहली आहेत. सहलीतील समृद्ध क्षण टिपले आहेत. पर्यटनामागे वडिलांची आशीर्वादरूपी प्रेरणा आहे. राष्ट्रभक्तीचे स्मारक अंदमान पाहताना नैसर्गिक सौंदर्याने नटलेले कोकणच मला वाटले. माझ्या प्रामाणिक विचारात पारदर्शकताही आहे. जीवनात आनंदाश्रू व दुःख या दोघांबरोबरच आपण जगत असतो. अनेक प्रसंगांवर हळुवार फुंकर घालून आप्तस्वकीयांबरोबर आनंदाने चालत राहणे म्हणजे जीवनातील साखरपेरणी होय. माझे पंचवीस लेख माझ्या अनुभवांचे साक्षीदार आहेत. व अनेक लेखात माझा प्रत्यक्ष सहभागही आहे. काही सामाजिक प्रश्न हाताळताना त्यातील गांभीर्य जाणले आहे, विनोदी काल्पनिक लेखी आहे. माझा पंचवीस लेखांचा मी गुलाबपुष्पांचा गुच्छ मानून आपण आदराने देत आहे त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती.

वैशाली प्रकाशनचे प्रकाशक श्री. विलास पोतदार म्हणाले की, अलकाताईंची दोन्ही पुस्तके सर्वार्थाने समाजउपयोगी आहेत.त्यांचे ललित लेख अभ्यासपूर्वक डोळसपणाने लिहिले आहेत. त्यामुळे त्यात जिवंतपणा जाणवतो. 

साहित्यिक व कवी विवेक उगलमुगले सरांनी पुस्तकातील लेखांसंबंधी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, अलका ताईंच्या लेखनात संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसतात व ग्रामीण जीवनाशी जपलेली माणुसकीही दिसते.पारंपारिकतेबरोबरच आधुनिकतेचाही सुरेख संगम वाचण्यास मिळतो. लेखिकेचे सुसंस्कृत मन वाचकाला भावनेशी जोडताना दिसते. अर्थपूर्ण जगण्याचे सामर्थ्य हे ही त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल.

प्रा. डॉ. वेदश्री थिगळे आपले विचार मांडताना म्हणाल्या की ताईंचे पर्यटनावरील पुस्तक म्हणजे ज्ञान, माहिती व आनंद देणारी यात्राच आहे. विविध देशातील नैसर्गिक सौदर्य, कला, भाषा, इतिहास व संस्कृती यांचे प्रतिबिंब त्यांच्या पुस्तकात दिसते. अनेक देशांचे अनुभव व्यक्त करताना त्यांनी भारत दर्शनही सुंदर टिपले आहे. त्यांनी घेतलेल्या पर्यटनाचा आनंद आपल्याला हि मिळतो. त्यांच्या सोज्वळ स्वभावाचे दर्शन दोन्ही पुस्तकातून आपल्याला जाणवते.

प्रा. राजेंद्र सांगळे म्हणाले की ही दोन्ही पुस्तके मराठी साहित्यात उच्च प्रतीची ठरतील इतके त्यातील लिखाण सजीव आहे.

या उत्साहपूर्ण सोहळ्यास डॉ. प्रितेश जुनागडे, डॉ. कविश मेहता, प्रा. निवास पाटील, प्रा. राजेंद्र सांगळे, आर्किटेक्ट मिहीर मेहता, श्री प्रकाश आंधळे, विजय घुगे उपस्थित होते. तसेच साहित्यिक देखील मोठ्या संख्येने हजर होते. साहित्यिक राज शेळके , नितीन केकाणे, अलका कुलकर्णी, जयश्री वाघ, सुनंदा जरांडे , ज्योत्स्ना पाटील, योगेश पाटील, पद्माकर दराडे, दिलीप बोरसे, विजयकुमार परिहार, हेमंत पोतदार, शरद देवरे इत्यादी उपस्थित होते. श्यामराव केदार व ललित सांगळे तसेच अनेक ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते .    

वैजयंती सिन्नरकरांचे प्रेमाचे चार शब्द आहेत असे सूत्रसंचालक साहित्यिक राजेंद्र उगले सर म्हणाले. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालन ने कार्यक्रमात सजीवता जाणवली .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *